लोकल प्रवाशांना हवी गर्दुल्ले, दारुड्यांपासून मुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2023 08:25 AM2023-08-16T08:25:41+5:302023-08-16T08:26:33+5:30
मुंबईकरांची लाइफलाइन असणाऱ्या लोकलमध्ये गर्दुल्ले आणि दारुड्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
योगेश बिडवई, मुख्य उपसंपादक, लोकमत, मुंबई
मुंबईकरांची लाइफलाइन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकलला गर्दुल्ले आणि दारुड्यांचा विळखा घट्ट होत चालला आहे. काही दिवसांपूर्वी कल्याण रेल्वेस्थानकातील कर्जत बाजूकडील जिन्यावर सकाळी सकाळी एका गर्दुल्ल्याने महिला प्रवाशाला अचानक मिठी मारली. तिने आरडाओरडा केल्याने प्रवासी तिच्या मदतीला धावून आले. सकाळी गर्दीच्या वेळी झालेल्या या प्रकाराने रेल्वेस्थानकात सुरक्षारक्षक आहेत की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला.
केवळ रेल्वेस्थानक नव्हे तर स्कायवॉक, स्थानकातील पादचारी पूल स्थानकांचा परिसर येथे गर्दुल्ले, दारुड्यांचा वावर गेल्या काही वर्षांत वाढला आहे. रेल्वेस्थानके आणि रेल्वे यार्ड त्यांचा अड्डा झाली आहेत. मात्र, त्यांच्यावर पोलिस कारवाई होताना दिसत नाही. रेल्वेस्थानकातील पुलांवर तर रात्री त्यांचेच राज्य असते. त्यांना ना कोणाचा धाक ना कोणाची भीड लोकलचा फर्स्ट क्लासचा डबा तर त्यांचा जणू हक्काचा झाला आहे. सेकंड क्लासमध्ये गर्दी असल्याने ते फर्स्ट क्लासच्या डब्यात ठाण मांडून बसतात. काही जण तर चक्क झोपतात; पण त्यांना तेथून उठवणार कोण? बरं त्यांना हटकणाऱ्यांवर त्यांनी हल्ला वगैरे केला तर? त्यामुळे लोहमार्ग पोलिस, रेल्वे सुरक्षा दलाचे जवान हे नेमके काय करतात, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला नाही तर नवल.
मध्य रेल्वेच्या उपनगरी गाड्यांमध्ये त्यांचा प्रवाशांना मोठा त्रास होतो. रेल्वे प्रवासी संघटनेने याबाबत वारंवार तक्रारी केल्या आहेत. मात्र, रेल्वेची ढिम्म यंत्रणा हलेल तर नवल. महामुंबईत सुमारे ८० लाख लोक रोज लोकलने प्रवास करतात. यात महिलांची संख्या साधारणपणे ३० लाख आहे. मुंबईतील लोकलमुळे रेल्वेला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळतो. मात्र, त्या तुलनेत प्रवाशांना सुविधा नाहीत.
महामुंबईत भाजप, काँग्रेस, शिंदे गट, ठाकरे गटाचे खासदार आहेत. मात्र, खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि भिवंडीचे खासदार व केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या मतदारसंघातील कल्याण स्टेशन व जंक्शन जणू पोरके झाले आहे. स्टेशनचा पूर्व भाग कल्याण लोकसभेत तर पश्चिम भाग भिवंडी लोकसभा क्षेत्रात येतो. त्यामुळे येथील सुरक्षाव्यवस्थेची स्थिती वान्यावर असल्यासारखी आहे. रात्री तर कल्याण पश्चिमेला गर्दुल्ले आणि दारुड्यांची जणू जत्रा भरलेली असते.
ठाणे रेल्वे स्टेशन सोडल्यानंतर लोकलमध्ये दारुडे, गर्दुल्ले यांचा त्रास वाढतो. रात्री तर त्यांचा प्रवाशांना मोठा मनस्ताप होतो. रेल्वेमधील महिला प्रवाशांच्या सुरक्षितेबाबत महाराष्ट्र पोलिस आणि रेल्वे पोलिस यांनी समन्वयाने काम करण्याची अपेक्षा मध्यंतरी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांनी व्यक्त केली होती. महिलांच्या सुरक्षेबाबत जुलै महिन्यात झालेल्या बैठकीला रेल्वेचे पोलिस महासंचालक, पोलिस आयुक्त, मध्य रेल्वेचे वरिष्ठ पोलिस अधिकारी, पोलिस उपायुक्त तसेच महिला दक्षता समितीच्या सदस्या सहभागी झाल्या होत्या. मात्र, त्यानंतरही रेल्वेचा प्रवास सुरक्षित झालेला नाही.
हार्बर व ट्रान्स हार्बर मार्गावरही दारूड्यांचा त्रास आहे. रात्री पोलिस त्यांच्या हद्दीत कटकट नको म्हणून स्टेशनवर थांबलेल्या दारुड्यांना लोकलमध्ये बसवून देतात. प्रवाशांना काही तक्रार करायची असेल तर हद्दीचा मुद्दा समोर येतो. महिलांच्या सुरक्षितेसाठी मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची वर्षानुवर्षांची मागणी आहे. रेल्वेमध्ये बेकायदा प्रवास करणाऱ्यांवर हवी तशी कारवाई होत नाही. एकीकडे मुंबईसह देशातील काही रेल्वे स्टेशन आता स्मार्ट करण्याची केंद्र सरकारची योजना आहे. मात्र, लोकल प्रवाशांच्या वर्षानुवर्षांच्या प्रश्नांवर मात्र रेल्वेने अजून उत्तर शोधलेले नाही. सुरक्षेच्या प्रश्नाला रेल्वेने अग्रक्रम दिला तरच गर्दुल्ले आणि दारुड्यांपासून लोकलच्या प्रवाशांची सुटका होईल.
yogesh.bidwai@lokmat.com