समाजवादाचा नंदादीप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 01:11 AM2018-04-03T01:11:12+5:302018-04-03T05:51:03+5:30
‘सानेगुरुजींचा धडपडणारा मुलगा’ हे बिरुद सार्थ ठरवीत वयाच्या ८८ व्या वर्षीही आंदोलन करून तुरुंगवास पत्करणारे ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांच्या निधनाने समाजवादी मूल्यांची जोपासना करणारा एक सच्चा कार्यकर्ता आपल्यातून निघून गेला आहे. व्यक्तीपेक्षा समूहाचा विचार करून धर्म, जात, लिंग, भाषा यापैकी कोणताच विचार न करता मनुष्याकडे केवळ निखळ माणूस म्हणून पाहणाऱ्या भार्इंनी सानेगुरुजींचा वारसा आयुष्यभर जपला.
‘सानेगुरुजींचा धडपडणारा मुलगा’ हे बिरुद सार्थ ठरवीत वयाच्या ८८ व्या वर्षीही आंदोलन करून तुरुंगवास पत्करणारे ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांच्या निधनाने समाजवादी मूल्यांची जोपासना करणारा एक सच्चा कार्यकर्ता आपल्यातून निघून गेला आहे. व्यक्तीपेक्षा समूहाचा विचार करून धर्म, जात, लिंग, भाषा यापैकी कोणताच विचार न करता मनुष्याकडे केवळ निखळ माणूस म्हणून पाहणाऱ्या भार्इंनी सानेगुरुजींचा वारसा आयुष्यभर जपला. मूल्याधिष्ंिठत राजकारणाचा वसा जपत समाजकारण हेच आपले साध्य ठेवणाºया भार्इंनी आयुष्यभर मानवतावादाची कास धरली. सक्रिय राजकारणात राहूनही त्यांनी कधी तडजोडीच्या स्वार्थी राजकारणाला थारा दिला नाही, संधिसाधूपणा केला नाही. त्याचा त्यांना त्रासही झाला. गृहराज्य मंत्री असताना एका स्मगलरच्या साथीदारांनी त्यांना तीन लाख रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केला. भार्इंनी त्यांना अटक करवली. ही देशातील आजवरची पहिली आणि कदाचित शेवटची घटना! सेवा दलाचे हेच संस्कार पुढील पिढ्यांमध्ये यावेत, असा त्यांचा आग्रह होता. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचे पहिले विधेयक भार्इंनीच मांडले. गृहराज्य मंत्री या नात्याने पोलिसांना फुलपँट देणे आणि सेवानिवृत्तांच्या निवृत्तिवेतनाची महागाईशी जोडणी करण्याचे अनेक निर्णय त्यांनी घेतले. सत्ता असो किंवा नसो, पद असो किंवा नसो; तळागाळातील जनता, गोरगरीब नागरिक, विद्यार्थी अशा कुणावरही अन्याय झाला, की धावून जाण्याचे व्रत वैद्य यांनी सतत अंगिकारले आणि सदैव न्यायाची बाजू घेतली. सानेगुरुजी, एस. एम. जोशी, ना. ग. गोरे यांच्याकडून समाजवादाचे बाळकडू घेतलेल्या भार्इंनी आयुष्यभर चळवळीशी नाते ठेवले. शालेय जीवनातच १९४२ च्या चलेजाव चळवळीत त्यांनी भाग घेतला. गोवामुक्ती आंदोलन आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही ते सक्रिय होते. राममनोहर लोहिया यांच्या समाजवादी विचारांवर गाढा विश्वास असलेल्या भाई वैद्यांनी १९४६ मध्ये काँग्रेस समाजवादी पक्षात प्रवेश केला. सानेगुरुजींनी स्थापन केलेल्या राष्ट्र सेवा दलातही त्यांनी ११ वर्षे पूर्णवेळ सेवक म्हणून काम केले. आणीबाणीनंतर स्थापन झालेल्या जनता पक्षाचे ते राष्ट्रीय सरचिटणीसही होते. पुरोगामी लोकशाही दलाच्या सरकारमध्ये ते गृह खात्याचे राज्यमंत्री होते. जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस, समाजवादी जन परिषदेचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष अशी पदे त्यांनी भूषविली आणि त्या पदांची उंची वाढविली. पुण्याचे महापौर म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली; मात्र पदाचा सोस कधीही ठेवला नाही. केवळ शहरातीलच नव्हे तर दलित वस्तीतील, झोपडपट्टीतील, मोहल्ल्यातील माणसांना ते आपलेच वाटायचे. माणसे जमविणे, त्यांच्याशी संवाद साधणे हा त्यांचा आयुष्यभराचा छंद राहिला. यातूनच कार्यकर्त्यांचे मोठे जाळे त्यांनी निर्माण केले. माणसाकडे माणूस म्हणूनच पाहण्यास सुरुवात केल्यास लवकरच जग सुखी होईल, असे ते नेहमी म्हणत. पोथीनिष्ठ समाजवादापेक्षा विरोधकांचेही शांतपणे ऐकून घेऊन त्याचा वैचारिक प्रतिवाद करण्यावर भार्इंचा भर असे. कुठल्याही सरकारने धर्म, जात, पंथ या अजेंड्याच्या आधारे राजकारण करण्यास भार्इंनी कायमच विरोध केला. जातीयवादी, हिंदुत्ववादी संघटनांवर ते कायमच परखड बोलायचे. संविधानाच्या मूल्यांवर त्यांची अढळ निष्ठा होती. सर्व जातींना बरोबर घेऊन जाण्याची मांडणी भाई प्रभावीपणे करायचे. समाजवादी चळवळ क्षीण झाली असतानाही भार्इंनी तिला मानवतावादाची जोड देऊन कार्यकर्त्यांना प्रेरित केले. दिल्ली येथील भारत यात्रा ट्रस्टचे २०११ पासून राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या वैद्यांनी स्थापन केलेल्या सोशालिस्ट पार्टीचे अध्यक्षपद भूषविले. समाजवादी अध्यापक जनसभेचे ते मार्गदर्शक होते. शिक्षकांची एक पिढी त्यांनी निर्माण केली. समाजवादाशिवाय देशाला तरणोपाय नाही, अशी मांडणी करून तरुणांना समाजवादी विचारांकडे आकृष्ट करण्यासाठी ते आयुष्यभर प्रयत्नशील राहिले. समाजवादी चळवळीतील हा नंदादीप आता विझला आहे.