‘स्पोर्ट्स हब’च्या दिशेने नाशिकची आगेकूच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2017 11:59 PM2017-03-03T23:59:30+5:302017-03-03T23:59:30+5:30
नाशिक जिल्ह्यातील खेळाडूंनी एकापाठोपाठ एक यश मिळवून या शहराची वाटचाल क्रीडानगरीच्या लौकिकाकडे होत चालल्याचेच स्पष्ट करून दिले
धावणे व नेमबाजीची स्पर्धा असो, की नौकानयनाची; नाशिक जिल्ह्यातील खेळाडूंनी एकापाठोपाठ एक यश मिळवून
या शहराची वाटचाल क्रीडानगरीच्या लौकिकाकडे होत चालल्याचेच स्पष्ट करून दिले आहे. नाशिकची ओळख आता केवळ पारंपरिकपणे पर्यटकीय स्थळ एवढीच मर्यादित राहिलेली नसून, कालौघात कात टाकणाऱ्या या शहराने आपल्या नवीनतम ओळखीचे अन्य मानदंडही निर्माण केले आहेत. त्यात ‘स्पोटर््स हब’ म्हणून विकसित होणाऱ्या बाबींचा आवर्जून उल्लेख करता येणारा आहे.
ऐतिहासिक व पौराणिक वारसा लाभलेल्या नाशकात सांस्कृतिक चळवळींनी धरलेले बाळसे पाहता मुंबई, पुण्यानंतर राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून नाशिकचा जसा उल्लेख केला जात असतो तसाच तो आता ‘वाइन कॅपिटल’ म्हणूनही होऊ लागला आहे. जिल्ह्यातील निफाड, पिंपळगाव (बसवंत), दिंडोरी परिसरात होत असलेले द्राक्षाचे मोठ्या प्रमाणातील उत्पादन लक्षात घेता वाइननिर्मिती करणारे उद्योग भरभराटीस येत आहेत. स्व. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ व आरोग्य विज्ञान विद्यापीठ या दोन विद्यापीठांपाठोपाठ आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शैक्षणिक संस्था येथे रुजल्याने ‘एज्युकेशन हब’ म्हणूनही नाशिकची ओळख निर्माण होत आहे; परंतु त्याचबरोबर जिल्ह्यातील आदिवासी वाड्या-पाड्यांवरून आलेले खेळाडू संपूर्ण देशात व देशाबाहेरही विविध खेळांमध्ये जो यशाचा ‘डंका’ वाजवित आहेत ते पाहता ‘स्पोर्ट्स हब’ म्हणूनही नाशिकची नवी ओळख प्रस्थापित व्हावी. अगदी अलीकडेच झालेल्या दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, चेन्नई, वसई आदि ठिकाणच्या मॅरेथॉन स्पर्धांमध्ये नाशिकच्या धावपटूंनी मिळवलेले यश यादृष्टीने महत्त्वाचे ठरले आहे.
आदिवासी पेठ परिसरातून आलेल्या कविता राऊतने दोनदा आॅलिम्पिक गाठले असून, तिच्याच पावलावर पाऊल टाकत त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अवघ्या शंभरेक घरांच्या दलपतपूरनामक पाड्यावरून आलेल्या ताई बामणे या धावपटूने गेल्याच आठवड्यात राष्ट्रीय शालेय अॅथ्लेटिक्समध्ये सुवर्णपदके व ‘सर्वोत्कृष्ट अॅथलीट’चा पुरस्कार मिळवून ती आगामी २०२०च्या आॅलिम्पिकची दावेदार असल्याची चुणूक दाखवून दिली आहे. थायलंडमधील युवा एशियन शालेय स्पर्धा व नैरोबीतील जागतिक शालेय स्पर्धेसाठी तिची निवड झाल्याने या दावेदारीला जणू दुजोराच मिळून गेला आहे. याच आठवड्यात झालेल्या दिल्लीतील नॅशनल मॅरेथॉनमध्ये मोनिका आथरे हिनेही नाशिकचा झेंडा फडकावित सुवर्णपदक प्राप्त केले आहे. मुंबई, बेंगळुरूतही मोनिकाने अशीच कामगिरी करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आंतरविद्यापीठ स्पर्धेत सलग तीनवेळा अजिंक्य ठरलेली व अलीकडील ठिकठिकाणच्या मॅरेथॉन्समध्ये विक्रमी वेळा नोंदविलेली संजीवनी जाधवदेखील नाशिकसाठी आशादायी ठरली आहे. ग्रामीण व विशेषत: आदिवासी भागातून पुढे येत प्रतिकूलतेशी सामना करीत आपले व जिल्ह्याचेही नाव उजळविणाऱ्या या सर्वच धावपटूंची अल्पावधीतील भरारी खरेच स्तिमित करणारी आहे. नाशिकच्याच युवा नेमबाज श्रेया गावंडे हिची नेमबाजीतील विश्वचषकाच्या भारतीय संघासाठी निवड झाली होती; परंतु पुढील वर्षीच्या कॉमनवेल्थमध्ये स्थान मिळवण्याच्या तयारीसाठी तिने सध्या प्रशिक्षणावर भर दिला आहे. मात्र मोनाली गोऱ्हे या नेमबाजीच्या प्रशिक्षिकेची भारतीय संघासाठी झालेली निवड नाशिककरांसाठी अभिमानाचीच ठरली आहे.
याच आठवड्यात झालेल्या खुल्या राष्ट्रीय नौकानयन स्पर्धेत तळेगावरोही या अत्यंत छोट्याशा गावातून आलेल्या दत्तू भोकनळ या रोइंगपटूने सुवर्णपदक पटकावले. दत्तू हा ब्राझील आॅलिम्पिक खेळून आलेला असून, सध्या तो बारावीची परीक्षा देत आहे. नौकानयन या खेळ प्रकारात आॅलिम्पिक गाठलेला महाराष्ट्रातील तो पहिलाच खेळाडू ठरला आहे. गेल्या आठवड्यात घडलेल्या या मोजक्या घटनांचाच येथे उल्लेख केला असला तरी, हल्ली नित्यच असे यशोदायी कार्य होत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील खेळाडूंनी चालविलेली ही आगेकूच पाहता, जिल्हा व पोलीस प्रशासनासह विविध संस्था तसेच औद्योगिक समूहदेखील या खेळाडूंना बळ देण्यासाठी पुढे सरसावलेले दिसत आहेत, ही समाधानाचीच बाब म्हणायला हवी.
- किरण अग्रवाल