कुष्ठरोग निर्मूलनासाठी बहुआयामी प्रयत्न हवेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 02:15 AM2018-02-25T02:15:46+5:302018-02-25T02:15:46+5:30
कुष्ठरोगाच्या निर्मूलनासाठी आणि कुष्ठरोग्यांचे कष्ट दूर करण्यासाठी झटणा-या डॉ. एम.डी. गुप्ते आणि डॉ. अतुल शहा या महनीय व्यक्तींना त्यांनी केलेल्या मानवीय सेवेसाठी आज आंतरराष्टÑीय गांधी पुरस्कार-२०१७ प्रदान करण्यात येणार आहे. त्यानिमित्त...
- एम. व्यंकय्या नायडू
उपराष्ट्रपती
कुष्ठरोगाच्या निर्मूलनासाठी आणि कुष्ठरोग्यांचे कष्ट दूर करण्यासाठी झटणा-या डॉ. एम.डी. गुप्ते आणि डॉ. अतुल शहा या महनीय व्यक्तींना त्यांनी केलेल्या मानवीय सेवेसाठी आज आंतरराष्टÑीय गांधी पुरस्कार-२०१७ प्रदान करण्यात येणार आहे.
त्यानिमित्त...
आपले राष्टÑ अनेक वर्षांपासून कुष्ठरोगाचा सामना करीत आहे. ख्रिस्तपूर्व ५०० वर्षांपूर्वी आपल्या देशातील सुश्रुत, चरक आणि वाग्भट्ट यांच्या वैद्यक शास्त्रावरील प्राचीन ग्रंथात या रोगाचे उल्लेख सापडतात. १९५० सालापर्यंत या रोगासाठी उपचार उपलब्ध नव्हते. उपचाराअभावी आणि या रोगामुळे निर्माण होणाºया शारीरिक व्यंगामुळे लोकांच्या दृष्टिकोनातून हा रोग भयंकर समजला जात होता. या रोगाविषयीचे भय व त्यातून निर्माण होणारा सामाजिक कलंक यामुळे या रोगाने ग्रस्त लोकांना समाजात उपेक्षेची वागणूक मिळत होती. अनेकांना सामाजिक बहिष्कारालाही सामोरे जावे लागले.
पुराणातील तसेच ऐतिहासिक पुराव्यावरून दिसून येते की, समाजाने त्या काळातदेखील कुष्ठरोग्यांचा स्वीकार केला होता. सम्राट अशोक आणि बौद्ध सम्राट उपतीस यांनी कुष्ठरोग्यांसाठी आरोग्यशाळा व पूजाशाळा बांधल्या होत्या. नंतरच्या सम्राटांनी ही प्रथा बंद केल्याने या रोग्यांनी स्वत:साठी स्वतंत्र वसाहती निर्माण केल्या. पण या रोगाविषयी धास्ती वाटून जनतेने अशा रोग्यांना समाजातून बहिष्कृत केले. त्यामुळे ते समाजापासून वेगळे पडले. अशा स्थितीत दक्षिण आफ्रिकेत आणि भारतातही महात्मा गांधी त्यांच्या मदतीला धावून गेले. संस्कृतचे विद्वान पंडित परचुरेशास्त्री हे कुष्ठरोगाने बाधित झाले. तेव्हा महाराष्टÑातील सेवाग्रामने त्यांना आश्रय दिला व त्यांची शुश्रुषा केली. महात्मा गांधींनी त्यांची सेवा करून या रोगाविषयी वाटणारी भीती दूर करण्याचा प्रयत्न केला.
नोव्हेंबर १९४७ च्या ‘हरिजन’ साप्ताहिकात गांधीजींनी लिहिले होते, ‘‘कुष्ठरोग्यांची सेवा ही केवळ उपचारापुरती नाही तर त्यांचे पुनर्वसन करून, त्यांचे नैराश्य दूर करून जगण्याचा आनंद त्यांना घेता यावा यासाठीसुद्धा आहे. अशा रोग्याचे जीवन तुम्ही जर बदलून टाकले तर तुम्ही खेड्यातच नव्हे तर राष्टÑातही परिवर्तन घडवून आणू शकाल.’’
त्या काळात कुष्ठरोगासाठी औषधही नसताना गांधीजींनी कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनाच्या कामात लक्ष घातले. कुष्ठरोग्यांसाठी वेगळी वसाहत निर्माण करून त्यांचा प्रश्न सुटणार नाही. १९४५ साली प्रो. जगदीशन यांनी कस्तुरबा कुष्ठ निलयम या कुष्ठरोग्यांच्या निवासस्थानाचे उद्घाटन करण्यासाठी महात्माजींना निमंत्रित केले असता ते म्हणाले, ‘‘उद्घाटनासाठी तुम्ही अन्य कुणाला तरी बोलवा पण ते बंद करण्यासाठी मात्र मला बोलवा’’ अशातºहेने कुष्ठरोग्यांसाठी स्वतंत्र निवासाची व्यवस्था हा त्या समस्येवरचा तोडगा नाही असेच त्यांनी सुचविले.
कुष्ठरोगाची लागण असलेल्या काही राष्टÑांनी राष्टÑीय मोहीम हाती घेत सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न म्हणून कुष्ठरोग्यांवरील उपचाराचा विषय हाताळला. त्या रोगावर परिणामकारक औषधे उपलब्ध झाल्यामुळेच हे शक्य झाले. तसेच समाजातही या रोगाविषयी मोठ्या प्रमाणात जागृती निर्माण झाली. १९५० साली स्थापन झालेल्या गांधी मेमोरियल लेप्रसी फाऊन्डेशनने या रोगाच्या निर्मूलनासाठी चांगली कामगिरी बजावून हा एक कलंक असल्याची समाजातील कल्पना दूर केली. या फाऊन्डेशनने कुष्ठरोग्यांवर उपचार तर केलेच पण त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कामही केले. २०१२-१३ या काळात कुष्ठरोग्यांची संख्या ८३००० होती व त्यांचे प्रमाण १० हजार लोकसंख्येत ०.६८ टक्के इतके होते. २०१२ सालापर्यंत देशातील ६४० जिल्ह्यांपैकी ५४२ जिल्ह्यातून या रोगाचा समूळ नायनाट करण्यात यश संपादन केले आहे. हे सांगताना मला आनंद होतो. तरीही नवी प्रकरणे पुढे येत आहेत ही बाब तितकीच चिंतेची आहे. छत्तीसगड आणि दादरा-हवेली या केंद्रशासित प्रदेशात दर दहा हजारी दोन आणि चार रोगी हे प्रमाण आजही पहावयास मिळते. ज्या बिहार, महाराष्टÑ आणि प. बंगाल या राज्यातून कुष्ठरोगाचे समूळ उच्चाटन झाले होते त्या राज्यात अलीकडच्या काळात या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले आहे. २०१२-१३ यावर्षी देशातील २०९ जिल्हे कुष्ठरोगाने बाधित होते, जेथे आपण लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे. कुष्ठरोगाचा लवकर शोध घेणे आणि रोग्यांना उपचार पुरविणे या गोष्टीला आपण प्राथमिकता द्यायला हवी.
रोगापेक्षा एक कलंक म्हणून रोग्याकडे बघितले जाते ही खरी चिंतेची बाब आहे. उपचारासंबंधी अनभिज्ञता आणि रोगाविषयी असलेल्या भ्रामक कल्पना याचाच कुष्ठरोग्यांना अधिक त्रास होतो.
कुष्ठरोगाने बाधित व्यक्तींना समाजातून बहिष्कृत करण्यासाठी जे कायदे करण्यात आले आहेत ते रद्द करून या रोग्यांना समाजात प्रतिष्ठा मिळावी यासाठी संयुक्त राष्टÑसंघाने एक ठराव संमत केला आहे. संपूर्ण जगात दरवर्षी अडीच लाख नवीन केसेस प्रकाशात येतात. ज्यापैकी ६० टक्के केसेस या भारतातील असतात, तेव्हा भारताने कुष्ठरोगाच्या व्यवस्थापनाकडे अधिक लक्ष पुरवायला हवे. त्यासाठी समाजात या रोगाविषयी जागरुकता निर्माण करावी लागेल. हा रोग कलंक आहे ही समजूत दूर करण्याचे प्रयत्न झाले तर रोगी स्वत:चा रोग लपवून ठेवणार नाहीत. २०२० सालापर्यंत या रोगामुळे व्यंग येणाºयांची संख्या दहा लाखात एक व्यक्ती इतकी कमी करण्याचा संकल्प जागतिक आरोग्य संघटनेने केला आहे. हा रोग समूळ नष्ट करण्यासाठी बहुआयामी आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज असून त्यासाठी मी गांधी मेमोरियल लेप्रसी फाऊन्डेशनला शुभेच्छा देतो व सुयश चिंतितो.