माझा मुलगा भलता गोडय ना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 02:09 AM2018-03-21T02:09:49+5:302018-03-21T02:09:49+5:30
(अब्राहम लिंकनच्या पत्राचा कविवर्य वसंत बापट यांनी केलेला अनुवाद त्या काळात योग्य होता. आजच्या काळात तो असा हवा. त्या दोघांची क्षमा मागून हा अनुवाद)
(अब्राहम लिंकनच्या पत्राचा कविवर्य वसंत बापट यांनी केलेला अनुवाद त्या काळात योग्य होता. आजच्या काळात तो असा हवा. त्या दोघांची क्षमा मागून हा अनुवाद)
प्रिय सर,
सगळीच माणसं घोटाळेबाज असतात,
नसतात सगळीच तत्त्वनिष्ठ...
हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी...
मात्र त्याला हे देखील शिकवा... की,
प्रत्येक घोटाळ्यामागे राजकीय हात असतोच.
आणि साधूसारखा वाटणारा गुंडदेखील...!
राजकारणी स्वार्थीच असतात देशात,
आणि असतात सगळं आयुष्य ‘स्व’साठी
जगणारे नेतेही पुष्कळ...!
वेळ आली की सूड घेणारे मित्र
फक्त राजकारणातच असतात.
मला हे देखील माहिती आहे की, सगळे
घोटाळे त्याला पटापट नाही करता येणार...!
तरीही जमलं तर त्याच्या मनावर हेच ठसवा...
की, आजच्या जगात घाम घाळून
कमाई करण्यापेक्षा घोटाळे करून
कमाई करण्यातच शहाणपण आहे...!
कितीही बदनामी झाली तरी,
हसत हसत सामोरं कसं जायचं हे देखील
त्याला शिकवा... आणि शिकवा वरकमाई
कशी मार्गी लावायची ते...!
हे सगळं शिकवताना काही गोष्टी त्याला
तुम्हीच सांगा, जसे की, रोज रात्री ट्रायडंटमध्ये
जाऊन छटाक आनंद कसा साजरा करायचा?
पहाटे उठून कुणाला काही कळायच्या आत
शासकीय बंगल्यावर कसे गुपचूप यायचे,
तेही शिकवा त्याला, कारण ही कला
आलीच पाहिजे त्याला, यशस्वी होण्यासाठी.
गुंडांना भीत जाऊ नको असंही सांगा त्याला,
त्यांच्याशी दोस्ती कशी करायची, हे शिकवा!
उगाच त्याला पुस्तकं,
ग्रंथभांडारं दाखवत बसू नका...
त्यापेक्षा, सूड कसा घ्यावा याचा विचार
करण्यासाठी त्याच्या मनाला निवांतपणा
कसा मिळेल हे सांगा...!
सृष्टीचं शाश्वत सांैदर्य अनुभवण्यापेक्षा, आणि
पक्ष्यांची अस्मानभरारी पाहत बसण्यापेक्षा
हे दिवस भौतिक सुखाचे आहेत, हे त्याला
पक्के ठसवून द्या...
हिरव्यागार डोंगरावरची फुलं पाहण्यापेक्षा,
ते डोंगर कापून त्याचा पैसा कसा करायचा,
ते आधी त्याला शिकवा,
कारण तेच कामी येणार आहे...!
शाळेत त्याला हा धडा मिळू दे...
की फसवून मिळालेलं यशच
सगळ्यात श्रेयस्कर असतं.
आपल्या कल्पना, आपले विचार याच्यावरच
दृढविश्वास ठेवत जा, असं त्याला सांगा...
उगाच सत्य आणि न्याय वाटते म्हणून
लढण्याचे दिवस संपलेत, हेही शिकवा...
सरकार कोणतही असो, घोटाळ्यांमधून
तावून-सुलाखून निघाल्याशिवाय
त्याला आणखी मोठे घोटाळे
कसे करता येणार सर...
उगाच धीर धरण्याच्या गोष्टी नका शिकवू...
त्यापेक्षा मनात आलं की कसं मिळवायचं
हे त्याला सांगा...!
मानवजातीवर उदात्त श्रद्धा बाळगण्याचे दिवस
कधीच संपलेत सर, हे त्याला आवर्जून सांगा.
माफ करा सर, मी फार बोललो, पण हे
तुम्हाला करावंच लागेल...
नाही तर तो कसा टिकणार या स्पर्धेत...?
कारण तीच काळाची गरज आहे बरं का...
माझा मुलगा, भलताच गोड आहे ना सर...?
(तिरकस)