राष्ट्रीय अनासक्तीयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 05:43 AM2018-05-04T05:43:17+5:302018-05-04T05:43:17+5:30

डोकलाममधील समोरासमोरच्या तणावानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनला प्रथमच परवा भेट दिली. गेल्या चार वर्षांत त्या दोघांच्या दहा भेटी झाल्या

National irregularity | राष्ट्रीय अनासक्तीयोग

राष्ट्रीय अनासक्तीयोग

Next

डोकलाममधील समोरासमोरच्या तणावानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनला प्रथमच परवा भेट दिली. गेल्या चार वर्षांत त्या दोघांच्या दहा भेटी झाल्या. त्यातील बहुतेक औपचारिक व निश्चित कार्यक्रमपत्रिका समोर ठेवून झाल्या. आताची भेट कार्यक्रमपत्रिकेवाचून झाली व तिचे स्वरूपही अनौपचारिक असल्याचे सांगितले गेले. या भेटीचे फलित कुणी सांगितले नाही व ते सांगितलेही जाणार नाही. मोदी आणि झिनपिंग यांच्यात या दौऱ्याच्या काळात सहा भेटी झाल्या. त्यातल्या काही त्या दोघांतच, कोणत्याही अधिकाºयाच्या उपस्थितीवाचून झाल्या. त्यामुळे परस्परांची मते व मने समजून घेण्याखेरीज त्यातून काही निष्पन्न होण्याजोगेही नव्हते. त्याचमुळे भाजपचे एक पुढारी राममाधव यांनी या भेटीचे ‘फळाची आशा न बाळगता झालेली भेट’ असे वर्णन करून तिच्याबाबत साºयांनी अनासक्तीयोग बाळगावा असा सल्ला देशाला दिला. परदेशाला दिलेली प्रत्येकच भेट फार यशस्वी होते असे नाही. नेत्यांची भेट हा त्यांच्यातील सलोखा दाखविण्याचाही एक भाग असतो. त्यातून चीन हा कमालीचा अविश्वसनीय देश आहे. त्याने नेहरूंना मित्र म्हटले व पुढे त्यांचा विश्वासघातही केला. १९७९ मध्ये तेव्हाचे परराष्ट्रमंत्री वाजपेयी हे चीनच्या दौºयावर असतानाच त्याने व्हिएतनाममध्ये आपले लष्कर घुसवून वाजपेयींना तो दौरा अर्ध्यावर सोडायला आणि चीनचा निषेध करून भारतात परतायला भाग पाडले. १९८८ मध्ये राजीव गांधींनी चीनला भेट दिली तेव्हा त्याने त्यांचे प्रचंड स्वागत केले. चर्चेची व दोन देशांमधील प्रश्नांची सोडवणूक करण्याची आश्वासनेही त्यावेळी चीनने दिली. प्रत्यक्षात ते प्रश्न तसेच राहिले. सीमेचा तंटा कायम राहिला आणि पुढल्या काळात चीनने अरुणाचल प्रदेशावर आपला हक्कच सांगितला. पाकव्याप्त काश्मिरातून, भारताचा निषेध डावलून त्याने औद्योगिक कॉरिडॉरचे बांधकाम सुरू केले. पुढल्या काळात व विशेषत: गेल्या तीन वर्षात त्याने नेपाळ, बांगलादेश, म्यानमार व श्रीलंकेसह मॉरिशस हे भारताचे शेजारी देश आपल्या बाजूने वळविले. पाकिस्तान तर त्याच्या सल्ल्यावाचून काहीएक करीत नाही. याच काळात चीनने भारताची फार मोठी बाजारपेठ काबीज केली. चिनी मालाची भारतातील आयात फार मोठी आहे. शिवाय परराष्ट्र मंत्रालयाचा डोळा चुकवून ती थायलंड व अन्य मार्गानेही भारतात होत आहे. याउलट भारतीय मालाला चीनमध्ये उठाव नाही. व्यापारातले हे असंतुलन घालविण्याएवढे आपले अर्थबळ व औद्योगिक क्षेत्र विकसितही नाही. तसाही आरमारी सामर्थ्य, अर्थबळ आणि अण्वस्त्रे या साºयांच बाबतीत चीन भारताच्या फार पुढे आहे. चिनी मालावर बहिष्कार घालून त्याची कोंडी करण्याची भाषा मध्यंतरी काहीजणांनी करून पाहिली. तिचा काहीएक उपयोग झाला नाही. उलट आंतरराष्ट्रीय राजकारणातला तो हास्यास्पद प्रकारच तेवढा ठरला. एक गोष्ट मात्र महत्त्वाची. फलनिष्पत्ती होवो वा न होवो, हाती काही लागो वा न लागो आणि दोन देशांदरम्यानचे प्रश्न मार्गीर् लागो वा न लागो, नेत्यांच्या भेटी होत राहणे महत्त्वाचे आहे. कारण त्यातून निष्पन्न फारसे काही होणार नसले तरी त्यामुळे फारसे नुकसान होत नाही. केनेडी म्हणायचे, ‘भिऊन चर्चा करू नका. पण चर्चा करायलाही भिऊ नका’ बोलणी सुरू राहिली तर प्रश्न कायम असले तरी संवाद व सलोखा टिकत असतो. गेल्या ६० वर्षांत निर्माण झालेले प्रश्न व तणाव अशा एखाददुसºया भेटीने निवळतील असेही कुणी समजण्याचे कारण नाही. फळाची आशा न धरता काम करीत राहण्याचा, कर्मयोगाचा राममाधवांनी केलेला उपदेशच अशावेळी लक्षात घ्यायचा. चीनला अडसर घालता येत नाही, त्याला थोपविता येत नाही आणि त्याची बरोबरीही करता येत नाही. अशावेळी कर्मयोगाचा मार्ग स्वीकारण्याखेरीज दुसरा पर्यायही उरत नाही. सबब, भेटी होत रहाव्या आणि त्यातून कधीतरी काही हाती लागेल अशी अपेक्षाही कायम ठेवायची हेच अशावेळी म्हणायचे.

Web Title: National irregularity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.