वेध - नांदेडचा घोडेबाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 12:11 AM2017-09-13T00:11:56+5:302017-09-13T00:11:56+5:30

नांदेड-वाघाळा महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध भाजप या लढाईला तोंड फुटले. डाव-प्रतिडाव, शह-काटशहाचे राजकारण रंगणार असल्याने दिवसागणिक रंगत वाढत जाणार.

Nanded horse box | वेध - नांदेडचा घोडेबाजार

वेध - नांदेडचा घोडेबाजार

Next

- सुधीर महाजन
नांदेडच्या घोडेबाजारात भाजपचा भाव सध्या वधारलेला दिसतो आणि त्यांची खरेदी जोरात सुरू आहे. बोली लावलेले सगळेच घोडे आहेत असा भाजपचा समज दिसतो. त्यामुळे घोडे किती तट्टू किती हे महापालिकेच्या रेसकोर्सवर धावतानाच स्पष्ट होईल; पण भाजपचा घोडेबाजार तेजीत आहे. काँग्रेस आणि शिवसेनेसाठी गयाराम, तर भाजपसाठी आयाराम अशी परिस्थिती दिसते. महानगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजण्यापूर्वीच भाजपने हा घोडेबाजार मांडला आणि आतापर्यंत शिवसेनेचे १२ आणि काँग्रेसचे ५ नगरसेवक भाजपच्या गळाला लागले. लातूरमध्ये विलासराव देशमुख समर्थकांच्या हातून भाजपने महापालिका काबीज केली. तोच प्रयोग अशोक चव्हाणांच्या संदर्भात त्यांना नांदेडमध्ये करायचा असल्याने कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर आणि प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंग ठाकूर या दोन बिनीच्या शिलेदारांनी हा विडा उचलला.
नांदेडमध्ये भाजपचा तसा राजकीय दबदबा नाही. मोदींच्या सत्तारोहणानंतर सूर्यकांता पाटील, डॉ. माधव किन्हाळकर अलीकडे ओमप्रकाश पोकर्णा, दिलीप कंदकुर्ते, सुधाकर पांढरेंसारखी मंडळी तळ्यातून मळ्यात आली आणि आता महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर गयारामांची गर्दी वाढली. यात प्रस्थापितांविरोधातील नाराजी हा घटकसुद्धा दुर्लक्षित करता येणार नाही, कारण वर्षानुवर्षे हा काँग्रेसचा गड राहिला आहे. यावेळी भाजपच्या रणनीतीचा भाग म्हणजे त्यांनी चाणक्यनीतीचा वापर केला. अशोक चव्हाणांचे शत्रू म्हणजे आपले मित्र, या सूत्रानुसार शिवसेनेचे आमदार प्रताप चिखलीकरांना त्यांनी गळाला लावले. चिखलीकरांनीसुद्धा शिवसेनेचा मळवट कायम ठेवून उघडपणे भाजपचा झेंडा आपल्या मावळ्यांच्या हाती दिला. आपली मंडळी तिकडे पाठविली. उद्धव ठाकरे त्यांच्यावर कारवाई करू शकत नाहीत. पक्षविरोधी कारवायांच्या नावाखाली त्यांची हकालपट्टी केली तर त्यांचे बळ कमी होते आणि चिखलीकरांच्या पाठोपाठ काही आमदार बाहेर पडण्याची भीती आहे आणि नेमका याचाच फायदा चिखलीकर उठवत आहेत. नांदेडमध्ये भाजपचा असा नेत्याचा चेहराच नाही. सगळी सूत्रे चिखलीकर हलवतात. त्यामुळे भाजपमध्ये अंतर्गत पोटदुखी उघडपणे दिसते. परवा पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनाला सूर्यकांता पाटील, पोकर्णा, कंदकुर्ते, डॉ. किन्हाळकर, धनाजीराव देशमुख, राम पाटील रातोळीकर ही मंडळी उपस्थित नव्हती. भाजपचे नेतृत्व कोणाकडे, हा प्रश्न अजून कायम आहे. भाजपमधील जुन्या मंडळींचे दु:ख म्हणजे आजवर चिखलीकरांना विरोध केला, आता त्यांच्या कलाने काम करावे लागणार आहे आणि त्यांच्यामुळे निष्ठावंतांची उमेदवारी कापली जाईल, अशी जोरदार चर्चा आहे.
आपल्या समर्थकांची सोय लावूनच ते भाजपवासी होतील असा अंदाज असल्याने अनेकांच्या मनसुब्यांवर पाणी पडण्याची चिन्हे दिसतात, हेसुद्धा भाजपच्या निष्ठावंतांमधील अस्वस्थतेचे कारण आहे. चिखलीकर हे काँग्रेसमधून शिवसेनावासी झाले होते.
भाजपसाठी मुस्लीमबहुल १५ वॉर्ड ही डोकेदुखी झाली. या ठिकाणी त्यांच्याकडे उमेदवारच नाही आणि काँग्रेससाठी बलस्थान आहे. निवडणुका जाहीर होताच अशोक चव्हाणांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींची सभा घेतली, त्याचा परिणाम होईलच, शिवाय काँग्रेसकडे अशोक चव्हाण हा राज्यपातळीवर नेतृत्वाचा चेहरा आहे. शिवाय इतकी वर्षे या शहराचे राजकारण, समाजकारण करणारे नेतृत्व म्हणून ते ओळखले जाते, ही जमेची बाजू ठरते. असा चेहरा आजच्या घडीला भाजपकडे नाही. भाजप-सेना युती आता कुंकवापुरती शिल्लक आहे. चिखलीकरांच्या डबल गेममुळे निष्ठावान शिवसैनिक अस्वस्थ आहेत. काँग्रेसमधून जे गेले त्यांना थांबविण्याचा प्रयत्न चव्हाणांनी केला नाही, याची चर्चा आहे. घोडा-मैदान जवळ असले तरी कस दोघांचाही लागणार. चव्हाणांना गड राखायचा असल्याने गनिमी कावा कोणता हेच पाहणे मजेशीर ठरणार आहे.

Web Title: Nanded horse box

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा