नाना, तुम्ही टेन्शन घेऊ नका ना...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 11:55 PM2017-12-26T23:55:26+5:302017-12-26T23:55:29+5:30
आपण मिश्किल बोलण्यासाठी प्रसिध्द आहात. पण नाना, तुम्ही आता जुन्या विचाराचे झालात. आता आपण सत्ताधारी आहोत.
- अतुल कुलकर्णी
प्रिय नाना ऊर्फ हरिभाऊ बागडे,
नमस्कार. आपण मिश्किल बोलण्यासाठी प्रसिध्द आहात. पण नाना, तुम्ही आता जुन्या विचाराचे झालात. आता आपण सत्ताधारी आहोत. तेव्हा सत्ताधा-यांसारखेच वागावे लागते. आता आपल्या पक्षाला काँग्रेसमुक्त भारत बनवायचा आहे. ज्यांनी घोषणा केली त्यांच्याच गुजरातेत काँग्रेसला $४२ टक्के मतं कशी मिळाली याचा शोध चालू असला तरी ‘काँग्रेसमुक्ती’ हे आपले प्रथम कर्तव्य आहे.
आता गेल्या तीन वर्षात काँग्रेसमधून किती नेते आपल्या पक्षात आले माहितीय तुम्हाला? अहो, ते सगळे आपल्या पक्षात येऊन पवित्र झाले आहेत. आपला पक्ष म्हणजे गंगाजल आहे नाना, ज्याला कुणाला पवित्र व्हायचे त्याने आपल्या पक्षात प्रवेश घेतला की तो पवित्र होतो. आता पुण्याचे खा. संजय काकडेंचेच पाहा ना. निवडणूक निकालाआधी ते म्हणाले होते, गुजरातेत काँग्रेसचा पराभव होणार... आणि आता, मोदींनी त्यांना चार गोष्टी ‘समजावून’ सांगताच, पंडित नेहरूंपेक्षा मोदी श्रेष्ठ आहेत असे ते म्हणाले ना... विजयकुमार गावित, बबनराव पाचपुते, प्रवीण दरेकर... यादी करायला गेलो तर जागा पुरणार नाही. या सगळ्यांवर वाट्टेल ते आरोप आपल्याही लोकांनी केले होते.
पण नाना, आतली बातमी सांगू का तुम्हाला, यातल्या एकाला तरी त्यांच्या आरोपांवरील संरक्षणाशिवाय दुसरं काही मिळालंय का? नाही ना. ते संरक्षण देखील कधी काढून घ्यायचं हे ठरलंय नाना. आपले केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर काय म्हणाले ऐकलं ना तुम्ही. ‘जर का अधिकारी कामावर आले नाहीत तर त्यांना आधी नक्षलवादी बनवू आणि नंतर गोळ्या घालू... ’ असं म्हणाले ते. आपल्या पक्षात येणाºयांसाठी पण हेच तत्त्व लागू आहे नाना... त्यासाठी आधी लोकांना जवळ करावं लागतं. चुचकारावं लागतं. एकदा का ते आपल्या जाळ्यात आले की मग त्यांना रोज नवीन चॉकलेट कसं द्यायचं हे आपल्या हातातयं नाना... आता तुम्ही म्हणाल, त्या नारायण राणेंचे काय? नाना, त्यांना पण मंत्रिपदाचं चॉकलेट दिलंय. ते संपत आलं की नवीन गाजरं बाजारात येतीलच. ती देऊ त्यांना. तसाही त्यांना गाजराचा हलवा आवडतो असे मिलिंद नार्वेकर आपल्या देवेंद्रभाऊंना सांगत होता... तेव्हा काही काळजी करू नका...