संगीतातला ‘देव’ हरपला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 06:31 AM2018-10-31T06:31:39+5:302018-10-31T06:34:31+5:30
मराठी संगीताच्या सुवर्णकाळात संगीतकार, गीतकार, गायनअशा विविध क्षेत्रांत मुशाफिरी करतानाच त्यावर स्वत:चा अमीट ठसा उमटवणाऱ्या व्यक्तिमत्त्वांपैकी एक असलेल्या यशवंत देव यांच्या जाण्याने शब्दप्रधान गायकीतील दुवा निखळला आहे.
कोणाकडेही स्वत:हून काम मागायचा यशवंत देवांचा स्वभावच नसला; तरी चित्रपट संगीत, बालगीते, नाट्यसंगीत, सुगमसंगीत, भावगीतावर त्यांनी ठसा उमटवला. संगीताचे प्रयोग केले. गीतलेखन, गायन केले. प्रत्येक क्षेत्राला नवा आयाम दिला.
मराठी संगीताच्या सुवर्णकाळात संगीतकार, गीतकार, गायनअशा विविध क्षेत्रांत मुशाफिरी करतानाच त्यावर स्वत:चा अमीट ठसा उमटवणाऱ्या व्यक्तिमत्त्वांपैकी एक असलेल्या यशवंत देव यांच्या जाण्याने शब्दप्रधान गायकीतील दुवा निखळला आहे. १९४५ ते १९७५ या काळातील भावगीत, भक्तिगीत, सुगमसंगीत, नाट्यसंगीत आणि चित्रपट संगीताच्या बहराच्या काळात अवीट गोडीचे जे संगीत तयार झाले, त्या साºया क्षेत्रातील यशवंत देव हे उल्लेखनीय नाव. पूर्वीच्या काळी राज्याभिषेकावेळी राजे-महाराजांवर हिरे-मोती-माणिक उधळले जायचे, त्याचप्रमाणे यशवंत देवांनी त्या काळात रसिकजनांवर सुमधुर गाण्यांची मनमुराद उधळण केली. सतार वादनातून आपल्या सांगीतिक कारकिर्दीला सुरुवात करणाºया देव यांच्या प्रतिभेला बहर आला, तो आकाशवाणीत. तेथे मुलांसाठी काम करता करता ते संगीत विभागाशी समरस झाले. वेगवेगळ्या कवींशी संपर्क आला. त्यातून भाषा, गेयता, माधुर्य, चालींशी शब्दांचे नाते यात ते पारंगत झाले. त्या वेळी एखादी कविता किंवा गीत नाकारण्याचा प्रसंग आला, तर ते या नकाराची कारणे तर द्यायचेच; पण चाली लावण्यासाठी पर्यायी गीते-कविताही सुचवायचे. आकाशवाणीचा तो काळ नव्या कल्पना राबवण्याचा, कलावंत घडवण्याचा. त्या वेळी या साºया क्षेत्रात मुशाफिरी करणाºया पु. ल. देशपांडे यांच्या सल्ल्यातून ते गीतकार झाले, संगीतकारही बनले. श्रवणीयता, माधुर्य आणि त्याला तालाची उत्तम जोड देण्याचा त्यांचा अभ्यास यामुळे लवकरच त्यांची स्वत:ची शैली नावारूपास आली. आधी नागपूर, नंतर मुंबई आकाशवाणी केंद्रावर नोकरी करतानाच विविधभारतीत केलेल्या कामातून त्या काळात गाजत असलेल्या हिंदी चित्रपट संगीतांचाही अभ्यास त्यांनी केला. शास्त्रीय संगीताची बैठक असलेल्या आणि त्याचवेळी क्लिष्टतेपेक्षा सहज गुणगुणता येणाºया चालींवर काम करता करता मनोमन त्यांनी प्रसिद्ध संगीतकार अनिल विश्वास यांना गुरूस्थानी मानले. ग. दि. माडगूळकर आणि सुधीर फडके यांचे गीतरामायण प्रचंड यशस्वी झाल्यानंतर प्रसिद्ध बॅले नर्तक सचिन शंकर यांनी रामायणावरच नृत्यनाट्याची (बॅले) तयारी केली. त्यासाठी गदिमांकडूनच त्यांनी गाण्यांसहित ‘कथा ही रामजानकीची’ या नावाचे नृत्यनाट्य लिहून घेतले आणि साहजिकच संगीतासाठी ते बाबूजींकडे गेले. पण गीतरामायणाचे कार्यक्रम अखंड सुरू असल्याने काही काळ तरी ‘राम’ या विषयावर नवीन काहीही करणार नसल्याचे बाबूजींनी सचिन शंकर यांना सांगितले. त्याचवेळी त्यांना यशवंत देव यांचे नाव सुचवले. नवा अनुभव म्हणून देवकाकांनीही हे संगीताचे काम केले आणि हे देखणे नृत्यनाट्य आकाराला आले. त्यात काही पूर्ण गाणी होती, काही गाणी अगदी चार-चार ओळींची होती. याबरोबरच रेडिओवर मंगेश पाडगावकरांच्या ‘राधा’ नावाच्या संगीतिकेला उत्तम संगीत देण्याचे श्रेयही यशवंत देव यांच्या खात्यावर जमा आहे. ‘माघाची थंडी माघाची, थंडीची धुंदी थंडीची’ ही त्यांची लावणी आधी रेकॉर्ड न होता लंडन कार्यक्रमात सादर झाली. गाजली आणि नंतर रंजना जोगळेकरांच्या आवाजात ध्वनिमुद्रित झाली. याच लावणीतील ‘अर्ध्या रातीला आता कुठं जाता?’ ही पंचलाइन अलीकडच्या काळात ‘मला जाऊद्या ना घरी, आता वाजले की बारा’ असे हुबेहूब स्वररूप घेऊन अवतरली. चित्रपट संगीतात ते जरी फारसे रमले नसले, तरी भावसंगीताचे ते खºया अर्थाने देवच होते. केवळ शब्दांचे नव्हे, तर श्वासाचेही सुरांशी नाते असते, असे ते कायम सांगत. आयुष्यात धनरेषा नसली तरी चालेल, पण स्मितरेषा हवी, असे सांगत त्यांनी तेवढ्याच ताकदीने केलेली विडंबने रसिकांना आनंद देऊन गेली. नंतरच्या काळात त्यांच्यावर ओशो रजनीश यांच्या विचारांचा प्रभाव पडला. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही आयुष्य बदलू शकत नाही. ते जसे असते तसे स्वीकारायचे असते. आहे तो क्षण जगायचा, स्वीकारायचा हे तत्त्व त्यांनी अखेरपर्यंत पाळले. तीच समाधानी वृत्ती त्यांच्या प्रत्येक संगीतकृतीतून झंकारली. तो निनाद आता फक्त आठवणींच्या रूपातच उरला आहे.