राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला वाळवी ! --- जागर --- रविवार विशेष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 12:20 AM2018-02-25T00:20:48+5:302018-02-25T00:20:48+5:30
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासूनच एक नवा झंझावात तयार झाला. मात्र, महाराष्ट्राच्या राजकारणाला गवसणी घालू शकला नाही. नव्या दमाच्या दुसºया फळीतील नेतृत्वाची स्वतंत्र सुभेदारी कधी झाली, हे कळलेच नाही....
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला वाळवी ! --- जागर --- रविवार विशेष
- वसंत भोसले -
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासूनच एक नवा झंझावात तयार झाला. मात्र, महाराष्ट्राच्या राजकारणाला गवसणी घालू शकला नाही. नव्या दमाच्या दुसºया फळीतील नेतृत्वाची स्वतंत्र सुभेदारी कधी झाली, हे कळलेच नाही....
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा दोन दिवसांचा कोल्हापूर दौरा गेल्या आठवड्यात झाला. त्यांचा दौरा हा पूर्वी एकप्रकारे झंझावात असायचा. आता तो राजकीय सावरासारवी वाटू लागला आहे. त्यामुळे जिल्ह्या-जिल्ह्यांतील दौºयात ते कोणाशी बोलतात, कोणाकडे चहाला जातात, कोणाकडे जेवण होते, कोणते कार्यक्रम स्वीकारतात, आदीविषयी चर्चा होते. त्यातूनच मग म्हटले जाते की, ‘‘शरद पवारसाहेब यांच्या मनातलं काही ओळखता येत नाही.’’ त्याचा फायदा घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेतेमंडळी सोयीचे राजकारण करीत पक्षालाच कमकुवत करीत सुटले आहेत. येत्या काळात खूप राजकीय संघर्ष होणार आहे, त्यात हा पक्ष टिकणे अवघड होत जाणार आहे. त्याला तोंड देण्याची तयारी कोठे दिसत नाही आणि सावरासावरीच्या राजकारणाने घराची वाळवी काही नष्ट होणार नाही.
दक्षिण महाराष्ट्र हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील संसदेच्या जागेपासून जिल्ह्याच्या अर्थकारणावर नियंत्रण ठेवणाºया जिल्हा बँकेपर्यंत सर्वांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेला पुढील वर्षी दोन दशके होतील. त्यापैकी पंधरा वर्षे हा पक्ष राज्याच्या आणि केंद्राच्या सत्तेत भागीदार होता. महाराष्ट्राचे राजकारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या भोवती पंधरा वर्षे फिरत राहिले. शरद पवार यांच्या नेतृत्वाच्या वलयामुळे एक नवी फळी तयार झाली. पवार त्याचे वर्णन ‘नव्या पिढीतील तरुण नेतृत्वाची नवीन फळी’ असे करायचे. महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांनी प्रारंभापासूनच बेरजेचे राजकारण करताना तरुण नेतत्वाची फळी तयार करण्यावर भर दिला होता. त्या फळीतीलच एक नेतृत्व म्हणजे शरद पवार! हीच वाट मळताना पवार यांनी तरुणांची फळी तयार केली. त्यात आर. आर. पाटील, जयंत पाटील, अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, अनिल देशमुख, जयदत्त क्षीरसागर, दिग्विजय खानविलकर, बबनराव पाचपुते, छगन भुजबळ, सुनील तटकरे, आदींचा समावेश होता. शिवाय रामराजे नाईक-निंबाळकर, विजयसिंह मोहिते-पाटील, विष्णूआण्णा पाटील, सदाशिवराव मंडलिक, यशवंतराव गडाख-पाटील, शिवाजीराव पाटील, आदी ज्येष्ठांची यादीही मोठी होती.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासूनच एक नवा झंझावात तयार झाला. मात्र, महाराष्ट्राच्या राजकारणाला गवसणी घालू शकला नाही. परिणामी काँग्रेसशी फारकत घेण्याला सहा महिने होण्यापूर्वीच आघाडी करून सरकार स्थापन करावे लागले. ज्या विलासराव देशमुख यांना त्यांच्या विरोधातील उमेदवारास ‘मामुली’ असा उल्लेख करून पाडले. त्यांचे नेतृत्व सरकारस्थानी स्वीकारावे लागले. आघाडीच्या राजकारणात ही मानहानी होते तशी सुरूवात झाली. पण एक नवी फळी निर्माण केली होती, यात वादच नाही. आघाडी सरकारमधील मुख्यमंत्रिपद वगळता सर्व प्रमुख खाती आणि पदे आपल्याकडे ठेवण्यातही यश मिळविले. स्थानिक पातळीवरील राजकारणात आघाडी करण्यास अडसर वाट राहिल्याने स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढविल्या. त्यात देखील हा पक्ष सलग पंधरा वर्षे आघाडीवर राहिला. जिल्हा परिषदा, महापालिका, नगरपालिका, बाजार समित्या, तालुका पंचायती, जिल्हा बँका, दूध संघ, राज्य सहकारी बँक, आदींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा दबादबा होता. त्यांचा वाटा अर्धा आणि उर्वरित सारे पक्ष अर्ध्यात वाटे करून जमेल तेवढे यश मिळवत होते. एक प्रकारचा राजकीय दबदबा निर्माण केला.नव्या दमाच्या तरुण नेतृत्वाच्या फळीने आघाडी सरकारमध्येही आपली चमक दाखवित काँग्रेसवर नेहमी मात करीत राहिली. आर.आर. पाटील, छगन भुजबळ, जयंत पाटील, अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, आदींची कामगिरी चमकदार राहिली. गृह, अर्थ, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, जलसंधारण, आदी महत्त्वाची खाती ते हाताळत होते. नवनवे प्रयोगही करीत होते. महाराष्ट्राची आर्थिक स्थिती ढासळली होती.
तिला सावरण्याची संधी आणि आव्हान समोर होते. कठीण काळातच अधिक चमकदार कामगिरी करण्याची संधी असते. या सर्वांना अनुभवी नेतृत्वाचे (शरद पवार) मार्गदर्शन होते. शिवाय राष्ट्रीय राजकारण आणि केंद्र सरकारचा धोरणात्मक वाटचालीचा प्रथमदर्शनी अहवाल त्यांना मिळत होता.
ही सर्व राजकीय परिस्थिती आणि मिळालेल्या संधीचा पुरेपूर वापर करीत पक्षाचा विस्तार होत होता. सुमारे दहा वर्षे उत्तम आणि चढत्या कलाने पक्षाचे काम चालू होते. मात्र, या तयार झालेल्या दुसºया फळीतील नेतृत्वाची स्वतंत्र सुभेदारी कधी झाली, हे कळलेच नाही. अजित पवार यांचा अहंभाव, छगन भुजबळ यांचा बेदरकारपणा आणि स्वतंत्र जहागीरदाराप्रमाणे वागणारे इतर नेते पक्षाची घडी बसविण्याचे काम विसरून गेले. मोठ्या साहेबांच्याही (शरद पवार) हाताबाहेर ही मंडळी बघता-बघता निघून गेली. कोठेही नाराजी, बंड, वेगळा विचार न मांडता शांतपणे पक्षाच्या विस्ताराला मारक ठरेल, अशी कृती ही मंडळी करीत गेली. यामुळे पक्षाची ताकद वाढणे आणि पक्षाच्या विस्ताराला मर्यादा येऊ लागल्या.
२०१४च्या निवडणूक पूर्वीची चार वर्षे आघाडी सरकारची बिघाडी सुरू झाली. लोकसभा निवडणुकीत केवळ सहा जागा आघाडीला मिळाल्या. (राष्ट्रवादी काँग्रेस चार - बारामती, माढा, सातारा आणि कोल्हापूर. काँग्रेस - हिंगोली आणि नांदेड) उर्वरित संपूर्ण महाराष्ट्रात सुफडासाफ झाला. खरे तर आघाडीत बिघाडी करण्याचे काम तत्कालीन काँग्रेस नेतृत्वाने सुरू केले आणि त्याला तितक्याच बेताल वागण्याने राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने प्रतिसाद दिला. एकमेकांचे कपडे उतरविणे सुरू झाले. पंधरा वर्षे आघाडीचे सरकार देऊन पुन्हा चौथ्या टर्मला सत्तेवर येणे अवघड नव्हते. लोकसभेच्या निवडणुकीत पराभव होऊनदेखील हे शक्य होते. कारण या दोन्ही काँग्रेस मिळून ऐक्याऐंशी जागा जिंकता आल्या- तेवढे त्यांचे बालेकिल्लेच आहेत. तेवढे नेतेच या पक्षात आहेत. आजही काही हाताच्या बोटावर मोजता येण्याइतके मागे पडतील पण बहुतेकजण निवडून येतील. उर्वरित साठ मतदारसंघांत एकमेकांविरूद्ध लढल्याने जागा विरोधी पक्षाला गेल्या. अनेकांनी पक्ष सोडले असे जवळपास चाळीस आमदार आज भाजप तसेच शिवसेनेत आहेत. त्यांचे बळ घटलेले नाही, संख्या घटली आहे.
अशा सर्व पार्श्वभूमीवर दक्षिण महाराष्ट्रावर नजर टाकली तर काय चित्र दिसते? हा एक बालेकिल्ला होता. त्याला आता वाळवी लागली आहे, असे दिसू लागले आहे. २००९च्या मतदार पुनर्रचनेच्या पूर्वी कोल्हापूर (बारा मतदारसंघ), सातारा (दहा) आणि सांगली (दहा) या तीन जिल्ह्यांत बत्तीस विधानसभा मतदारसंघ होते. त्यापैकी अठरा जागा राष्ट्रवादी काँग्रेसने १९९९ मध्ये स्वतंत्रपणे लढताना जिंकल्या होत्या. एक मित्र पक्षाने जिंकली होती. नऊ मतदारसंघांत दुसरे स्थान पटकाविले होते. दोन मतदारसंघांत मित्रपक्ष दुसºया स्थानावर होता. केवळ दोनच मतदारसंघांत तिसरे स्थान होते.
मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर दक्षिण महाराष्ट्राचे सहा विधानसभा मतदारसंघ कमी झाले. पुढील दोन निवडणुका काँग्रेसशी आघाडी करून लढविण्यात आल्या. त्यामुळे सव्वीसपैकी सर्वच मतदारसंघांत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उभे नव्हते, त्यामुळे यश मर्यादितच मिळणार होते. २०१४च्या विधानसभा निवडणुका जेव्हा स्वतंत्रपणे लढविण्यात आल्या तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ नऊ जागा मिळाल्या. त्यात सातारा जिल्ह्याचा वाटा मोठा होता. तेथील आठ पैकी पाच आमदार राष्ट्रवादीचे आहेत. काँग्रेसचे पार कंबरडे मोडले. साताºयात दोन आणि सांगली जिल्ह्यात एक असे तीनच आमदार निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर जिंकलेले यश टिकविता आले नाही.
खासदारकीच्या निवडणुकीत कोल्हापूर आणि माढा जेमतेम राखले गेले. हातकणंगलेमध्ये लढण्यापूर्वीच पराभव मान्य करत हक्काची जागा काँग्रेसला देऊन टाकली. आज साताराचे उदयनराजे भोसले आणि कोल्हापूरचे धनंजय महाडिक राष्ट्रवादीचे खासदार नावापुरते आहेत, असा त्यांचा व्यवहार आहे. तेच पुढे लढणार का? असा प्रश्नचिन्ह उभा आहे. निवडणुका बारा महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत, आणि बालेकिल्ल्यातील हक्काच्या जागेवरही अनिश्चिततेचे सावट दाटले आहे. शरद पवार यांचे सातारा, सांगली आणि कोल्हापूरला वारंवार दौरे होतात. पण राजकीय काम काहीच होत नाही. सत्कार, गुणगान, उद्घाटने आणि प्रदर्शने यावरच भर दिसतो. अनेकजणांना मोठा कार्यक्रम करायचा म्हणून शरद पवार यांना बोलविण्यात आनंद वाटतो. पूर्वी केलेली मदत याची उतराई व्हावे आणि आगामी काळात कसेही वागले किंवा निर्णय घेण्यात उपद्रवमूल्य आडवे येऊ नये, म्हणून हा सर्व खटाटोप चालतो. मध्यंतरीच्या काळात जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपालिका आदींच्या निवडणुका झाल्या. त्यात साताºयाचा अपवाद वगळता कोठेही पक्ष एकसंधपणे लढला नाही. खासदार कोठे असायचे माहीत नाही, आणि दोन-दोनच आमदार राहिलेल्यांना पक्ष पुन्हा मजबुतीने उभा करावा, असे वाटत नाही. सांगली जिल्ह्यात जयंत पाटील यांना सर्वाधिक संधी होती, पण ते अजूनही संपलेल्या राजकारणाच्या (दादा विरूद्ध बापू) चक्रव्यूहात जुन्या जमान्यातील चित्रपटात सुडाने डावपेच टाकणाºया पात्रासारखे वावरत असतात. सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी नवे सर्वव्यापी नेतृत्व देण्याची संधी त्यांनी गमावली.
सर्वांना बरोबर घेऊन कृषी-औद्योगिक आणि पायाभूत सुविधांची नवी रचना करीत सांगली जिल्हा पुन्हा एकदा उभा करण्याची सुवर्णसंधी होती. ती त्यांनी गमावली. अजूनही वेळ गेलेली नाही. पण आशादायक चित्र दिसत नाही. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा विस्तार आणि स्वत:च्या नेतृत्वाचा प्रभाव सर्वदूर निर्माण करण्याची ती संधी होती.
कोल्हापूर जिल्ह्यात त्याहून वेगळी स्थिती आहे. ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ आणि खासदार धनंजय महाडिक यांना ती संधी होती. पण मुश्रीफ मतदारसंघातील संघर्षाने मर्यादेत अडकतात आणि महाडिक यांना घराण्याच्या चौफेर राजकारणाच्या पलीकडे पाहता येत नाही. त्यातून त्यांची सुटकाहोऊ शकत नाही. परिणामी, त्यांच्या नेतृत्वाला मर्यादा आल्या आहेत. त्यातून पक्षाचे नुकसान होत आहे.
हे सर्व घडत असताना साहेबांना दिसत नसेल असे म्हणू शकणारा मराठी माणूस शोधून सापडणार नाही. पण ते निर्णय घेत नाहीत, दिशा स्पष्ट करीत नाहीत आणि दाखवित पण नाहीत, असे आता वाटू लागले आहे. सर्व काही नव्या दमाच्या नेतृत्वाच्या फळीतील नेत्यांनी संपविले आहे, असे मानायचे का? त्यापुढे ते हतबल झालेत, आणि निवृत्तीच्या काठावर पोहोचून सर्वपक्षीय, राजकीय किनार नसलेले दौरे करीत आहेत! असे वास्तव असले तरी त्यांची अभ्यासूवृत्ती सजग आहे. नवी माहिती घेऊन मार्गदर्शन करणे, मदतीला उभे राहणे चालू आहे. मात्र, त्यातून राजकारण पुढे जात नाही, त्याचे काय? ही पक्षनेतृत्वाच्या फळीतील नेत्यांचे अपयश नाही का? त्यांच्या उभारणीत चुका नव्हत्या पण त्यांच्या वागणुकीवर नियंत्रण ठेवण्यात अपयश आले असे मानायचे का? परिणामी, राष्ट्रवादी काँग्रेसला पुढील वर्ष त्रासदायक ठरणार आहे. उरलीसुरली ताकददेखील संपून बसणार का? गत निवडणुकीत हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील राजकारण त्याचा ट्रेलर होता, असे मानायचे का?