नासरी चव्हाण

By Admin | Published: November 23, 2015 09:46 PM2015-11-23T21:46:22+5:302015-11-23T21:46:22+5:30

नासरीला कुणाचे पाठबळ नाही. सामाजिक संस्था, सरकारची मदतही नाही. तिला अपेक्षाही नाही. ती शेतात कामावर जाते आणि त्यातून आलेल्या पैशातून शाळेतील मुलांना वही-पेन्सील घेऊन देते.

Naasari Chavan | नासरी चव्हाण

नासरी चव्हाण

googlenewsNext

- गजानन जानभोर
आपल्या समाजाच्या दारिद्र्याचे कारण तिला ठाऊक आहे. पिढ्यान्पिढ्यांपासून वनवासी, आदिवासी म्हणून उपेक्षित ठेवलेल्या या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी म्हणावे तसे प्रयत्न अजूनही होत नाहीत. हे समाजवास्तव तिला अस्वस्थ करायचे. ती व्यथित व्हायची. एके दिवशी शाळेतून घरी येत असताना रस्त्यात तिला खेळत असलेली मुले दिसली. खाऊचे आमिष दाखवून त्यांना ती घरी घेऊन आली आणि बाराखडी शिकवू लागली. तोपर्यंत त्या मुलाना शाळा ठाऊक नव्हती आणि अक्षरेही अनोळखी होती. अनेक दिवसांपासून भंडावून सोडणाऱ्या प्रश्नाचे उत्तर तिनेच शोधले. आता ती मुले रोज शाळेत येतात. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या बोरव्हा या आदिवासी खेड्यात नासरी शेकड्या चव्हाण या आदिवासी तरुणीने सुरू केलेल्या समाज शिक्षणाची आणि लोकजागराची ही गाथा आहे.
अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात बोरव्हा हे १०० घरांचे गाव. पाच वर्षांपासून नासरीची ही बिनभिंतीची शाळा सुरू आहे. सध्या या शाळेत ३० विद्यार्थी (२० मुले आणि १० मुली) आहेत. हे तिचे एकल विद्यालय. विद्यार्थ्यांचा वयोगट नाही, वर्गाची अटही नाही. त्यांना शाळेची ओढ आणि अक्षरांची गोडी लागावी एवढीच तिची कळकळ. ‘त्यांना एकदा का अक्षरओढ लागली की त्यांचे आयुष्य आपसूक मातीसारखे आकार घेऊ लागेल. मी फक्त एक माध्यम’, नासरी सहजपणे बोलून जाते.
दहावी झाल्यानंतर तिने पुढे शिकू नये, असे आई-वडिलांना वाटायचे. शिकून तरी उपयोग काय? त्यापेक्षा आमच्यासोबत कामावर चल! हा त्यांचा आग्रह असायचा. पण नासरीने हट्टाने अकरावीत प्रवेश घेतला. शाळा गावापासून १२ कि.मी. दूर हिवरखेडला. शाळेत ती रोज पायी जायची. नासरीसोबत शिकणाऱ्या मुलींची मात्र शाळा सुटली, त्या शेतात काम करू लागल्या. सकाळी नासरी शाळेसाठी घरून निघायची, त्याच वेळी तिच्या मैत्रिणी कामावर जायच्या. संध्याकाळी ती शाळेतून घरी परतायची आणि त्या शेतातून... नासरीच्या आयुष्याची वाट अशी बदलत होती आणि मैत्रिणींची विस्कटत... नासरी अस्वस्थ व्हायची. मग ती सुटीच्या दिवशी मैत्रिणींना घरी बोलावून शिकवू लागली.
नासरीला कुणाचे पाठबळ नाही. सामाजिक संस्था, सरकारची मदतही नाही. तिला अपेक्षाही नाही. ती शेतात कामावर जाते आणि त्यातून आलेल्या पैशातून शाळेतील मुलांना वही-पेन्सील घेऊन देते. लोकजागराचे हे व्रत इथेच थांबत नाही. सरकारच्या योजनांचा लाभ आणि सरकारी अनुदान गावकऱ्यांना मिळवून देण्यासाठी ती धडपडत असते. मागील चार वर्षांत गावातील २३ कुटुंबांना ६९ शेळ्या, ४० कुटुंबांना कुक्कुटपालनासाठी ४०० कोंबड्या शासकीय योजनेतून मिळाल्या. त्यामागे प्रयत्न नासरीचेच. शेतकऱ्यांना घरीच सेंद्रीय खत तयार करायला तिने शिकविले आहे. परिसरातील शेतकऱ्यांनाही ती मार्गदर्शन करीत असते. पिकांना बीज प्रक्रिया करण्याचे प्रशिक्षण ती शेतकऱ्यांना देते. कीटकनाशकाचे डबे पाणी घेण्यासाठी आणि धान्य काढण्यासाठी वापरले जातात. या विषारी डब्यांमुळे विषबाधा होऊन गावकरी आजारी पडतात, असे तिने कुठेतरी वाचले. त्यानंतर हे विषारी डबे गावकऱ्यांनी वापरू नयेत, यासाठी ती प्रबोधन करू लागली. यावर्षी संक्रांतीच्या वाणात नासरीने गृहिणींना प्लॅस्टिकचे पाण्याचे मग म्हणूनच भेट दिले. पोलिओ डोस आणि लसीकरणाबद्दल आदिवासींमध्ये प्रचंड गैरसमज आहेत. ते दूर करताना नासरीला अनेक दिव्यातून जावे लागते. गावकरी शासकीय अधिकाऱ्यांचे ऐकत नाहीत, पण नासरीचे ऐकतात. कारण ती त्यांच्या दु:खाशी एकरूप होते. आदिवासी भागात सरकारच्या योजना लवकर पोहोचत नाहीत. पण सर्व धर्माचे देव आणि त्या धर्माचे ठेकेदार वेगाने तिथे पोहोचतात. त्यांना आदिवासींच्या कल्याणापेक्षा धर्मांतराची अधिक काळजी असते. शिक्षण पोहोचविण्यासाठी मात्र कुणीच धडपडत नाही. ते तिथे पोहोचावे आणि नंतर अंकुरावे यासाठीच नासरी तळमळते.

Web Title: Naasari Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.