गूढ आणखी वाढले
By admin | Published: October 18, 2015 11:25 PM2015-10-18T23:25:50+5:302015-10-18T23:25:50+5:30
घरकामात मदत करण्यासाठी म्हणजेच गृहसेविका बनण्यासाठी तामिळनाडूमधून सौदी अरेबियातील रियाध येथे गेलेल्या कस्तुरी मुनीरत्नम नावाच्या एका मध्यमवयीन
घरकामात मदत करण्यासाठी म्हणजेच गृहसेविका बनण्यासाठी तामिळनाडूमधून सौदी अरेबियातील रियाध येथे गेलेल्या कस्तुरी मुनीरत्नम नावाच्या एका मध्यमवयीन महिलेचा उजवा हात कलम करण्यात आल्याचे एक वृत्त अलीकडेच प्रकाशित झाले होते. काम सोडून पळून जाण्याचा प्रयत्न केल्याची शिक्षा म्हणून तिला कामावर ठेवलेल्या एका महिलेनेच हे कृत्य केल्याचे वृत्तात म्हटले होते. त्यासाठी कस्तुरीच्या भारतातील नातलगांचा हवाला देण्यात आला होता. वृत्त प्रकाशित होताच परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी त्याची तत्काळ दखल घेतली आणि सौदी अधिकाऱ्यांकडे निषेध नोंदवून खुलाशाची मागणी केली. पंतप्रधान नरेन्द्र मोदी अलीकडेच त्या देशाच्या दौऱ्यावर जाऊन आल्याने आणि मोदींचे तिथे उत्स्फूर्त स्वागत झाल्याने घडल्या प्रकाराची लगेचच चौकशी केली जाईल आणि दोषी व्यक्तीला दंडित केले जाईल अशी अपेक्षा होती. त्यानुसार सौदी सरकारने चौकशी केली आणि या चौकशीचे निष्कर्ष आता जाहीरझाले असून, हे निष्कर्ष आणि त्याआधारे केला गेलेला खुलासा गूढ वाढविणाराच आहे. सदर महिला मनोरुग्ण असून, नोकरी सोडून पळून जाण्याच्या प्रयत्नात तिने वरच्या मजल्यावरून उडी मारली व त्यात तिचा उजवा हात निकामी झाल्याने कलम करावा लागला असे या खुलाशात म्हटले आहे. त्यासाठी पोलिसांनी संबंधित हॉस्पिटलचा हवालाही दिला आहे. छोट्या मोठ्या अपराधांसाठी फटके मारणे, हाताची बोटे किंवा हात कलम करणे यांसारख्या शिक्षा अरब देशांच्या बाबतीत नव्या नाहीत. त्यामुळे याचा आधार घेऊन कस्तुरीच्या नातलगांनी जाणीवपूर्वक चुकीची माहिती दिली, की आपल्या नागरिकाचे रक्षण करण्यासाठी सौदी पोलीस चुकीचा खुलासा करीत आहेत असा संभ्रम यातून निर्माण होत असल्याने त्यातील गूढ अधिकच वाढले आहे.