नाओमी ओसाकाने माघार घेतली आणि...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2021 05:40 AM2021-06-03T05:40:40+5:302021-06-03T05:41:01+5:30
यशाच्या शिखरावर असलेल्या खेळाडूंची कमाई आणि कीर्ती आपल्याला दिसते; पण त्यासोबत येणारा असह्य ताण हा त्या खेळाडूलाच सोसावा लागतो.
- अॅड. अभय आपटे, माजी अध्यक्ष, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन
प्रसिद्ध महिला टेनिसपटू नाओमी ओसाका हिने दोनच दिवसांपूर्वी अचानक फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेतून माघार घेत असल्याचे जाहीर केले. तिने पहिली फेरी जिंकली होती, मात्र त्यानंतरच्या पत्रकार परिषदेत जाण्यास बिघडलेल्या मन:स्वास्थाचे कारण देऊन तिने नकार दिला. यावर आयोजकांनी तिला दंड केला तसेच नियमभंगाबद्दल स्पर्धेतून बाद करण्याची तंबी दिली. त्यानंतर मात्र तिने स्वत:च स्पर्धेतूनच माघार घेऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.
आपल्या निवेदनात नाओमीने महत्त्वाचा खुलासा केला आहे. तिला डिप्रेशन (depression)ने ग्रासले असून, गेले काही दिवस ती या आजाराशी झगडत असल्याचे ती सांगते. तिच्या माघारीमुळे उर्वरित स्पर्धा सुरळीत पार पडेल, असा विश्वासही तिने व्यक्त केला आहे. अशा रीतीने मानसिक आजाराचे स्पष्ट कारण देऊन तिने स्पर्धा सोडण्याचे ठरवले, तसे जाहीरही केले. या तिच्या निर्णयाला इतर खेळाडूंनी पाठिंबा दिला आहे. अर्थात नाओमी ओसाका ही जगातील अग्रगण्य महिला टेनिस पटू असल्याने तिच्या या निर्णयावर व तिच्या मानसिक स्थितीवर बराच काळ चर्चा घडेल. अर्थातच या विषयावर तज्ज्ञ प्रकाश टाकतीलच. काही काळापूर्वी खुद्द् विराट कोहलीनेदेखील मानसिक अस्वास्थ्याच्या चक्रातून आपण गेलो होतो, याची कबुली दिली होती. यशाच्या शिखरावर असलेल्या खेळाडूंची कमाई आणि कीर्ती आपल्याला दिसते; पण त्यासोबत येणारा असह्य ताण हा त्या त्या खेळाडूलाच सोसावा लागतो. त्याबाबत बोलण्याची व्यवस्था सोडा, तसे सामाजिक वातावरणही आपल्याकडे दुर्दैवाने नाही. वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी थेट मृत्यूला कवटाळण्याची हतबलता एरवी रितिका फोगट या गुणवान खेळाडूवर का गुदरली असती?
आपण यशाचे उत्सव करतो, पण कधीकधी अल्पवयात ते उत्सवी शिखर गाठलेल्या व्यक्तीच्या मनाचे अवकाश औदासिन्याच्या पोकळीने भरून गेलेले असते हे आपल्या लक्षात येत नाही. ओसाकाने दिलेली कबुली महत्त्वाची आहे ती म्हणूनच! खेळापेक्षाही आपल्या मानसिक स्वास्थ्यावर काम करणे मला महत्त्त्वाचे वाटते आहे असे ती म्हणाली, आणि त्यासाठी कारकिर्दीच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर फार महागडी किंमतही तिने मोजली आहे.
हा विषय चर्चेत असतानाच आपल्या देशातील अनेक युवा खेळाडूंची गेल्या दोन वर्षांत मन:स्थिती काय झाली असेल, याचा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. अनेक युवा खेळाडूंनी २०१९च्या अखेरीपर्यंत आपापल्या क्रीडा प्रकारात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर ठसा उमटवायला सुरुवात केली होती. अनेक युवकांनी व्यावसायिक खेळाडू होण्याचे मनाशी ठरवले होते आणि त्यासाठी ते अपार मेहनत घेत होते. मात्र गेल्या दीड वर्षांत अचानक त्यांचा खेळ बंद झाला. या अचानक बसलेल्या धक्क्याने आज त्यांची मानसिक स्थिती काय झाली असेल याचा कितपत विचार केला गेला आहे?
भविष्यातील असुरक्षितता आणि योग्य समुपदेशनाचा अभाव यामुळे अनेक गुणी खेळाडू क्रीडा क्षेत्राला रामराम ठोकण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. प्रत्येक खेळाडूने राष्ट्रीय पातळीवर नाव कमवलेच पाहिजे अशी अजिबात गरज नाही. पण खेळातून निर्माण होणारा खिलाडूपणा आणि शारीरिक क्षमता फार महत्त्वाची आहे.
अशा युवा क्रीडापटूंकडे आपला आवाज उठवण्याची क्षमता नाही. भविष्याचा विचार करता ते सरकार अथवा संघटना यापैकी कोणाशीही भांडू शकत नाही. मात्र खेळापासून दूर राहिलेल्या अशा असंख्य खेळाडूंच्या मानसिक आरोग्याकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा दुर्दैवाने ते मानसिक आजारांना बळी पडतील. आपल्याकडे अनेक युवा गुणवंत खेळाडू आहेत. त्यांच्याकडे प्रतीभा तर आहेच, पण पुढे जाण्याची जिद्दही आहे. ग्रामीण भागात तर असे खेळाडू मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यांच्या खेळाला आणि कारकीर्दीला लगाम बसला तर कोणालाच ते परवडणारे नाही. या विषयात तज्ज्ञांचे मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. तसेच सुरक्षतेचे नियम पाळून, कसे खेळता येईल, याचा विचारही कल्पकतेने केला पाहिजे. बडया खेळाडूंचे सामने चालू आहेत आणि ते चालूच राहतील. मात्र उगवत्या खेळाडूंचे काय ? तयार चकचकीत माल विकण्याच्या नादात कच्च्या मालावर प्रक्रिया करण्याचे विसरून गेलो, तर त्याची फळे भविष्यात भोगावी लागतील.
अर्थात अशी वेळ येणार नाही अशी आपण आशा करू.