रस्त्यावरची लढाई लढणारा शेवटचा मालुसरा काळाच्या पडद्याआड

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 05:26 AM2022-01-18T05:26:29+5:302022-01-18T05:28:58+5:30

राज्यातल्या गोरगरिबांसाठी एन. डी. विधानसभेत लढले, रस्त्यावर लढले. ते गेले... आता रस्त्यावरच्या लढाईला कुणी वाली उरला नाही!

n d patil The last Commander to fight a street battle passes away | रस्त्यावरची लढाई लढणारा शेवटचा मालुसरा काळाच्या पडद्याआड

रस्त्यावरची लढाई लढणारा शेवटचा मालुसरा काळाच्या पडद्याआड

Next

- मधुकर भावे, लोकमतचे निवृत्त संपादक

एन. डी.  गेले. महाराष्ट्राच्या लढाऊ परंपरेतील शेवटचा मालुसरा धारातीर्थी पडला. गणपतराव देशमुख यांच्यापाठोपाठ एन. डी. यांनी जाणे म्हणजे अन्याय-अत्याचाराविरोधातील रस्त्यावरची लढाई लढणाऱ्या सेनापतीनेच जाणे आहे. एन. डी. यांच्या निधनानंतर सामान्य माणसांचा आवाज बुलंद करून रस्त्यावर उतरण्याची हिंमत दाखवणारा आता कोणीही राहिला नाही. 

एन. डी. नावाचा हा योद्धा रस्त्यावरची सामान्य माणसाची लढाई लढतच राहिला.  त्याचवेळी वैचारिक आघाडीवर भल्या-भल्या बुद्धिवंतांची, विधानसभेत भल्या-भल्या मंत्र्यांची फटफजिती करण्याची वैचारिक ताकद एन. डी. यांच्या विचारांत होती. अभ्यासात, वागण्यात आणि चारित्र्यातही होती. त्यामुळेच शरद पवार यांचे सख्खे मेहुणे असतानाही आपल्या वैचारिक भूमिकेशी एन. डी. यांनी आयुष्यभर कधीच तडजोड केली नाही. जिथे लढा आहे तिथे एन. डी. आहेत. मग तो बेळगाव-कारवारचा सीमा लढा असो, महागाईविरोधातील लढा असो, संयुक्त महाराष्ट्राचा लढा असो, सेझविरोधातील रायगडच्या शेतकऱ्यांचा लढा असो, नाहीतर कोल्हापूरच्या टोलनाक्याचा लढा असो; जाती-पातीची नात्यागोत्याची किंवा सत्तेची पर्वा एन. डी. यांनी कधीच केली नाही. भक्कम वैचारिक भूमिका, भरदार-पिळदार शरीरयष्टी... माईक असो किंवा नसो.... हजार-पाच हजार लोकांपर्यंत खणखणीतपणे ज्याचा शब्दन् शब्द पोहोचत होता, त्याचे नाव एन. डी. पाटील!



दोन हातात दोन दांडपट्टे घेऊन लढणारी एन. डी. यांची अनेक रूपे आज डोळ्यांसमोरून तरळतात. इस्लामपूरचा गोळीबार.... चार तरुण मृत्युमुखी पडलेले... त्यामध्ये एन. डी. यांचा सख्खा पुतण्या.... गणपतराव सांगतात, ‘मोर्चा थांबवूया’..... एन. डी. म्हणतात, ‘नाही... बिलकूल नाही... मोर्चा थांबणार नाही..’ आणि हजाराेंचा मोर्चा पुतण्याच्या प्रेताला आडवे जाऊन कचेरीवर धडकतो..... 

रायगडच्या सेझच्या शेतकऱ्यांचा लढा चिरडून टाकण्यासाठी मुकेश अंबानी यांनी सगळी ताकद पणाला लावली होती. शांततामय मार्गाने हजारो शेतकऱ्यांना नागोठणे-वडखळ रस्त्यावर उतरवून एन. डी. यांनी तो लढा  लढवला आणि अंबानींना पळता भुई थोडी केली.

एन. डी. विधानसभेत लढले, रस्त्यावर लढले. तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण त्यांना म्हणाले होते, ‘तुम्ही कितीही जोरात बोललात तरी बहुमत आमच्या मागे आहे.’ एन. डी. ताडकन् म्हणाले.... ‘होय... मुख्यमंत्रीसाहेब, बहुमत तुमच्या मागे आहे हे मला मान्य आहे म्हणून तर तुम्ही सत्तेवर आहात. लोकशाहीचा खेळ एकावन्न विरुद्ध एकोणपन्नास असाच असतो. त्या खेळात तुमच्यासोबत एकावन्न आहेत; पण आम्ही रस्त्यावर जेव्हा लढाई लढायला उतरतो तेव्हा आमच्यासोबत एकावन्न असतात, हे लक्षात ठेवा... डोकी मोजून सत्ता मिळत असली तरी रस्त्यावरच्या लढाईत आमचेच बहुमत आहे.
आम्हाला सत्तेची पर्वा नाही...’ - एन. डी. यांना सत्तेची पर्वा कधीच नव्हती. रयत शिक्षण संस्थेच्या कार्याध्यक्षपदाचा काळ सोडला तर एन. डी. यांनी सगळा महाराष्ट्र एस. टी.च्या लाल डब्यात बसूनच पिंजून काढला आहे. संपूर्ण महाराष्ट्र पायाखाली घातलेला एन.डी. यांच्यासारखा नेता दुसरा नाही.



सामान्य माणसांच्या बांधिलकीचे राजकारण गणपतराव देशमुख आणि एन. डी. यांच्यासोबतच संपले.  संप तोडून काढणारे आता सत्तेत आहेत आणि एस. टी. ने फिरणारे एन. डी. आता राहिले नाहीत. तो लढावू महाराष्ट्र आता संपलेला आहे. 

शेवटचा लढवय्या म्हणजे एन. डी. पाटील! गरीब माणसांच्या प्रश्नांशी महाराष्ट्रात आता कोणालाही काही पडलेले नाही. मुंबईचा गिरणी कामगार मॉलच्या अक्राळविक्राळ इमारतींखाली चिरडला गेला. शेतकऱ्यांचा वाली असलेला शेवटचा मालुसरा एन. डी. यांच्या रूपाने आता अस्तंगत पावला आहे. 
एन. डी. यांना त्यांच्या धर्मपत्नी माईंनी शेवटपर्यंत साथ दिली.  पेटलेला पदर आणि न विझलेला निखारा घेऊन माई आयुष्यभर एन. डी. यांच्या पाठीमागे चालत राहिल्या. एन. डी. यांची पत्नी होणे सोपे नव्हते. एन. डी. नाहीत, त्यांच्या पायावर नमन. माई, तुम्ही आहात; तुमच्याही पायावर नमन!

Web Title: n d patil The last Commander to fight a street battle passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.