हिट-अँड-रन, खुनाचे षड्यंत्र अन् वैदर्भीय वैभवाला डाग!
By Shrimant Mane | Published: June 15, 2024 11:42 AM2024-06-15T11:42:17+5:302024-06-15T11:42:53+5:30
Nagpur Crime News: अर्चना, रितिका, माधुरी या सुशिक्षित, गडगंज महिला मंडळाने जणू पुरुषांना मागे टाकले आहे. कायदा हातात घेण्याची हिंमत त्यांच्यात कुठून आली असावी?
- श्रीमंत माने
(संपादक, लोकमत, नागपूर)
नगररचना सहायक संचालक या उच्च पदावर काम करणारी बहीण व तिचा त्याच उंचीचा, सूक्ष्म-लघू मध्यम उद्योग संचालक बंधू अशी भावंडे सध्या नागपूर पोलिसांच्या कोठडीत आहेत. अर्चना पुट्टेवार व प्रशांत पार्लेवार ही त्यांची नावे. पुट्टेवार व पार्लेवार कुटुंबांत साटेलोटे आहे. अर्चना ही पुरुषोत्तम पुट्टेवार यांची सून, तर पुट्टेवारांची मुलगी योगिता पार्लेवारांच्या घरात दिलेली. अर्चनाचा पती मनीष डॉक्टर आहे. योगिताचा पती प्रवीणचा २००७ मध्ये मृत्यू झाला.
सासरच्या संपत्तीत हिस्सा मिळावा म्हणून विधवा योगिताने कोर्टात दावा टाकला. ती वडिलांकडे राहते. दोन्हीकडील संपत्ती नेमकी किती हे स्पष्ट नाही. काहीजण म्हणतात, तीनशे कोटी; पण पोलिसांना अजून बेरीज लागेना. अर्चना-प्रशांत यांच्यापुढे ही भानगड मिटवायची कशी हा पेच होता. पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आले, की भावाबहिणीने विचार केला की, सासन्ऱ्याचा काटा काढल्यावर योगिता गप्प बसेल. माहेरची संपत्ती वाचेल व सासरची आपोआप मिळेल. त्यासाठी हिट अँड रनचा
सुनियोजित मार्ग शोधला. २२ मे रोजी पुरुषोत्तम पुट्टेवार पत्नीला हॉस्पिटलमध्ये भेटून परत घरी येत असताना अज्ञात कारने त्यांना उडवले. त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी अपघात समजून कारच्या चालकाला अटक केली. त्याचा जामीनही झाला; परंतु, पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या भावाला शंका आली; कारण, आधी एकदा त्यांच्या दुचाकीला धडक बसली होती. दुसऱ्या वेळी रस्त्यात दंडुक्याने हल्ला झाला होता. पोलिसांनी खोलात माहिती घेतली तेव्हा गडचिरोलीत क्लास वन अधिकारी बहीण व नागपूरमध्ये वरिष्ठ अधिकारी क्लास वन भाऊ यांचे सूक्ष्म नियोजन समोर आले. जुनी कार विकत घेण्यासाठी तसेच पुट्टेवारांचा काटा काढण्यासाठी सुमारे एक कोटी रुपये खर्च करण्यात आले. अर्चना पुट्टेवार नगररचना खात्यात असल्याने तिच्या संपर्कात असलेल्या गडचिरोलीतील
काही बड्या व्यावसायिकांनी तिला मदत केली. नागपूरचे आणखी एक हिट अँड रन प्रकरण गाजत आहे. २५ फेब्रुवारी रोजी रात्री दीड-दोनच्या सुमारास प्रसिद्ध रामझुल्यावर भरधाव मर्सिडीसने मोहम्मद हुसैन गुलाम मुस्तफा व मोहम्मद आतिफ मो. जिया या दुचाकीवरील तरुणांना उडवले. दोघांचाही मृत्यू झाला. लब्धप्रतिष्ठित घराण्यातील रितिका मालू गाडी चालवीत होती व माधुरी सारडा सोबत होती. दोघीही मद्यधुंद होत्या, परंतु, मालू व सारडा दोन्ही बडी व्यावसायिक घराणी असल्यामुळे पोलिसांचा नेहमीचा शिथिलपणा दिसला. दोघींना जामीन मिळाला. ओरड सुरू झाली, तेव्हा प्रकरण पुढे सरकले. न्यायालयाने रितिका मालूला अटकपूर्व जामीन नाकारला. फरार रितिकाचा ठावठिकाणा मिळावा म्हणून पोलिसांनी नवरा दिनेशला अटक केली; तर न्यायदंडाधिकाऱ्यांनी पोलिस कोठडी नाकारली, त्याला जामीन देऊन टाकला. त्यातही सगळी चर्चा रितिका मालूचीच आहे, माधुरी सारडा नाव गायब आहे.
अर्चना, रितिका, माधुरी या शिकल्यासवरल्या महिला. पैसाही गडगंज. त्यातून तर कायदा हातात घेण्याची, पोलिस व न्यायालयाला गृहीत धरण्याची हिंमत त्यांच्यात आली नसावी? सुशिक्षित, गुणवंत आरोपी अपराधही त्याच दर्जाचा करतात, असा अनुभव आहे. गेल्या वर्षी गडचिरोलीत संघमित्रा कुंभारे ही एम. एस्सी. झालेली तरुणी व तिच्या नवऱ्याची रोजा रामटेके नावाची मामी या दोघींनी मिळून एका अफलातून प्रकरणात कुटुंबातील पाचजणांचे बळी घेतले. त्यासाठी इंटरनेटवर शोधून कसलाही रंग, गंध नसलेले विष मागवले. त्या स्लो- पॉयझनिंगने एकापाठोपाठ पाच जीव गेले. हे सारे पाहून 'कसले नारीवैभव विदर्भाच्या वाट्याला आले?' असा प्रश्न लोकांना पडला आहे. लोक दिङ्मूढ आहेत. कधीकाळच्या वैभवसंपन्न विदर्भाचे लोक अभिमान बाळगतात, वैदर्भीय लोकवैभवाला वैदिक व पुराणकाळाचा दाखला आहे. अगस्ती मुनींची पत्नी लोपामुद्रा, श्रीकृष्णाची पत्नी रुक्मिणी, छत्रपती शिवरायांना जन्म देणाऱ्या जिजाऊंचा हा प्रदेश आहे. प्रभू श्रीरामांची आजी म्हणजे राजा दशरथांचे पिता अज राजाची पत्नी इंदुमती ही वैदर्भीय राजा भोज यांची कन्या. या भानगडबाज महिला म्हणजे त्या वैभवाला डाग. माणूस म्हणून जन्मल्या तरी काणूस झालेल्या. दुर्दैव, दुसरे काय?