मुस्लिम मराठी साहित्याचे महाराष्ट्राच्या संस्कृतीशी अतूट नाते!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2023 07:16 AM2023-01-28T07:16:15+5:302023-01-28T07:16:23+5:30

मराठी मुसलमानांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचे प्रतिबिंब मराठी साहित्यात जितक्या प्रभावीपणे यायला हवे, तितक्या प्रभावीपणे ते आलेले नाही.

Muslim Marathi literature has an unbreakable relationship with the culture of Maharashtra! | मुस्लिम मराठी साहित्याचे महाराष्ट्राच्या संस्कृतीशी अतूट नाते!

मुस्लिम मराठी साहित्याचे महाराष्ट्राच्या संस्कृतीशी अतूट नाते!

googlenewsNext

अब्दुल कादर मुकादम
अ. भा. मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष

मराठी मुसलमानांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचे प्रतिबिंब मराठी साहित्यात जितक्या प्रभावीपणे यायला हवे, तितक्या प्रभावीपणे ते आलेले नाही.

गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात अनेक मुस्लिम लेखक मराठीतून लेखन करत आहेत. या लेखकांना आपल्या व्यथा वेदना आणि नातेसंबंधांतून निर्माण होणारे भावनिक ताणतणाव प्राधान्याने काव्यातून व्यक्त करावेसे वाटतात. साहजिकच या लेखनात काव्य निर्मिती अधिक झालेली दिसते. तरीही काही लेखकांनी आपले जीवनानुभव गद्य लेखनातूनही व्यक्त केले आहेत. 

मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन हे त्याचे पुढचे पाऊल होते. त्यामुळेच गेल्या काही वर्षांपासून मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे नियमित आयोजन करण्यात येत आहे. ही प्रथा खरोखरच स्वागतार्ह आहे; पण मुस्लिम मराठी लेखकाची ही साहित्य निर्मिती आणि साहित्य संमेलने चिकित्सक साहित्यिक चर्चेचे विषयही झाले आहेत. ही या नाण्याची दुसरी बाजू आहे.

सर्वच भाषांच्या साहित्यिक निर्मितीविषयी मुक्त चर्चा होणे हे त्या भाषेच्या आणि त्या भाषेत निर्माण होणाऱ्या साहित्याच्या प्रगतीचे व्यवच्छेदक लक्षण मानले जाते, तेव्हा मुस्लिम मराठी साहित्य निर्मितीविषयी मुक्त चर्चा होत असेल तर ते मुस्लिम मराठी साहित्याच्या प्रगतीच्या दृष्टीने योग्य आहे, असे समजून त्या चर्चेचे स्वागत केले पाहिजे; पण या चर्चेत काही मूलगामी मुद्दे उपस्थित करण्यात आले असतील तर त्याची योग्य ती दखल घेऊन या साहित्यिक वेगळेपणाचे स्वरूप उलगडून दाखविणे ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे.

या पार्श्वभूमीवर मुस्लिम मराठी साहित्याचा विचार करू गेल्यास आपल्या लक्षात येईल की मुस्लिम मराठी साहित्यिक ज्या मराठी भाषेतून आपल्या साहित्याची निर्मिती करत असतात ती मुख्य प्रवाहातील मराठीपेक्षा कुठल्याही अर्थाने वेगळी नाही. किंबहुना त्यांच्यात पूर्णतः एकरूपता आहे. मात्र, मराठी मुसलमानांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनपद्धतीतील एक पैलू मराठी भाषा आणि संस्कृतीच्या विविध पैलूंपेक्षा काहीसा वेगळा असतो. मराठी भाषा आणि संस्कृतीच्या मूलभूत स्वरूपातील हे वेगळेपण आहे, असा त्याचा अर्थ होत नाही. हे वेगळेपण कौटुंबिक आणि सामाजिक जीवनातील आहे आणि त्याचा उद्गमबिंदू धर्मभिन्नतेमुळे त्याच्या दैनंदिन जीवनशैलीत आणि संस्कृतीत झालेल्या परिवर्तनात आहे किंवा असतो. हे गुणात्मक परिवर्तन विचारात घेतल्याशिवाय मुस्लिम मराठी साहित्याची समीक्षा योग्य रीतीने करता येत नाही. कारण मुस्लिम मराठी साहित्यातील हा पैलू एकीकडे आपल्या वेगळेपणाचे दर्शन घडवीत असतो तर दुसरीकडे व्यापक मराठी साहित्याशी आणि पर्यायाने मराठी संस्कृतीशी असलेले अतूट नाते अधोरेखित करीत असतो.

मुख्य मराठी साहित्य प्रवाहाशी असलेले अतूट नाते समजून घेण्यासाठी मराठी मुसलमानांच्या तीन अस्मिता समजून घेणे आवश्यक आहे. ज्या आई-वडिलांच्या पोटी मूल जन्माला येते त्यांचा धर्म त्याला आपोआपच प्राप्त होतो, ही त्याची पहिली अस्मिता असते. त्या मुलाचे आईबाप ज्या प्रदेशाचे मूळ रहिवासी असतात ती त्याची प्रादेशिक, म्हणजेच दुसरी अस्मिता असते आणि त्या मुलाचे आई-वडील भारताचे नागरिक असतात. त्यामुळे भारताचे नागरिकत्व ही त्याची तिसरी आणि राष्ट्रीय अस्मिता असते. महाराष्ट्रात दहा-पंधरा टक्के असलेल्या मराठी मुसलमानांच्या काहीशा वेगळ्या परंतु वैशिष्ट्यपूर्ण सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचे प्रतिबिंब मराठी साहित्यात जितक्या प्रभावीपणे यायला हवे, तितक्या प्रभावीपणे ते आलेले नाही. नव्या पिढीतील मुस्लिम मराठी साहित्यिकांच्या लेखनातून मुस्लिम समाजाची व्यथा, वेदना आणि निराशा मोठ्या प्रमाणावर प्रतिबिंबित झालेली आढळते. अर्थात ते समाजजीवनाचे वास्तव असल्यामुळे साहित्य व्यवहारात त्याचे प्रतिबिंब पडणे साहजिक आहे. पण हे मान्य केल्यानंतरही, आशावाद हाच मुस्लिम मराठी साहित्याचा स्थायीभाव आहे, असे मला वाटते. 
(नाशिकमध्ये आजपासून सुरू होत असलेल्या नवव्या अ. भा. मुस्लिम मराठी साहित्य संमेलनानिमित्त संमेलनाध्यक्षांच्या भाषणाचा संपादित सारांश.)

Web Title: Muslim Marathi literature has an unbreakable relationship with the culture of Maharashtra!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.