संकुचित मानसिकता

By admin | Published: June 30, 2017 12:07 AM2017-06-30T00:07:55+5:302017-06-30T00:07:55+5:30

जागतिक महासत्ता बनण्याचे स्वप्न बघणाऱ्या भारताने विकासाची अनेक क्षेत्रे पादक्रांत केली असली तरी येथील सामाजिक आणि आर्थिक विषमतेची दरी

Narrow mindedness | संकुचित मानसिकता

संकुचित मानसिकता

Next

जागतिक महासत्ता बनण्याचे स्वप्न बघणाऱ्या भारताने विकासाची अनेक क्षेत्रे पादक्रांत केली असली तरी येथील सामाजिक आणि आर्थिक विषमतेची दरी मात्र तीळमात्रही कमी झालेली दिसत नाही. उलट ती अधिक वाढतच जात असल्याचे अलीकडच्या काळात घडलेल्या अनेक घटनांमधून प्रतिबिंबित होते. विविधतेने नटलेला देश अशी भारताची संपूर्ण जगात ओळख आहे. हे वैविध्य म्हणजे या देशाचा अनमोल दागिना आहे. परंतु त्या दागिन्यालाच डाग लावण्याचे दुष्कृत्य काही असंवेदनशील मंडळी करीत आहेत. लिंग, वर्ण, वेशभूषा यावरून होणारे भेदभाव अद्यापही थांबलेले नाहीत. गेल्या आठवड्यात घडलेल्या तीन घटनांवरुन याची प्रचिती यावी. पहिली घटना आहे राजधानी दिल्लीतील. येथील एका गोल्फ क्लबमध्ये मेघालयातील पारंपरिक वेशभूषा परिधान करून आलेल्या तायलीन लिंगडोह नामक महिलेस ‘तुमची वेशभूषा मोलकरणीसारखी दिसते’, असे अत्यंत अपमानास्पद कारण पुढे करून क्लबबाहेर काढण्यात आल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकाराचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. तायलन या काही स्वत:हून तेथे गेल्या नव्हत्या तर क्लबच्याच एका सदस्याने त्यांना आमंत्रित केले होते. हा केवळ तायलीन अथवा मेघालयाचा अपमान नसून साऱ्या देशाची मान यामुळे शरमेने खाली झुकली आहे. आपण इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झालो पण त्यांच्या विचारांच्या नाही हेच यावरून अधोरेखित होते. दुर्दैव हे की ईशान्येकडील लोकांसाठी हा काही नवा अनुभव नाही. यापूर्वीही दिल्लीसह देशाच्या इतर काही भागात ईशान्येतील विद्यार्थ्यांवर हल्ले झाले आहेत. हरियाणातील अशाच एका घटनेने महिला सबलीकरणाच्या प्रयत्नांवर पाणी फेरले आहे. राज्य शासनातर्फे प्रसिद्ध होणाऱ्या मासिकाच्या मुखपृष्ठावर घुंघट घेतलेल्या एका महिलेचे छायाचित्र प्रकाशित झाले असून ही राज्याची ओळख असल्याचे मोठ्या अभिमानाने नमूद करण्यात आले आहे. भाजपाशासित राज्यातील मंत्र्यांनीही या घुंघट प्रथेचे समर्थन करुन आपल्या संकुचित मानसिकतेचा परिचय दिला आहे. देशाने शिक्षण आणि प्रगतीची दारे उघडून विकासाची कास धरली असताना असल्या प्रतिगामी विचार प्रवाहांनी त्याला खीळ बसणार हे निश्चित आहे. हरियाणात तर शासकीय यंत्रणेने असंवेदनशीलतेची परिसीमाच गाठली. दौसा जिल्ह्यात केंद्र सरकारच्या योजनेतून स्वस्त धान्य घेणाऱ्या कुटुंबांच्या घरांच्या भिंतींवर चक्क ‘मी गरीब आहे. मी राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत धान्य घेतो’ असे रंगविण्यात आले आहे. देशाच्या विविध भागात घडलेल्या या घटना प्रत्येक व्यक्तीस आत्मचिंतनास भाग पाडणाऱ्या आहेत.

Web Title: Narrow mindedness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.