समजुतीचे घोटाळे
By admin | Published: September 30, 2016 04:20 AM2016-09-30T04:20:46+5:302016-09-30T04:20:46+5:30
एका सैनिकाने (दैनिक नव्हे!) एक व्यंगचित्र काय काढले आणि त्यातून किती समजुती झाल्या, किती समजुतीचे घोटाळे झाले आणि किती समजुती काढल्या गेल्या याची
एका सैनिकाने (दैनिक नव्हे!) एक व्यंगचित्र काय काढले आणि त्यातून किती समजुती झाल्या, किती समजुतीचे घोटाळे झाले आणि किती समजुती काढल्या गेल्या याची काही गणतीच नाही. या व्यंगचित्रापायी लोकसभेतील एक आणि विधानसभेतील दोन सैनिकांनी राजीनामे सादर केले. ते ज्या सभागृहांचे सदस्य आहेत त्यांच्या पीठासन अधिकाऱ्यांना ते समक्ष नेऊन द्यावे लागतात याची समज नसल्याने वा पक्ष प्रमुखांकडे ते दिले तरी चालते या समजुतीने त्यांनी तसे केले. त्यावर पक्ष प्रमुखांनी म्हणे त्यांची समजूत काढली आणि त्यांनी उपसलेले राजीनामास्त्र म्यान करुन टाकले. आपला रोष व्यक्त करण्यासाठी कोणाकडेही का होईना प्रत्यक्ष राजीनामा देण्याची गरज नसते, तशी नुसती बातमी येणेही पुरेसे असते या समजुतीतून एका सैनिक खासदाराने आपल्या मित्र बातमीदाराला फोन करुन ‘तशी’ बातमी द्यायला सांगितले. उगा समजुतीचा घोटाळा नको म्हणून ‘आपल्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण तो होऊ शकला नाही’ अशी ओळदेखील त्या बातमीत टाकायची सूचना केली. पण पुन्हा समजुतीचा घोटाळा नको म्हणून त्या बातमीदाराने समजून उमजून ती बातमी दिलीच नाही. ‘व्यंगचित्र प्रसिद्ध केले, चूक झाली, दिलगिरी व्यक्त करतो’ असे काही तरी सैनिकाकरवी केले जाईल या समजुतीने काहींनी तसे होण्याची अपेक्षा गैरसमजुतीतून व्यक्त केली. पण सैनिकात प्रसिद्ध होणाऱ्या गोष्टींशी संपादक सहमत असतातच असे नसल्याने दिलगिरी व्यक्त करण्याची काही गरज नाही या ठाम समजुतीतून दिलगिरी आलीच नाही. सैनिक ज्या व्यापक सैन्यबळाचा एक घटक आहे त्या व्यापक सैन्यदळाची एकूणच भूमिका (असलीच तर!) काय आहे, याची पुरती समज समस्त जनतेला असल्याच्या समजुतीमधून आणि त्यापायीच गैरसमजुतीची काही गुंजाईशच नसल्याची स्वत:च स्वत:च समजूत करुन घेऊन माफी गिफी आली नाही. सैनिक जे काही छापते वा खरडते तो अभिव्यक्तीचा आविष्कार असतो आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जपणूक हे सैनिकाचे ब्रीद असल्याने जो अभिव्यक्त झाला त्याची दिलगिरी पुरेशी आहे असेही समजावले गेले. यातून जनतेने आता एक समजून घ्यावे की त्यांचे जे असते ते निखळ अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि इतरांचे असते ते तद्दन सैराट स्वातंत्र्य!