ये है मुंबई मेरी जान
By admin | Published: January 29, 2017 10:48 PM2017-01-29T22:48:52+5:302017-01-29T22:48:52+5:30
मुंबईत आवाज कुणाचा याची जंग आता सुरू झाली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विरुद्ध मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असा हा सामना असेल
मुंबईत आवाज कुणाचा याची जंग आता सुरू झाली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विरुद्ध मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असा हा सामना असेल. या भांडणात काँग्रेस वीसच्या आत निपटेल असा दावा करणारे राजकीय पंडित मूर्खांच्या नंदनवनात आहेत.
मुंबईत शिवसेना आणि भाजपात मुख्य सामना होणार हे नक्की. सोन्याची कोंबडी असलेली मुंबई कोण वाटून खाणार ही स्पर्धा आहे. काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर दिसते. पण गेल्यावेळी काँग्रेसला ५२, तर भाजपाला ३२ जागा मिळाल्या होत्या हे विसरून चालणार नाही. काँग्रेस वीसच्या आत निपटेल असे मानणारे मूर्खांच्या नंदनवनात आहेत. काँग्रेसमुक्त मुंबई शक्य नाही. कामत, निरुपम, गायकवाड, कृपाशंकरसिंह एकमेकांशी कितीही भांडले तरी पंजाशिवाय दुसरं काही चालत नाही असा मोठा मतदार मुंबईत आजही आहे. काही नेते पक्षाला बुडवायला निघाले असले तरी हा मतदार ते होऊ देणार नाही. लोकांच्या मनात पंजा आजही आहे.
देशाच्या या आर्थिक राजधानीतील मराठी माणूस शिवसेनेच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. मुंबईत शिवसेना का जिंकते याचे भावनिक गणित आहे. या शहरातील सर्वात जास्त समस्याग्रस्त, पिचलेला मराठी माणूसच आहे. अरुंद बोळी, चाळी वा दाटीवाटीच्या झोपडपट्ट्यांमध्ये राहून तो आयुष्याचा मार्ग शोधत असतो. हिंदी, गुजराथी, सिंधी, दाक्षिणात्यांकडे चाकरी करतो. अशा या दबलेल्या, पिचलेल्या मराठी माणसाला पाच वर्षांतून एकदा तो या शहराचा राजा असून त्याची पिळवणूक करणाऱ्यांच्या छातीवर त्याचा भगवा गाडला आहे अशी भावनिक मालकी शिवसेना मिळवून देते आणि त्या मालकीच्या मोबदल्यात तो शिवसेनेला मत देत राहतो. खड्डेयुक्त रस्ते, पिण्याच्या पाण्याची करंगळीएवढी धार, नागरी सुविधांचा अभाव, महापालिकेतील भ्रष्टाचार याकडे काणाडोळा करून तो सेनेच्या मागे जातो. शिवसेनेकडे असलेले कार्यकर्त्यांचे जाळे, शाखांमधून लोकांची होणारी कामे ही कारणेदेखील आहेतच. मुंबईत शिवसेनाच हवी असे अगदी काँग्रेसच्याही बऱ्याच मुख्यमंत्र्यांना वाटायचं. निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला मदत होईल अशी विधाने ते करत.
देवेंद्र फडणवीस हे असे पहिलेच मुख्यमंत्री आहेत की त्यांना मुंबईत शिवसेना नव्हे तर भाजपाचेच राज्य असावे असे वाटते. पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही तोच अजेंडा आहे. शिवसेना व भाजपातील नगरसेवक संख्येचं अंतर अतिशय कमी राहिलं तर राजकीयदृष्ट्या मुख्यमंत्री आणि मुंबईतील भाजपाच्या नेत्यांचं वजन वाढेल. मात्र, डिवचली की शिवसेना मोठी होते याचे भान किरीट सोमय्या, आशिष शेलार यांना दिसत नाही. मुख्यमंत्री त्यांना आवरतील असं वाटलं होतं. पण शनिवारच्या सभेत तेही त्याच मार्गानं गेले. मुंबईची कशी वाट लागली हे लोकांना कळतं. आता मुख्यमंत्र्यांचं मुंबईच्या विकासाचं व्हिजन काय यावर लक्ष केंद्रित केलं तर अधिक बरं होईल. मुख्यमंत्रीजी, आपली प्रतिमा व्हिजन असलेला चांगला माणूस अशी आहे. अमिताभ बच्चनला अमरिश पुरीचा रोल शोभत नाही.
मनसेला २०१२ मध्ये २७ जागा मिळाल्या होत्या. त्यांच्या १८ ते २० जागा खेचून नेण्यासाठी सेना, भाजपा, काँग्रेसमध्ये चुरस राहील. राष्ट्रवादी काँग्रेसला गेल्यावेळी १३ जागा होत्या. तिथल्या पाचसात जागा कोणाच्या खिशात जातात, हे महत्त्वाचं राहील. गेल्यावेळी १७ अपक्ष जिंकले होते. त्यातील आठदहा जागा आपल्या पारड्यात येण्यासाठी रस्सीखेच असेल. समाजवादी पार्टीकडे नऊ जागा होत्या. त्यातील पाचएक आणि इतरही काही जागा एमआयएमला मिळू शकतात. कारण, युतीच्या विभाजनात जिथं काँग्रेसला विजय मिळू शकतो अशा वॉर्डात मुस्लीम मते ही पंजावर पडतील. लहानमोठे पक्ष आणि अपक्षांच्या कमी होणाऱ्या जागा कोण जिंकतं यावर मोठा खेळ असेल.
हेही करून दाखवा
शिवसेनेचे एक मंत्री म्हणाले की, आदेश येताच आम्ही मंत्रिपदाचे राजीनामे फेकू. राजीनामे द्याल तेव्हा द्याल हो! पण खासगी कामांच्या फायली मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जाणार नाही, असे तरी किमान जाहीर करा. शिवसेनेच्या आंतरवर्तुळात वावरणारा एक माणूस दोन गुजराथी कंत्राटदारांना घेऊन चार दिवस भाजपाच्या हेविवेट मंत्र्यांच्या दिल्लीतील कार्यालयात अलीकडेच का खेटे घालत होता. अशी अर्थपूर्ण युतीदेखील तोडून दाखविली पाहिजे.
जाता जाता : मुंबईत राजकीयदृष्ट्या काही अफवाप्रवण किंवा गॉसिपप्रवण क्षेत्रे आहेत. शिवाजी पार्कजवळ पण ते आहे. तेथून मग शिवसेनेशी युती होणार अशा कंड्या पिकवल्या जातात. पण ताजी अफवा खरी ठरली तर राजकारण बदलेल.
- यदु जोशी