‘नाटू नाटू’, गोल्डन ग्लोब आणि आपले एम. एम. क्रीम...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2023 10:36 AM2023-01-13T10:36:12+5:302023-01-13T10:36:17+5:30
आरआरआर सिनेमाचे संगीतकार एम. एम. किरवाणी म्हणजेच आपले एम. एम. क्रीम; हे माहितेय का तुम्हाला? आठवतं का ‘जादू है नशा है..’ किंवा ‘तू मिले, दिल खिले..’
एस. एस. राजमौली यांचा आरआरआर हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि तो लोकांनी डोक्यावर घेतला. या सिनेमातल्या ‘नाटू नाटू’ गीताला नुकताच ‘बेस्ट ओरीजनल साँग’ विभागातला ‘गोल्डन ग्लोब’ पुरस्कार मिळाला. या गीतात ठेका धरून डोलायला लावण्याचं सामर्थ्य आहे. खरं तर हे गाणं काही अवीट गोडीचं वैगेरे नाही. दक्षिणेतील चित्रपट जसे त्यांची ग्राफिक्स, साहसदृश्यं, कथानक आणि भव्यतेसाठी प्रसिद्ध असतात, त्याचप्रमाणे संगीत ही त्यांची मोठी जमेची बाजू असते. आरआरआर सिनेमाचे संगीतकार एम. एम. किरवाणी म्हणजेच आपले एम. एम. क्रीम ! ९० च्या दशकातल्या लोकांना हे नाव सहज आठवेल. अतिशय श्रवणीय आणि नवीन प्रकारची गाणी बांधणारा हा संगीतकार. इस रात की सुबह नहीं सिनेमाचा संपूर्ण अल्बम अत्यंत श्रवणीय होता.
‘जीवन क्या है, कोई न जाने..’ या गाण्यातली इंटरल्युडस तेव्हा दूरदर्शनच्या स्वाभिमान मालिकेत वाजत असत. ‘चूप तुम रहो, चूप हम रहे’सारखं गाणं कोणी विसरू शकणार नाही. त्यानंतर हे साहेब पुन्हा आपल्याला भेटले ते क्रिमिनल सिनेमातल्या ‘तू मिले, दिल खिले; और जिनेको क्या चाहिये’या गाण्यातून. या गाण्यातला सुरुवातीचा आलाप आणि पहिल्या कडव्यानंतर येणाऱ्या कवितेच्या इंग्रजी ओळीही आठवत असतील. तो काळ नदीम श्रवण, आनंद मिलिंद, दिलीप सेन, समीर सेन, अन्नू मल्लिक यांचा होता. टिपिकल बॉलिवूड स्पर्श असलेली ती गीतं होती. त्यात एम. एम. क्रीम यांनी आपल्या संगीताने मिंटची गोळी खावी तसा ताजेपणा आणला. इतकंच नव्हे, तर त्यांनी हिंदीत दरवेळी एक नवीन प्रकारचं गाणं दिलं. जिस्म सिनेमातील ‘चलो..’, ‘जादू है नशा है..’ ही गाणी शृंगाररसाचं संगीतमय उदाहरण आहेत. त्यातच ‘आवारापन , बंजारापन’ या गाण्याने पुन्हा एकदा एम. एम. क्रीम यांची विचार करण्याची पद्धत किती अनोखी आहे हे सिद्ध केलं. जख्म सिनेमातलं ‘गली में आज चांद निकला..’ हे गाणं अजूनही अनेकांच्या प्लेलिस्टमध्ये लुपवर ऐकायचं गाणं आहे.
या संगीतकाराने पुन्हा एक सुखद धक्का दिला तो ‘पहेली’ सिनेमाच्या गाण्यांतून. पुन्हा एकदा संपूर्ण अल्बम संग्रहात असावा असा. धीरे जालना धीरे जालना.. हे फक्त गाणं नाही, तर कथानक पुढे नेणारा, नायिकेचा ठाम निर्णय सांगणारा महत्त्वाचा प्रसंगही आहे, याचं भान ठेवत त्यांनी गाण्याच्या अखेरीस जी शहनाई योजली ती निव्वळ काबिले तारीफ आहे. तीच गोष्ट ‘मिन्नत करे..’ची. लग्न होऊ घातलेल्या मैत्रिणीची थट्टा करणाऱ्या मैत्रिणी जशी खोड काढतील आणि चार अनुभवाच्या गोष्टी सांगतील, तसा कुरकुरीत आणि मिठ्ठास असलेला पोत आहे त्या गाण्याचा. म्हणूनच आज ‘नाटू’नाटूचं जागतिक स्तरावर कौतुक झालं, तेव्हा या आपल्या लाडक्या संगीतकारासाठी फार आनंद झाला.
- खरं तर ‘नाटू नाटू’ त्यांच्या इतर गाण्यांसारखं नाही. पण गाण्याचं चित्रीकरण, ठेका, लय लक्षवेधक आहे. शिवाय दक्षिणेतले आघाडीचे दोन नट रामचरण आणि ज्युनिअर एन. टी. रामाराव यांचं डोळ्यांचं पारणं फिटवणारं नृत्य ही या गीताची आणखी एक जमेची बाजू म्हणावी लागेल. दोन आघाडीचे नट अशाप्रकारे एकमेकांशी जुळवून घेत लयबद्ध नाचतात, ही जुळवून घेणारी लय आजवर फक्त ‘अपलम चपलम’ या जुन्या गीतातच पाहिल्याचं आठवतं. दोघेही रांगडे गडी नाचताना फार सुंदर दिसतात. भारतीय सिनेमा म्हणजे फक्त हिंदी सिनेमा नाही, हे प्रादेशिक सिनेमांनी आता पटवून दिलं आहे. दक्षिणेसोबतच मराठी, गुजराती, बांग्ला, असमिया सिनेमांनी हे सिद्ध केलं आहे. म्हणूनच ८० व्या गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात आपल्या या तेलुगु भाषिक गीताला आशियातला पहिला आणि भारतातलाही पहिला पुरस्कार मिळावा, हा आनंदाचा आणि अभिमानाचा विषय नक्कीच आहे .
- माधवी भट