मी श्रीलंकन तमिळ म्हणून जन्मलो हा माझा दोष आहे का? - मुरलीधरनचा संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2020 04:54 AM2020-10-21T04:54:13+5:302020-10-21T07:15:38+5:30
‘८००’ या नावाचा मुरलीधरनच्या आयुष्यावर बेतलेला सिनेमा लवकरच येणार असल्याचं टीझर पोस्टर नुकतंच प्रदर्शित झालं. मुरलीधरनचा ‘बायोपिक’ येणार आणि त्यात तमिळ अभिनेता विजय सेथूपती मुरलीधरनची मुख्य भूमिका करणार हे त्या पोस्टरने जगजाहीर केलं. (muthayya muraleedharan 800)
‘मी श्रीलंकन तमिळ म्हणून जन्माला आलो हा काय माझा दोष आहे का?’ असा संताप श्रीलंकन फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनने ट्विटरवर दोन पानी पत्रांत व्यक्त केला आहे. मात्र तरीही त्याच्याभोवतीचं वादाचं वादळ शमलं नाही, उलट या पत्रानं त्यात आगीत तेलाचं काम केलं आणि भारतात, तामिळनाडूत तर अधिकच संताप व्यक्त होऊ लागला.
‘८००’ या नावाचा मुरलीधरनच्या आयुष्यावर बेतलेला सिनेमा लवकरच येणार असल्याचं टीझर पोस्टर नुकतंच प्रदर्शित झालं. मुरलीधरनचा ‘बायोपिक’ येणार आणि त्यात तमिळ अभिनेता विजय सेथूपती मुरलीधरनची मुख्य भूमिका करणार हे त्या पोस्टरने जगजाहीर केलं. एम.एस. त्रिपाठी हा सिनेमा दिग्दर्शित करणार आहे. त्याचं अजून शूटिंगही सुरूझालेलं नाही. २०२१मध्ये त्याचं शूटिंग श्रीलंका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, भारतात इथं होणार आहे. मुरलीधरनने घेतलेल्या ८०० बळींच्या विक्रमाची नोंद म्हणून सिनेमाचं नाव ८०० ठेवण्यात आल्याचं सांगितलं जातं. मात्र एका पोस्टरने तामिळनाडूत मोठा गहजब झाला. #shameofvijaysethupati हे हॅशटॅग मोठ्या प्रमाणात ट्रेण्ड झालं. त्यावर शेकडो पोस्ट पडल्या आणि विजय सेथूपतीने मुरलीधरनची भूमिका करू नये, एक तमिळी असून त्यानं मुरलीधरनची भूमिका करणं हेच अत्यंत चुकीचं आहे असं म्हणत अनेकांनी जाहीर संताप व्यक्त केला. जाहीरपणे विचारलं की, ज्या मुरलीधरनने कायम श्रीलंकन सत्तेला पाठिंबा देत त्यांची भलामण केली, त्याची भूमिका तमिळ सेथूपतीने करावी का? का करावी?
नात तमिलर संघटनेचे नेते काच्ची सिमन यांनी तर स्पष्टच सांगितलं की, मुरलीधरनने कायम श्रीलंकन सिंहलींची बाजू घेतली, तमिळ माणूस भरडला गेला तेव्हाही तो श्रीलंकन सत्तेला पाठिंबा देत होता, आजवर श्रीलंकन सरकारने तमिळींना छळलं तेव्हा मुरलीधरन गप्प बसला. त्याची भूमिका एका तमिळ हिरोने करणं, सिनेमात त्याचं उदात्तीकरण करणं आम्हाला अजिबात मान्य नाही.
हे एका नेत्याचं मत नाही तर अनेक तमिळ नागरिकांनी ट्विटरवर यासंदर्भात भयंकर संताप व्यक्त केला. ख्यातनाम दिग्दर्शक भारथीराजाही म्हणतात की, मुरलीधरन हा धोकेबाज माणूस आहे, त्याची भूमिका सेथूपतीनं करू नये. सिंहली राजवटीत जेव्हा श्रीलंकेत तमिळी माणसांचं शिरकाण झालं तेव्हा मुरलीधरन तमिळ माणसांच्या बाजूने उभा न राहता, सिंहली सत्तेच्या बाजूनं उभा राहिला तर आता त्याच्या बायोपिकचं कौतुक कशाला?
हा आगडोंब बराच उसळल्यावर मुरलीधरनने ट्विटरवर आपलं दोन पानी स्पष्टीकरण दिलं. त्यात तो म्हणतो, ‘मी श्रीलंकेत तमिळ म्हणून जन्मलो हा माझा दोष आहे का? २०१९ साली मी म्हणालो होतो की, २००९ हे माझ्या आयुष्यातलं उत्तम वर्ष आहे. कारण त्यावर्षी अंतिमत: युद्ध संपलं. युद्ध, माणसांचं मरण, हाल, श्रीलंकेत अल्पसंख्य म्हणून जगणं मी अनुभवलं आहे. ते संपलं एवढंच मी म्हणालो होतो तर लोकांनी त्याचा भलताच अर्थ काढून तमिळ वंशच्छेदाचं मी समर्थन करतो असा अर्थ काढला. मी आजवर कधीही निष्पाप जिवांच्या हत्येचं समर्थन केलेलं नाही, भविष्यातही करणार नाही. तमिळ असूनही मी श्रीलंकेत पैसे-प्रसिद्धी कमावली याचा काही लोकांना त्रास होतो आहे. पण मी माझ्या कष्टानं श्रीलंकन संघाचा भाग झालो. भारतात जन्माला आलो असतो तर भारतीय संघाचा भाग व्हायचा प्रयत्न केला असता. श्रीलंकेत अल्पसंख्य म्हणून जगणं, तो गंड मनात घेऊन मोठं होणं, पालकांनाही तेच वाटणं हे सारं मी अनुभवलं आहे. माझ्या वाटचालीत माझे पालक, शिक्षक यांची नोंद हा सिनेमा घेईल असं मला वाटतं!’ श्रीलंकन गृहयुद्धाच्या काळात मुरलीधरनचं क्रिकेटपटू म्हणून घडणं अशी या सिनेमाची संकल्पना आहे. मात्र तमिळी लोकांचा त्यावर राग आहे. एलटीटीई आणि श्रीलंकन सरकार यांच्यातलं गृहयुद्ध २००९ मध्ये संपलं. श्रीलंकन सरकार जिंकलं, त्याबाबत १० वर्षांनंतर २०१९ मध्ये मुरलीधरनने केलेल्या ट्विटवरूनही गदारोळ झाला होता, आताही या सिनेमाच्या निमित्ताने एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे.