‘नमो ताणमुक्ती जाळी योजना’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 04:05 AM2018-02-16T04:05:54+5:302018-02-16T04:06:00+5:30
मंत्रालयातील आत्महत्या रोखण्याकरिता जाळी बसवण्यात आली. अभ्यागतांपैकी कुणी गॅलरीच्या कठड्यापाशी जाणार नाही, याची काळजी घेण्याकरिता पोलीस तैनात केले गेले. ते लोकांसमोर हात जोडून विनंती, आर्जवं करू लागले.
- संदीप प्रधान
मंत्रालयातील आत्महत्या रोखण्याकरिता जाळी बसवण्यात आली. अभ्यागतांपैकी कुणी गॅलरीच्या कठड्यापाशी जाणार नाही, याची काळजी घेण्याकरिता पोलीस तैनात केले गेले. ते लोकांसमोर हात जोडून विनंती, आर्जवं करू लागले. मंत्रालयात आपल्या दोन कच्च्याबच्च्यांना घेऊन खेटे घालून विटलेली एक महिला विमनस्क मन:स्थितीत अभ्यागत कक्षात बसलेली असताना आईची नजर चुकवून आणि पोलीसदादांना गुंगारा देऊन ही दोन मुलं चक्क त्या जाळीवर पोहोचली. त्यांनी उड्या मारण्यास सुरुवात केली. जाळीत उडी मारणारा पटकन हवेत एखाद्या चेंडूसारखा उसळल्यावर लागलीच दुसºयाने उडी घेतली. मग, दोघे उड्या मारू लागले, हसू लागले. आपली पोरं शोधत घाबरीघुबरी आई आली, तर तिनं पाहिलं की गरिबी, भूक याची धग सोसून कोवळेपण हरवलेली आपली पोरं जाळीत मस्त खेळताहेत. तिच्या निस्तेज चेहºयावर हसू खळखळलं. पोरांची ही मजा पाहून दोनतीन बाप्ये जाळीवर उतरले. त्यांनीही उड्या मारायला सुरुवात केली. न झालेल्या कामाच्या फायली गॅलरीच्या कठड्यावर ठेवून उड्या मारताना वयाबरोबर आपलं दु:ख विसरली. जाळीमध्ये उड्या मारण्याची ही गंमत पाहण्याकरिता वेगवेगळ्या खात्यांमधील कर्मचारी, कनिष्ठ अधिकारी गोळा झाले. जाळीवर उड्या घेणाºयांच्या टोप्या उडत होत्या, कुणी कोलांटउडी घेत होता. लोक ताण विसरून पोट धरून हसत होते. प्रमोशन न मिळाल्यानं किंवा वेतनवाढ रोखल्यानं हताश असलेले एकदोन डेस्क आॅफिसर, उपसचिव हेही जाळीत उतरताच सारे काही विसरून गेले. अन्यायाच्या भावनेनं त्यांच्या पाठीला आलेला पोक गायब झाला होता. अवघ्या दोनच दिवसांत मंत्रालयातील जाळीवर अभ्यागतांची गर्दी दिसू लागली. कुणी कुणास ठाऊक पण सर्कशीतील झोपाळे आणले आणि वर बसवले. आता तर या झोपाळ्यावरून त्या झोपाळ्यावर लोक उड्या मारू लागले. एकदोन जोकर जाळीत आपल्या लीला सादर करू लागले. ते दोघे एमबीए करून बेकार असलेले युवा होते. अवघ्या १५ दिवसांत जाळीच्या अवतीभवती भिंगरीवाले, आईसफ्रूटवाले, पिपाणीवाले गोळा झाले. ‘नका लावू पायाला भिंगरी महसूल असो की युडी, शंभर टक्के कामाची चक्री’, अशी सूचक जाहिरातबाजी करणारा भिंगरीवाला हा मंत्रालयात सफारीत फिरणारा दलाल असल्याचं थोड्यांच्या लक्षात आलं. दोन दिवसांपूर्वी चक्क मंत्रिमंडळातून डच्चू दिलेले एक नेते ‘अन्याय’ अशी अक्षरं असलेल्या मोटारीतून सकाळीच मंत्रालयात आले आणि त्यांनी जाळीत एकट्यानंच उड्या ठोकल्या. बघा, पोहोचलो की नाही पुन्हा सहाव्या मजल्यावर अशा आरोळ्या ते उड्या मारताना ठोकत होते. नरिमन पॉर्इंटला मॉर्निंग वॉक घेणारे दोनचार सनदी अधिकारीही सक्काळीच जाळीत उड्या मारून कॅलरीज घटवू लागले. एक दिवस गृहसचिव मुख्यमंत्री कार्यालयात गेले. इंटलिजन्स इनपुट आहे की, मंत्रालय टार्गेट होऊ शकते. त्यामुळे मंत्रालयातील जाळ्या काढाव्या लागतील आणि ही सर्कस रोखावी लागेल. मुख्यमंत्री मंद हसले आणि म्हणाले की, लोक पूर्वी काम न झाल्याचा ताण घेऊन येथून परत जात होते. आता दोनपाच उड्या मारून हसतखेळत परत जातात. उलट, या ‘नमो ताणमुक्ती जाळी’ची योजना आम्ही व्यापक करतोय.