माझी सत्त्वपरीक्षा

By admin | Published: December 28, 2016 02:43 AM2016-12-28T02:43:17+5:302016-12-28T02:43:17+5:30

एका कार्यक्रमात परिचय करून देताना, सूत्रसंचालकाने सरांना अध्यात्माची फ ार आवड असल्याचे सांगितले़ कार्यक्रम संपताच दोन ग्रामीण महिला भेटीस आल्या.

My sattva exam | माझी सत्त्वपरीक्षा

माझी सत्त्वपरीक्षा

Next

- डॉ. गोविंद काळे

एका कार्यक्रमात परिचय करून देताना, सूत्रसंचालकाने सरांना अध्यात्माची फ ार आवड असल्याचे सांगितले़ कार्यक्रम संपताच दोन ग्रामीण महिला भेटीस आल्या. म्हणाल्या सर, अध्यात्म म्हणजे काय ते जरा समजावून सांगा ना! माझी ही सत्त्वपरीक्षा होती़ एका कागदावर टिंब काढले़ टिंबाभोवती सुमारे वीस-बावीस वर्तुळे काढली़ त्याखाली लिहिले अध्यात्म़ कागद त्यांच्यापुढे सरकविला़ सर, आम्हाला तर अध्यात्म काहीच कळले नाही़ समजाविले तर फार बरे होईल़
टिंब म्हणजे जीव़ तो एकटाच येतो, पण जन्मल्याक्षणीच त्याच्या भोवती ऋणानुबंधाची वर्तुळे तयार होतात़ ऋणानुबंध नावाच्या मायेला तो कवटाळून घेतो़ तो कोणाचा तरी पुत्र-भाऊ-नातू-पुतण्या असतो़ जीवाचे नामकरण होते. एकेक वर्तुळ वाढतच जाते़ तो समाजाचा होतो, राष्ट्राचा होतो़ त्याला ओळख प्राप्त होते़ हाच आपला परिचय म्हणून तो नवनव्या वर्तुळांमधून फिरत राहतो़ वय वाढते़ वाढत्या वयानुसार त्याला प्रश्न पडतो़ ‘कोऽ हम्’ मी कोण आहे़ त्याचा परतीचा प्रवास सुरू झालेला असतो़ माणसागणिक एकेक वर्तुळ सुटत जाते़ शेवटी तो बिंदूपाशी येऊन थांबतो़
‘क्वस्त्वं को ऽ हं कुत आयात:
को मे जननी को मे तात:’
असा प्रश्र्न तो स्वत:लाच करतो़ जीवनाच्या जायते- जन्माला येणे, अस्ति- अस्तित्व, वर्धते- वाढ होणे, विपरिणमते- बदल होणे, अपक्षीयते- झीज होणे आणि शेवटची विनश्यति म्हणजे अंत, नष्ट होणे़ यातील पाचवी अवस्था अपक्षीयते म्हणजे झीज तो ती जगत असून अंतिम अवस्थेकडे जीवाची वाटचाल सुरू होते़
अशा वेळी त्याला जीवनाचा नवा साक्षात्कार घडतो़ जीव म्हणतो या दातांनी खूप चर्वण केले आता दात आपली जागा सोडू लागतात़ स्मरणशक्तीची अनेक पारितोषिके पटकावलेला विद्यावाचस्पती म्हणतो की आता काहीच लक्षात राहत नाही़ वारंवार केसांवरून कंगवा फिरवणारा तरुण, वार्धक्यात म्हणतो टक्कल कसे पडले ते कळलेच नाही़ उतारवयातील हा प्रवास पुनश्च बिंदूपाशी येऊन थांबतो़ विनश्यति ही शेवटची एकच अवस्था जीवाची शिल्लक असते़
आपले आयुष्य कसे सरले? फुकट गेले ही भावना तीव्र होऊन जीव सत्याचा शोध घेऊ लागतो़ याचेच नाव ‘अध्यात्म’़ सत्य काही केल्या सापडत नाही़ हजारो वर्षांपूर्वी रचलेल्या उपनिषदातून हेच सत्य मांडले आहे़
हिरण्मयेन पात्रेण सत्यस्याऽपिहितं मुखम्
तत्त्वं पूषन् अपावृणु सत्यधर्माय दृष्टये॥
ज्ञानाचा दिवा बाहेर नसतो, तो तर आतच असतो याची पुसट जाणीव अंतकाळी व्हायला लागते़ त्याला वाटते अध्यात्म समजून घ्यावे़ वेळ गेलेली असते़ आयुष्य सरलेले असते़ इंद्रिये बलवान असतानाच अध्यात्माची ज्योत पेटली तर प्रवास सुखाचा-समाधानाचा-शांतीचा होतो़ दोघी महिला हात जोडून म्हणाल्या आम्हाला अध्यात्म कळले़ मी सुटकेचा नि:श्वास टाकला़

Web Title: My sattva exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.