तुझ्या साडीपेक्षा माझी साडी जास्त स्वच्छ..!

By अतुल कुलकर्णी | Published: October 9, 2022 11:20 AM2022-10-09T11:20:18+5:302022-10-09T11:20:45+5:30

माझा साबण कष्टाचा, मेहनतीचा आहे. मी त्यासाठी स्वतः झिजून पैसे कमावले आणि मग हा साबण तयार झाला...

My saree is cleaner than your saree..! | तुझ्या साडीपेक्षा माझी साडी जास्त स्वच्छ..!

तुझ्या साडीपेक्षा माझी साडी जास्त स्वच्छ..!

googlenewsNext

अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई 
दोन्ही साहेब हो,
जय महाराष्ट्र... वंदे मातरम्...
कालच गल्लीच्या कोपऱ्यावर दोन बायका भांडत होत्या. तुझी साडी जास्त शुभ्र  की माझी..? यावरून त्यांच्यात वाद सुरू होता. एक जाहिरात येते ना टीव्हीवर... तेरी साडी से मेरी साडी सफेद कैसे...? तसाच हा प्रकार होता... गल्लीतला मामला आहे, थेट दिल्लीपर्यंत म्हणजे पोलीस ठाण्यात जाईल म्हणून मी मध्ये पडलो... भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. तर दोघी माझ्यावरच ओरडल्या, तू आधी माझ्या बाजूने की तिच्या बाजूने हे स्पष्ट कर... असं त्या म्हणू लागल्या. त्यांचे भांडण मुळात कोणाची साडी जास्त शुभ्र यावरून सुरू होते. मला मध्ये ओढण्याचे काहीच कारण नव्हते. तरीही मी त्यांना म्हणालो, आधी तुमचं भांडण मिटवा... मग मी ठरवेन कोणाच्या बाजूने जायचं ते... ते कदाचित त्या दोघींना पटलं असावं... त्यामुळे त्या आणखी जोरात भांडू लागल्या... 

साहेब हो, त्या दोघींचं भांडण तुम्हाला माहिती 
असावं, म्हणून पत्राद्वारे त्यांचं भांडण जशास तसे लिहून पाठवलं आहे.
माझा साबण कष्टाचा, मेहनतीचा आहे. मी त्यासाठी स्वतः झिजून पैसे कमावले आणि मग हा साबण तयार झाला... तू गं नकटे... तू काय केलंस... कुठून पैसे कमावले कोणास ठाऊक..? जास्तीचे पैसे देऊन ब्रँडवाला साबण कोणीपण आणेल...  अशा महागड्या साबणामुळे नुसता वरचा रंग स्वच्छ झाल्यासारखा दिसेल... आत साचलेला मळ कसा जाणार...? 
अगं ब्रँडेड साबणाचेच दिवस आहेत आता. पिढ्यानपिढ्या वारसा हक्काने साबण बनवणाऱ्यांचे दिवस गेले आता... त्यांना नीट ब्रॅण्डिंग करता येत नाही... साधं साबणाचे सॅम्पल द्यायचं म्हटलं तरी त्यांच्या जिवावर येतं. सगळं माझंच म्हणून ते कवटाळून बसतात... म्हणून तर हल्ली तुझ्या साबणाला कोणी विचारत नाही... 
तू मोठी आली टवळी, सॅम्पल वाटणारी... तुझं काय गं, हापापाचा माल गपापा... कॉर्पोरेट कंपन्या तुम्ही... फुकट वाटायच्या नावाखाली आमच्याकडूनच पैसे घेता आणि फुकट वाटण्याचं नाटक करता... मी किती कष्टाने सगळं उभं केलंय माहिती आहे का तुला...? माझ्या दोन पिढ्या हा साबण विकत आल्या आहेत. घराघरात गेलाय माझा साबण... मी पाया रचला म्हणून तू आज एवढा तोरा दाखवत आहेस, हे विसरू नकोस...

हो जसं काही तूच सगळं केलंस...? आम्ही काहीच नाही केलं का...? आम्ही पण टपऱ्या चालवत होतो, रिक्षा चालवत होतो तेव्हापासून तुझा साबण विकत आलोय... आम्ही कष्ट केले... तू एसी घरात बसून हुकूम सोडत होतीस. मार्केटमध्ये तर आम्हीच फिरत होतो ना... मराठी माणसाचा साबण आहे, याच साबणाने कपडे धुवा... असे आम्हीच तर गावभर सांगत होतो. या साबणानेच आम्ही यूपी, बिहारी कपडेदेखील स्वच्छ केले.... मराठी शर्टावर परप्रांतीयांच्या इडली-डोश्याचे, छटपूजेच्या रंगांचे डागदेखील आम्हीच स्वच्छ करत आलो...  ते नाही तुझ्या लक्षात... कष्ट तर आम्ही केले ना...
काबाडकष्ट तर बांधकामावरचा मजूरदेखील करतो... म्हणून काय बिल्डिंग त्याने बांधली असे होते का...? बिल्डिंगचा आर्किटेक्ट जास्त महत्त्वाचा असतो... हे तुला नाही कळायचं... तुला आयत्या बिल्डिंगमध्ये जाऊन राहायची सवय लागलीय... तुम्ही घरचे म्हणून डोक्यावर घेतलं, तर तुम्ही डोक्यावरच मिरे वाटायला लागलात.... तुमच्यापेक्षा जो बारामतीचा विक्रेता बरा... तुम्ही सोडून गेलात तरी तो मात्र माझ्या सोबतच आहे... त्याला अजूनही माझ्या साबणावर विश्वास आहे....

हाच तर प्रॉब्लेम आहे तुझा... तो बारामतीचा विक्रेता कसा आहे तुला माहिती नाही... चांगला चांगला म्हणून तुला पाण्यात भिजवून ठेवेल... कधी विरघळून जाशील कळणारदेखील नाही... तेव्हा बसशील त्याच्या नावाने बिनासाबणाचे कपडे धुवत... 
साहेब हो, या दोघी अजून बरंच काही काही बोलल्या... अगदी दीड वर्षाच्या नातवापर्यंत त्यांची भांडण गेली... त्यातल्या एकीला घेऊन नागपूरची एकजण  दिल्ली दाखवायला आणि भारीतला भारी साबण घेऊन द्यायला जाणार आहे, अशी माहिती हाती आली आहे... कोणता तरी एक साबण गळून जायच्या आत काहीतरी करायला हवं, असं मला वाटतं...! आपण सुज्ञ आहात. काय ते बघून घ्यालंच...
- आपला बाबूराव

Web Title: My saree is cleaner than your saree..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.