Mumbai | मुंबई..., तुला माझ्यावर भरोसा नाय काय..?

By अतुल कुलकर्णी | Published: December 17, 2022 03:01 PM2022-12-17T15:01:19+5:302022-12-17T15:01:56+5:30

शहाण्या माणसाने मुंबईच्या रस्त्यावरून चालण्या-फिरण्याची स्वप्नेही पाहू नये? ‘जी-२०’ परिषदेच्या निमित्ताने येणाऱ्या पाहुण्यांसाठी ‘झाकाझाक’ काय सांगते?

Mumbai to host G20 Summit but common Mumbaikars facing daily problem Special Editorial Article | Mumbai | मुंबई..., तुला माझ्यावर भरोसा नाय काय..?

Mumbai | मुंबई..., तुला माझ्यावर भरोसा नाय काय..?

googlenewsNext

अतुल कुलकर्णी, संपादक, लोकमत, मुंबई

मुंबई, तुला बीएमसीवर भरोसा नाय काय..?
मुंबईच्या रस्त्यामध्ये झोल झोल, 
रस्त्यांचे खड्डे कसे खोल खोल...
खड्ड्यांचा आकार कसा गोल गोल,
मुंबई तू माह्यासंग गोड बोल...

आरजे मलिष्काचे हे पाच वर्षांपूर्वीचे गाणे. त्यावर प्रचंड वाद झाला. मुंबई महापालिकेने मलिष्काला नोटीस काढली. कालांतराने प्रकरण थंड झाले. मुंबईतले खड्डे आहे तिथेच राहिले,  काही  आणखी खोल खोल झाले..!  खड्ड्यांची काम करणारे ठेकेदार तब्येतीने देखील गोल मटोल झाले. ७० हजार कोटी रुपयांच्या ठेवी असलेल्या देशातल्या सगळ्यात श्रीमंत महापालिकेच्या रस्त्यांची ही अवस्था! महापालिकेच्या मालकीचे २०५० किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. ४४.८ किलोमीटर लांबीचा महामार्ग आहे. २०२१-२२ या वर्षात महापालिकेने रस्त्याच्या नवीन कामांसाठी ११७४.९२ कोटी रुपये खर्च केले आहेत, तर देखभालीच्या नावावर ३७.६३ कोटी रुपये खड्ड्यांत घातले आहेत.  ही उधळमाधळ इथेच थांबलेली नाही. २०२२-२३ या आर्थिक वर्षात रस्त्यांच्या नवीन कामांसाठी १९९४.५५ कोटी रुपये, तर देखभालीसाठी ५२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तीन महिन्यांत हे आर्थिक वर्ष ही संपेल तेव्हा हे पैसे देखील संपलेले असतील. पक्ष कोणताही असो, येणारा प्रत्येक नेता चांगल्या रस्त्यांची स्वप्न दाखवतो. कोणी मुंबईचे शांघाय करण्याची घोषणा करतो. कोणी मुंबईचे सगळे रस्ते सिमेंटचे करून टाकण्याची घोषणा करतो. एखादा उत्साही नेता अमुक एखाद्या अभिनेत्रीच्या गालासारखे गुळगुळीत रस्ते देऊ, असेही सांगून स्वतःच्या बुद्धिमत्तेचे दिवाळे निघाल्याचे दाखवून देतो. मग हजारो कोटींची टेंडर निघतात. लोक बातम्या वाचून खुश होतात. घराबाहेर पडले की त्याच खड्ड्यांच्या रस्त्याने चरफडत आपापल्या कामांना जातात. शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये असे म्हणतात, आता सामान्य माणसाने मुंबईच्या रस्त्यावरून गाडीत फिरण्याची स्वप्ने पाहू नये, असे सांगण्याची वेळ आली आहे. मुंबईत एकही रस्ता सलगपणे बिना खड्ड्यांचा सापडत नाही. तसा रस्ता शोधून देणाऱ्याचा लाख रुपयाची थैली देऊन शिवाजी पार्कवर जाहीर सत्कार करण्याची घोषणा केली तरी तसा रस्ता सापडणार नाही. उगाच कशाला असे बक्षीस जाहीर करणाऱ्याला त्रास, असा विचारही यामागे मुंबई महापालिकेने केला असावा.

मुंबईत कोस्टल रोड, मेट्रो, एक्सप्रेस-वे अशा अनेक गोष्टींची कामे एकाच वेळी सुरू आहेत. त्यामुळे सगळे रस्ते ठिकठिकाणी गर्दीने तुंबलेले..! त्यातून व्हीव्हीआयपी कल्चर हा एक नवा प्रकार मुंबईत वाढीला लागला आहे. शिंदे गटाच्या चाळीस-पन्नास आमदारांना वाय दर्जाची सुरक्षा दिली आहे. त्यांच्या गाड्या  कधीही, कुठेही फिरताना दिसतात. ‘जी-२०’ परिषदेच्या निमित्ताने मुंबईत अनेक देशांचे व्हीआयपी लोक आले आहेत. त्यांना विना अडथळा प्रवास करता यावा म्हणून अनेक रस्ते सर्वसामान्यांसाठी बंद केले आहेत. हल्ली मुंबईच्या रस्त्यांवर कोणी गाणी लिहीत नाही, कविता करत नाही. इथल्या खड्ड्यांचे कोणाला फारसे कौतुकही वाटत नाही. साहित्यिकांच्या, कवींच्या प्रतिभा जणू खड्ड्यांत गेल्या की काय..?  सध्या ‘जी-२०’ साठी वीस देशांचे प्रतिनिधी मुंबईत आले आहेत. त्यांना मुंबईतल्या झोपड्या, घाण रस्ते दिसू नयेत म्हणून चक्क पांढरे कापड किंवा बांधकामावर लावतात तशा हिरव्या चादरी लावून झाकाझाक चालली आहे. यापुढे आणिक काय बोलावे..?  

atul.kulkarni@lokmat.com

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: Mumbai to host G20 Summit but common Mumbaikars facing daily problem Special Editorial Article

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.