ललित मोदी प्रकरणी नरेन्द्र मोदींचे मौन का?

By admin | Published: June 27, 2015 12:25 AM2015-06-27T00:25:35+5:302015-06-27T00:25:35+5:30

ललित मोदींना राजेशाही पद्धतीने जगणे आवडते. २०१० सालच्या ‘इंडियन प्रिमिअर लीग’ आधी मी त्यांची मुलाखत घेण्यासाठी मुंबईतल्या एका हॉटेलच्या आलीशान

Narendra Modi's silence in Lalit Modi case? | ललित मोदी प्रकरणी नरेन्द्र मोदींचे मौन का?

ललित मोदी प्रकरणी नरेन्द्र मोदींचे मौन का?

Next

राजदीप सरदेसाई, (ज्येष्ठ पत्रकार आणि स्तंभलेखक) -

ललित मोदींना राजेशाही पद्धतीने जगणे आवडते. २०१० सालच्या ‘इंडियन प्रिमिअर लीग’ आधी मी त्यांची मुलाखत घेण्यासाठी मुंबईतल्या एका हॉटेलच्या आलीशान सदनिकेत गेलो होतो. एका खोलीत मी त्यांची वाट बघत असताना तेथे संघ मालक, उद्योजक, अभिनेते, राजकारणी आणि क्रि केट बोर्डाचे अधिकारीसुद्धा उपस्थित होते. ललित मोदींनी तिथे येताच ऐटीत माझ्याकडे बघत ‘हे सगळे माझे मित्र आहेत, बघितले तुम्ही’ असे म्हटले होते. पाच वर्षानंतर आज त्यातले बरेचसे मित्र शत्रू आहेत.
क्रि केटमधील आयपीएलची मालकी भारतीय क्रि केट नियामक मंडळाकडे आहे. क्रीडा जगतातल्या या सर्वात श्रीमंत मंडळाच्या आर्थिक व्यवहारासंबंधी संसदेत २०१०-११ साली एक खळबळजनक अहवाल सादर करण्यात आला होता. पण आयकर खाते आणि सक्तवसुली संचालनालयाच्या त्यासंबंधीच्या चौकश अहवालांवर आता धूळ साचली आहे. ललित मोदींनी मंडळाचे सर्व नियम मोडत आयपीएल नावाची व्यक्तिगत जहागीर निर्माण केली आणि उच्च राहणीमानाच्या जीवनाची जबर किंमतही मोजली.
आयपीएलचा राजकीय अवतारसुद्धा प्रभावी लोकांनी भरलेला आहे. त्यात काही आघाडीचे नेते सुद्धा आहेत. हे लोक फायद्याच्या वेळी नि:पक्षपातीपणे एकत्र येतात, परस्पर सहकार्याची आणि संरक्षणाची भावना ठेवतातव परस्परांच्या नातेवाईकांच्या आर्थिक भल्याकडेही पुरेपूर लक्ष देतात. संकटाच्या काळी हेच लोक कायदेशीर यंत्रणेलाही रोखून धरतात. गुप्ततेचा संकेत कुठल्याही प्रकारे मोडला जाणार नाही, यासाठी हे लोक कमालीचे प्रयत्नशील असतात. पण ललित मोदी प्रकरणाने गुप्ततेचा हा संकेतच उधळून टाकला आहे.
परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आपले कौटुंबिक मित्र आहेत आणि त्यांचे पती स्वराज कौशल यांनी आपल्याला मोफत कायदेविषयक सहाय्य केले असल्याचे ललित मोदींनी अगदी सहज उघड करून टाकले. सुषमा स्वराज यांना असे कधीच वाटले नसेल की, राजशिष्टाचार डावलून मोदींच्या पासपोर्टची जप्ती रद्द करण्यास सांगण्याने त्यांना अडचणीत पडावे लागेल. मोदींनी वसुंधरा राजे यांच्याशी असलेले मैत्री-संबंधही लपवून ठेवले नाहीत. त्यांनी हेही लक्षात आणून दिले आहे की शरद पवार, प्रफुल पटेल, राजीव शुक्ला आणि अशा इतर लोकांनीही त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. यातून हे स्पष्ट होते की मोदींचे मित्र केवळ भगव्या समूहापर्यंत मर्यादित नव्हते. त्यातून हेही स्पष्ट झाले की, राजकारणी वर्ग परस्पर सहकार्यानेच वागत असतो. कॉंग्रेसचा रोख भले आज भाजपाच्या दिशेने तीव्र असला तरी प्रत्यक्षात २०१० ते २०१४ या चार वर्षात संपुआ सरकारनेही ललित मोदींच्या इंग्लंडमधील तडीपारी संदर्भात बऱ्यापैकी पाठपुरावा केला होता. २०१३ साली तत्कालीन अर्थमंत्री पी.चिदंबरम यांनी त्या संदर्भात इंग्लंड सरकारला दोन पत्रेही पाठवली होती. खरे तर तेव्हां मोदी फरार होते आणि त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई आवश्यक होती.
नरेंद्र मोदी सरकारने तर हा मुद्दा दुय्यम स्थानीच ठेवला. उच्च न्यायालयाने गेल्या आॅगस्टमध्ये ललित मोदींना पासपोर्ट देण्याची अनुमती दिली, पण सरकारने अपील केलेच नाही. आता सक्तवसुली संचालनालयाकडून रेड कॉर्नर नोटीस बजावण्याची भीती घालणे म्हणजे वराती मागचे घोडेच म्हणायचे. सक्तवसुली संचालनालय आणि आयकर विभागाच्या भूमिका बऱ्याच वेळा हातच्या बाहुल्यासारख्या राहिल्या आहेत. त्यांच्या माध्यमातून नेहमीच स्वकीयांच्या अपसंपदेचे संरक्षण आणि विरोधकांशी ठराविक वादांवर सामंजस्य निर्माण करण्यात आले आहे. त्यामुळे एक तर ललित मोदींच्या विरोधात खंबीर असे पुरावेच नाहीत किंवा हे प्रकरण जाणीवपूर्वक डळमळीत अवस्थेत ठेवण्यात आले आहे.
आयपीएल क्लबचे सदस्य म्हणून विशेष सवलती प्राप्त होण्याची दोन उदाहरणे आहेत, रॉबर्ट वाड्रा आणि दुष्यंत सिंह. पहिले कॉंग्रेस अध्यक्षांचे जावई तर दुसरे राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांचे पुत्र. दोघांनीही सत्तास्थानांशी असलेली निकटता आणि अप्रत्यक्ष गुंतवणुकीच्या जोरावर प्रचंड नफा कमावला आहे. मागील वर्षी हरयाणा विधानसभा निवडणुकांच्या आधी भाजपाने वाड्रा प्रकरण धसास लावण्याचे आश्वासन दिले होते, पण सत्तेत येताच चौकशीचा काटा जागेवरून तसूभरसुद्धा सरकला नाही. २००८ साली राजस्थानात सत्तेत येण्याआधी कॉंग्रेसने सुद्धा वसुंधरा-दुष्यंत-ललित मोदी यांचे लागेबांधे उघड करण्याचे आश्वासन दिले होते, पण अशोक गेहलोत सरकारने त्या मु्द्याला बगल दिली, कदाचित चौकशीत त्यावेळी मुख्यमंत्र्यांचे पुत्र सुद्धा अडकले असते. नरेंद्र मोदींचे पाठीराखे असा दावा करतात की त्यांना आयपीएलच्या सत्तेवरची घट्ट पकड सोडवायची आहे आणि ललित मोदी प्रकरण उघड होणे ही त्याची सुरुवात आहे. हे जर खरे असेल तर इतरवेळी बोलघेवडापणा करणारे पंतप्रधान मौन का बाळगून आहेत?
ताजा कलम: मॉन्टेग्रोे येथे ललित मोदींची मुलाखत घेत असताना मला त्यांच्या मित्र वर्तुळात डोकावून बघायची संधी मिळाली. त्यांची नावे उघड न करता मी एवढेच म्हणेन की २०१० साली त्यांचा प्रभावशाली मित्र समूह प्रामुख्याने एतद्देशीय होता आणि आता त्यांचा मित्र समूह आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे.

Web Title: Narendra Modi's silence in Lalit Modi case?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.