मुंबई मेरी जान, वर्चस्वाची रणशिंगे आतापासूनच फुंकली जातायेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2022 06:18 AM2022-08-16T06:18:45+5:302022-08-16T10:05:19+5:30
महाविकास आघाडीचे सरकार कोसळताच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ज्या प्रकारे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीला फटकारले ते पाहता त्यांचेही टार्गेट नक्की आहे. भाजपने त्यांना टाळी दिलेला हात अजून सोडलेला नाही.
मुंबईतील प्रभागांची रचना पुन्हा पहिल्यासारखी करण्याचा निर्णय भाजप आणि शिवसेनेतील शिंदे गटाने घेतल्यानंतर या निवडणुका लांबणीवर पडल्या असल्या, तरी आता त्या फार पुढे जातील अशी शक्यता नाही. पण साम, दाम, दंड, भेद अशी सारी आयुधे वापरत या मोहमयी मायानगरीवरील वर्चस्वाची रणशिंगे आतापासूनच फुंकली जात आहेत. मुंबई भाजपच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच आशिष शेलार यांनी मुंबईवर आता आमचीच सत्ता येणार असल्याचा नारा दिला. त्याच दिवशी माजी नगरसेवकांच्या बैठकीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वो बुलाऐंगे मगर जाने का नहीं अशी साद आपल्या सैनिकांना घातली.
महाविकास आघाडीचे सरकार कोसळताच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ज्या प्रकारे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीला फटकारले ते पाहता त्यांचेही टार्गेट नक्की आहे. भाजपने त्यांना टाळी दिलेला हात अजून सोडलेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी राज यांचे सलोख्याचे संबंध असल्याने मंत्रिमंडळाचा विस्तार होताच त्यांचे विश्वासू मंत्री दीपक केसरकर लगोलग राज दर्शनासाठी रवाना झाले. त्यातच ठाण्यातील नागरी सत्कारात शिंदे यांनी महापालिका निवडणुका भाजपसोबत लढण्याचे जाहीर करून या लढाईची दिशा स्पष्ट केली. मनसेचे नगरसेवक फोडून शिवसेनेने त्यावेळी मुंबईतील ताकदीच्या बेटकुळ्या आणखी फुगवल्या होत्या. पण नंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेवर हल्ला करण्याची एकही संधी मनसेने सोडली नाही. त्यामुळे भाजप, शिवसेनेतील शिंदे गट आणि त्यांना मनसेकडून मिळणारी रसद एकीकडे आणि शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट दुसरीकडे असा मुंबईच्या सत्तेचा सारीपाट असेल.
राष्ट्रवादीने ठाकरे गटाची साथ सोडलेली नसली, तरी त्या पक्षाकडे सध्या मुंबईत गमावण्याजोगे काही नाही. मुंबई विभागीय काँग्रेसची सूत्रे हाती घेतल्यापासून भाई जगताप यांनी स्वबळाचा नारा दिला. तो त्यांनी बदलावा, अशी परिस्थिती सध्या नाही. परिणामी, युतीत मित्रपक्षांची बेरीज आणि आघाडीत वजाबाकी सुरू आहे. मुंबईच्या अवाढव्य विस्तारात प्रशासन तोकडे पडते, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे त्या कारभाराला, भ्रष्टाचाराला आणि घराणेशाहीच्या निमित्ताने ठाकरे कुटुंबाला लक्ष्य करत भाजपने राजकीय वातावरण तापवायला सुरुवात केली आहे. त्याच्या जोडीला हिंदुत्वाचे राजकारण आहे. विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपची साथ सोडून काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत नवा घरोबा केला, तेव्हापासून शिवसेनेने हिंदुत्व सोडल्याची राळ भाजपने उडवून दिली. त्यामुळे बाबरी मशीद पडल्यापासून अयोध्येतील राम मंदिर उभारेपर्यंतचे संदर्भ देत शिवसेना बचाव करत राहिली आणि भाजपच्या सापळ्यात अडकत गेली.
मनसेनेही हिंदुत्वाची कास धरल्यावर ठाकरे यांना संघ संबंधांना उजाळा देत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेच हिंदुत्व ज्वलंत असल्याचे दाखले द्यावे लागले. मुंबईतील मराठी टक्का घसरत गेल्याने अन्य भाषक मतदारांवर त्यातही खास करून हिंदी भाषक, गुजराती-राजस्थानी पट्ट्यातील मतदारांवर सर्व पक्षांची भिस्त आहे. पुनर्विकासाच्या लाटेत मुंबईतील लोकसंख्येचे स्थित्यंतर झाले. कामगार-कष्टकरी, मध्यमवर्गीयांच्या वस्त्यांनी कात टाकली. सुरुवातीला मी मुंबईकर अशी साद देणाऱ्या शिवसेनेला या बदलांची चाहूल लागली होती, पण मराठीचा मुद्दा सोडवत नाही आणि परप्रांतीय म्हणून हिणवलेले अन्य भाषक मतदार दुखावून चालत नाहीत, या कात्रीत सेना अडकली. त्याचा फायदा मनसेने उचलला.
मराठीचा मुद्दा मांडतानाच राज ठाकरे उत्तर भारतीयांच्या व्यासपीठावरही हजेरी लावून आले. पण त्याचा फटका मनसेला बसला नाही. मराठीचा मुद्दा हाती मिळत नसल्याने भाजपने सुरुवातीपासूनच अमराठी मतदारांवर लक्ष केंद्रित केले. परिवारातील संघटनांचा वापर करत एकेका वॉर्डात तो पक्ष जम बसवत गेला. त्याचा फायदा त्यांना झाला. त्यामुळे पालिकेतील कारभार, विकासाची स्वप्ने आणि कोणाचे हिंदुत्व अधिक जाज्ज्वल्य याभोवती मुंबईची निवडणूक फिरेल. त्याची चुणूक दहीहंडी, नवरात्रोत्सवातच दिसू लागेल.