नरेंद्र दामोदरदास मोदी असे मवाळ का झाले बुवा?
By संदीप प्रधान | Published: January 3, 2019 02:22 PM2019-01-03T14:22:16+5:302019-01-03T14:23:27+5:30
गुजरातमध्ये मुख्यमंत्री असल्यापासून मोदी पत्रकारांशी फटकून वागत होते. पत्रकार परिषद घेणे, मुलाखती देणे, हे तर त्यांना वर्ज्य होते.
- संदीप प्रधान
पाशवी बहुमत, सोशल मीडियावरील इमेज बिल्डिंग करणारी भलीमोठी टीम, लोकांना हिप्नॉटाइज करणारे वक्तृत्व, त्या वक्तृत्वाला कसदार अभिनयाची किनार, देशातील किमान १५ राज्यांमधील सत्तेचे पाठबळ, देशातील अनेक विचारवंत, लेखक, कलाकार पालखीचे भोई म्हणून तत्पर... या अशा अनेक बाबींमुळे पंतप्रधान नरेंद्र दामोदरदास मोदी यांच्याकरिता मीडिया, पत्रकार हे क्षुल्लक, क:पदार्थ होते. गुजरातमध्ये मुख्यमंत्री असल्यापासून मोदी पत्रकारांशी फटकून वागत होते. पत्रकार परिषद घेणे, मुलाखती देणे, हे तर त्यांना वर्ज्य होते. मागे, मोदी यांनी एका वाहिनीला मुलाखत दिली होती. मात्र, ती मुलाखत म्हणजे तुम्ही माझी पाठ खाजवा, या स्वरूपाची होती. दर १५ दिवसांनी एखादा देशात किंवा बऱ्याचदा विदेशात कार्यक्रम आयोजित करायचा आणि 'भक्तां'समोर दीडदीड तास भाषण करायचे, हाच काय तो मोदींचा मीडियाशी संवाद होता. याखेरीज, 'मन की बात' यासारखे तोंडी लावण्यापुरते कार्यक्रम होते. मात्र, राम मंदिरापासून राफेल खरेदी व्यवहारापर्यंत अनेक मुद्द्यांबाबत लोकांच्या मनात असलेल्या असंख्य प्रश्नांवर उत्तर द्यावे, असे मोदींना गेल्या चार वर्षांत वाटले नाही. त्यामुळे कधी पट्टीचे वकील अरुण जेटली, तर कधी घशाच्या शिरा ताणूनताणून बोलणाऱ्या निर्मला सीतारामन याच सरकारचा बचाव करताना दिसले. मोदींना आपण वेगवेगळ्या विषयांवर तोंड उघडावे, जनतेसमोर मीडियाच्या माध्यमातून काही बाबींचा खुलासा करावा, असे वाटले नाही. पाच राज्यांच्या निवडणुकांत मोदींनी प्रचार केला. मात्र, तरीही छत्तीसगढमध्ये भाजपाला अनपेक्षित पराभवाचा झटका बसला, तर राजस्थानमध्ये अपेक्षित झटका मिळाला. मध्य प्रदेशात जागा जरी बºयापैकी आल्या असल्या, तरी धूळ चारली गेली. पराभवाचे धक्के तर पंजाब, कर्नाटक व दिल्लीतही भाजपाला बसले होते. मात्र, आता मिळालेल्या दणक्याचे टायमिंग भाजपा व मोदी यांच्याकरिता घातक आहे.
सोनिया गांधी या प्रकृती अस्वास्थ्यामुळे, तर राहुल गांधी हे वकुब नसल्याने काँग्रेसला अच्छे दिन दाखवू शकत नाहीत, असा मोदी व भाजपाचा समज होता. त्या दृढ विश्वासाला निकालाने तडा गेला. शिवाय, काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आघाडी उभी राहू शकते, याची जाणीव मोदींना झाली. जेव्हा मोदी विरुद्ध बाकीचे सगळे असा सामना होतो, तेव्हा मोदींची डाळ शिजत नाही, हे आता लक्षात आल्याने देशभरातील प्रादेशिक पक्षांचे नेते पर्यायाच्या शोधात होते. राहुल गांधी यांच्या रूपाने हा पर्याय उभा राहू शकतो, हेच दिसून आले. यापूर्वी राहुल यांच्या अपरिपक्वतेबद्दल बोटं मोडणारे शरद पवार यांच्यासारखे नेतेही अचानक राहुल यांच्या नेतृत्वगुणांचे कौतुक करू लागल्याने मोदी यांना आपल्या पायाखालची वाळू सरकत असल्याची जाणीव झाली असावी. पर्यायी आघाडी आकाराला येत असताना रालोआचे मित्रपक्ष त्यांना दुरावत असल्याचे दिसू लागले. चंद्राबाबू नायडू दूर गेले, बिहारमध्ये पडझड सुरू झाली आणि महाराष्ट्रात भाजपाला लाखोली वाहिल्याखेरीज शिवसेनेचा दिवस मावळत नाही. त्यामुळेच की काय, सुईच्या अग्रावरील जमीन देण्यास तयार न होणाऱ्या अमित शहा यांनी बिहारमध्ये आपल्या पाच विद्यमान लोकसभेच्या जागा मित्रपक्षांना देण्याचा निर्णय घेतला. मुंबईत येऊनही वांद्रे येथे मातोश्रीला टाळणाऱ्या अमित शहा यांना काही महिन्यांपूर्वी मातोश्रीची पायरी चढायला लागली होती. तात्पर्य काय, तर मोदी-शहा या जोडगोळीचा जमिनीपासून चार अंगुळे हवेतून उडणारा रथ जमिनीवर येण्यास सुरुवात झाली आहे. येणाऱ्या काळात मोदी-शहा यांना मित्रपक्षांच्या नाकदुऱ्या काढाव्याच लागतील. अपमान गिळावा लागेल. आपल्या छातीवर दगड ठेवून जागावाटपात तडजोडी कराव्या लागतील. याचबरोबर मीडिया, पत्रकार यांच्या टीकेचा सामना करावा लागेल. आपल्या सत्तेवरील सूर्य पुढील किमान २५ वर्षे मावळणार नाही, असा गंड या दोघांना होता. अमित शहा यांनी तर पुढील ५० वर्षे आम्हीच सत्ता करणार, असा राणाभीमदेवी थाटाचा दावा केला होता. मात्र, जेमतेम चार वर्षांत फासे असे पडले की, नाकदुऱ्या काढणे, मुलाखती देणे, स्वपक्षाच्या मंडळींकडून टोमणे ऐकून घेणे, या दोघांच्या नशिबी आले आहे.
मोदींची भीती त्यापुढेच आहे. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपाला सत्ता स्थापन करण्याकरिता बरीच मोठी आघाडी करणे अपरिहार्य झाले, तर मोदी-शहा यांना त्यांची आतापर्यंतची ताठर भूमिका अडचणीची ठरू शकते. हिंदुत्व बाजूला ठेवून किमान समान कार्यक्रमावर मित्र जोडायचे झाले, तर मोदी-शहांची गुजरात दंगलीतील बेफिकिरी अडसर ठरू शकते. अशावेळी नितीन गडकरी, राजनाथ सिंह यांच्यासारखे पर्याय नव्या मित्रांकडून पुढे आणले जाऊ शकतात. मध्यंतरी, गडकरी यांनी केलेली काही विधाने वेगळ्या संकेतांची निदर्शक होती. समजा, सत्ताबदल होऊन काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडी सत्तेवर आली, तर मग मोदी-शहा यांच्याकरिता अधिक खडतर परिस्थिती निर्माण होऊ शकते. आपण जे पेरले तेच उगवले, याचा अनुभव त्यांना येऊ शकतो. वेगवेगळ्या प्रकरणांच्या बंद करवलेल्या फायली खुल्या होऊ शकतात. नरसिंह राव सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर दिवसेंदिवस न्यायालयात एकटे बसून असायचे. अशा संकटाच्या प्रसंगी कुणीच पाठीशी उभे राहत नाही. त्यामुळे मोदी यांना मीडियापुढे जाण्याची गरज वाटली, असू शकते. भविष्यात, वधूपित्यासारखे कंबरेत वाकलेले मोदी-शहा देशाला पाहायला लागले, तर नवल वाटायला नको.