नाना.. अण्णा.. अन् दादा.. परतीचे दोर कापले गेलेत !
By सचिन जवळकोटे | Published: September 29, 2019 08:59 AM2019-09-29T08:59:41+5:302019-09-29T09:00:27+5:30
लगाव बत्ती..
- सचिन जवळकोटे
प्रिय सरकोलीकर, दुधनीकर अन् निमगावकर..
पितृपक्ष संपला. मातृपक्ष तुमची वाट पाहतोय...कारण ऐन सणासुदीत तुम्ही घरदार अन् जीवाभावाचे कार्यकर्ते सोडून मुंबईत तळ ठोकून बसलात. युतीचे अघोषित उमेदवार प्रचाराच्या कामालाही लागले. तुम्हाला मात्र ‘चंदूदादा अन् देवेंद्रपंतां’नी प्रतीक्षेच्या कामाला लावलं. येत्या दोन-तीन दिवसात तुम्हाला काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल. तिकडं मुंबईत ‘कमळ’वाल्यांच्या मनात काहीही असेल; मात्र इकडं तुमच्या मतदारसंघातील सच्चा कार्यकर्त्यांच्या मनात काय काहूर माजलंय, हे तुम्हाला आता जाणून घ्यावंच लागेल...कारण परतीचे दोर तुम्ही केव्हाच कापून टाकलेत.
सरकोलीचे ‘भारतनाना’, दुधनीचे ‘सिद्धूअण्णा’ अन् निमगावचे ‘बबनदादा’ हे स्वत:च्या कर्तृत्वावर पुढे आलेले. तिघांनीही राजकारणात शून्यातून विश्व निर्माण केलेलं. पक्षांतर्गत विरोधकांवर मात करत समोरच्या पक्षाशी सातत्यानं संघर्ष केलेला. ‘भारतनानां’नी ‘थोरले दादा अकलूजकर’ यांचा पंढरपुरात पाडाव करून सोलापूरच्याराजकारणात न भूतो न भविष्यती असा विक्रम करून ठेवलेला. ‘सिद्धूअण्णां’नीही गृहराज्यमंत्रीपद मिळवून अक्कलकोटचं नाव अधिकच मोठ्ठं केलेलं. ‘बबनदादां’नीही एकेकाळी ‘भीमा-सीना’ पाण्यासाठी मंत्रीपदावर लाथ मारलेली.
जिल्ह्याच्या राजकारणात या तिघांचाही स्वत:चा असा वेगळा दबदबा. तरीही गेल्या एक महिन्यापासून ज्या पद्धतीनं या तिघांची ‘फिरवाफिरवी’ सत्ताधाऱ्यांकडून केली जातेय, ती तमाम कार्यकर्त्यांसाठी अत्यंत धक्कादायक. क्लेशकारक. सोलापूरच्या सभेत कोल्हापूर, सातारा अन् उस्मानाबादच्या नेत्यांना प्रवेश दिला जातो. व्यासपीठावर मोठ्या सन्मानानं बसविलं जातं; मात्र इथल्या भूमिपुत्रांना या कार्यक्रमापासून पद्धतशीरपणे बाजूला का ठेवलं जातं, हे न ओळखण्याइतपत कार्यकर्ते नक्कीच नसावेत भोळे...
त्यामुळं ‘सत्ताधाऱ्यांचे उंबरठे’ आणखी किती दिवस झिजवायचे, याचा निर्णय घ्यावाच लागेल आता या तिघांना. मात्र या तिघांचीही मानसिकता पुन्हा मातृपक्षाकडे जाण्याची नाहीच. ‘कमळ मिळालं नाही तर हरकत नाही, अपक्ष उभारू; परंतु हात किंवा घड्याळ नको’ या भूमिकेवर म्हणे हे नेते ठाम... कारण यांनी स्वत:च परतीचे दोन कापून टाकलेत. लगाव बत्ती...
खरे निष्ठावंत कोण...
...मालक की अण्णा ?
यंदाच्या निवडणुकीत एक नवीनच शब्द अनेक नेत्यांच्या तोंडून ऐकू येतोय. तो म्हणजे ‘सर्व्हे’. तिकीट मागण्यासाठी गेलेल्या प्रत्येकाला ‘वर्षा’ किंवा ‘मातोश्री’वर एवढा एकच शब्द सांगितला जातोय. त्यामुळं इच्छुकांना जळी-स्थळी ‘सर्व्हे’ हाच शब्द दिसू लागलाय. परवा एका स्थानिक नेत्याच्या मुलानं हौसेनं नवीन टू-व्हिलर मागितली तेव्हा त्याला म्हणे पित्यानं शांतपणे सांगितलं,‘थांबऽऽ अगोदर आपण सर्व्हे करू. कुठल्या गाडीची प्रतिमा जनमानसात चांगली आहे. मग निर्णय घेऊ.’ लगाव बत्ती...
असो. ‘मध्य’मध्येही ‘धनुष्यबाण’वाल्यांनी सर्व्हे केला. या ठिकाणी दोन तगडे इच्छुक. कुमठ्याचे ‘दिलीपमालक’ तर मुरारजीपेठेतले (सॉरीऽऽ विडी घरकुलमधले) ‘महेशअण्णा’. या ठिकाणी गुप्त ‘सर्व्हे’ करणाऱ्या टीमनं लोकांना म्हणे काही प्रश्न विचारले.
1. या इच्छुक नेत्यांमध्ये सर्वाधिक निष्ठावान अन् प्रामाणिक कोण ?
2. प्रत्येक गोष्टीत जाती-पातीचं राजकारण सर्वाधिक कोण करतं ?
3. ठराविक कार्यकर्त्यांच्या गोतावळ्यातच कोण रमतं?
4. निवडणूक संपल्यानंतरही सर्वसामान्यांना थेट कोण भेटू शकतं ?
5. साध्या-सुध्या कार्यकर्त्यांचे फोनही पटकन् कोण उचलतं ?
6. आपल्या संस्थेत आपल्याच पै-पाहुण्यांची भरती कोण करतं ?
...आता या सर्व्हेचा रिपोर्ट तयार होऊन नुकताच वरपर्यंत पोहोचलाय. दोन-चार दिवसात जाहीरही होईल इथल्या उमेदवारीचा अंतिम निर्णय. तोपर्यंत शोधत बसायला हरकत नाही, आपण या साऱ्या प्रश्नांची उत्तरं. लगाव बत्ती...
( लेखक 'सोलापूर लोकमत'चे निवासी संपादक आहेत.)