Solar Eclipse: कोरोना काळातील उद्याचं सूर्यग्रहण खरंच काळजी वाढवणारं आहे का?... जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 05:19 AM2020-06-20T05:19:12+5:302020-06-20T10:18:56+5:30
सूर्यग्रहणामुळे असे घडेल, तसे घडेल असे संदेश व्हायरल होत असल्याने जनसामान्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
- दा. कृ. सोमण, पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक
रविवारी, २१ जूनला होणारे ‘कंकणाकृती सूर्यग्रहण’ संपूर्ण भारतातून दिसणार आहे. या सूर्यग्रहणाची कंकणाकृती अवस्था राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि उत्तराखंड या राज्यांतील काही प्रदेशांतून दिसणार असून, उर्वरित भारतातून हे सूर्यग्रहण खंडग्रास अवस्थेत दिसणार आहे. सध्या कोरोनाशी लढाई सुरू असल्याने या सूर्यग्रहणाकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून पाहिले जात आहे. या सूर्यग्रहणामुळे असे घडेल, तसे घडेल असे संदेश व्हायरल होत असल्याने जनसामान्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना आणि वादळामुळे लोक आधीच ग्रासलेले असताना अशी अवैज्ञानिक भाकिते चिंतेत भर टाकत आहेत. त्यामुळे ग्रहणविषयक गैरसमजुतींचे ग्रहण सुटणे आवश्यक झाले आहे.
चंद्रबिंब जेव्हा सूर्यबिंबाला झाकून टाकते, त्यावेळी सूर्यग्रहण दिसते. ज्यावेळी चंद्रबिंबामुळे सूर्यबिंबाचा काही भाग झाकला जातो, त्यावेळी ‘खंडग्रास सूर्यग्रहण’ दिसते. ज्यावेळी संपूर्ण सूर्यबिंब झाकले जाते त्यावेळी खग्रास सूर्यग्रहण दिसते. खग्रास सूर्यग्रहणावेळी जर चंद्र पृथ्वीपासून दूर असेल, तर चंद्रबिंब आकाराने लहान दिसत असल्याने सूर्यबिंबाला पूर्णपणे झाकून टाकू शकत नाही. त्यावेळी सूर्यबिंबाची गोलाकार कडा दिसते त्याला आपण ‘कंकणाकृती सूर्यग्रहण’ असे म्हणतो. चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण हे नैसर्गिक आविष्कार आहेत. प्राचीनकाळी ज्यावेळी विज्ञान प्रगत नव्हते, त्यावेळी जनसामान्यांना ग्रहणांची भीती वाटणे साहजिकच होते. त्यामुळे काही प्राचीन ग्रंथांमध्ये ग्रहणकाळात पाळावयाचे नियम सांगितले गेले; परंतु विज्ञानात प्रगती झाल्यामुळे ग्रहण हा चमत्कार नसून, तो एक नैसर्गिक खगोलीय आविष्कार आहे हे सर्वांना समजून आले आहे.
यापूर्वी २६ डिसेंबर, २०१९ रोजी झालेल्या सूर्यग्रहणाची कंकणाकृती अवस्था दक्षिण भारतातून दिसली होती. त्यावेळी उर्वरित भारतातून खंडग्रास सूर्यग्रहण दिसले होते. यावेळी ‘कंकणाकृती अवस्था’ पंजाब, राजस्थान, हरियाणा आणि उत्तराखंड येथून सुमारे एक मिनिट दिसणार असून, उर्वरित भारतातून ‘खंडग्रास सूर्यग्रहण’ दिसणार आहे. विशेष म्हणजे जेथे भगवान श्रीकृष्णाने गीता सांगितली त्या कुरूक्षेत्रावरून दुपारी १२.०१ ते १२.०२ या वेळेत फक्त एक मिनिट कंकणाकृती अवस्था दिसणार आहे. कुरुक्षेत्रावर ब्रह्म सरोवर आहे. काही भाविक ग्रहण सुटल्यावर ब्रह्म सरोवरावर तीर्थस्नानासाठी गर्दी करण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या काळात हे सूर्यग्रहण होत असल्याने हरियाणा राज्य सरकारला विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे.
कुरूक्षेत्र येथे १०.२१ ते १.४८ या वेळेत, जोशीमठ येथे १०.२८ ते १.५४, डेहराडून येथे १०.२४ ते १.५१ या वेळेत सूर्यग्रहण दिसणार आहे. या सर्व ठिकाणांहून सुमारे एक मिनिट ‘कंकणाकृती अवस्था’ दिसणार आहे. मुंबई १०.०१ ते १.२८, पुणे १०.०३ ते १.३१, औरंगाबाद १०.०७ ते १.३७, नाशिक १०.१८ ते १.५१, नागपूर १०.१८ ते १.५१ आणि जळगांव येथे १०.०८ ते १.४० या वेळेत ‘खंडग्रास सूर्यग्रहण’ दिसणार आहे. सूर्यग्रहण थेट पाहू नये. पाहिल्यास दृष्टीस इजा होते. ग्रहण चष्म्यातूनच पाहावे. दुर्बिणीलाही योग्य फिल्टर लावूनच सूर्यग्रहण पाहावे. त्यानंतर भारतातून दिसणारी कंकणाकृती सूर्यग्रहण २१ मे २०३१, १७ फेब्रुवारी २०६४, ८ डिसेंबर २११३ रोजी होणार आहे. महाराष्ट्रातून कंकणाकृती अवस्था दिसणारे सूर्यग्रहण खूप कालावधीनंतर ३ नोव्हेंबर २४०४ रोजी होणार आहे.
ग्रहणविषयक गैरसमजुती
खरं सांगायचे तर ग्रहणामुळे पृथ्वीवरचे वातावरण दूषित होत नसते. ग्रहणाचे वाईट परिणामही दिसून येत नाहीत. यावेळी ५ जूनला ‘छायाकल्प चंद्रग्रहण’ झाले. २१ जूनला ‘कंकणाकृती सूर्यग्रहण’ होत आहे आणि ५ जुलैला पुन्हा ‘छायाकल्प चंद्रग्रहण’ होणार आहे; परंतु ते भारतातून दिसणार नाही. लागोपाठ तीन ग्रहणे आल्यामुळे वाईट घडेल असे जे सांगितले जाते, त्यात काहीही तथ्य नाही. २०१८ मध्येही १३ जुलै, २७ जुलै आणि ११ आॅगस्ट अशी लागोपाठ तीन ग्रहणे झाली होती. त्यावेळी काहीही वाईट घडले नव्हते. त्यानंतर २०२९ मध्ये पुन्हा १२ जून, २६ जून व ११ जुलै अशी लागोपाठ तीन ग्रहण होणार आहे. अशी लागोपाठ तीन ग्रहणे अनेकवेळा आलेली आहेत.
कोरोना आणि सूर्यग्रहण यांचाही संबंध सांगितला जातो. त्यात काहीही तथ्य नाही. कोरोना येणार असल्याचे भाकीत कोणी केले नव्हते. सूर्यग्रहणामुळे जर कोरोना जाणार असता, तर २६ डिसेंबरच्या सूर्यग्रहणातच तो नष्ट झाला असता. त्यामुळे या सूर्यग्रहणामुळे कोरोना नष्ट होईल, असे म्हणण्यात काहीही तथ्य नाही.
सूर्यग्रहणात काही धार्मिक नियम सांगितलेले आहेत. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिल्यास त्यामध्येही काही तथ्य नाही. अर्थात काही लोक श्रद्धा म्हणून नियम पाळत असतील तर बोलणेच खुंटले! कारण श्रद्धा म्हटले की, पुढे कार्यकारणभाव शोधणे येतच नाही. ग्रहणांचा घटनांवर किंवा मानवी जीवनावर परिणाम होत नाही असे विज्ञान सांगते. हे वैज्ञानिक युग आहे. पुढच्या पिढीला वैज्ञानिक दृष्टिकोनातून दिलेली उत्तरेच पटतात. आजचा भारत पुढची पिढी घडविणार आहे. नव्या पिढीमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविणे महत्त्वाचे आहे. पालक, शिक्षक आणि जाणकारांनी ग्रहणासारख्या खगोलीय घटना व त्यामागचे विज्ञान नव्या पिढीला समजावून सांगितले पाहिजे. त्यासाठी पालक, शिक्षक व जाणकारांनी स्वत: वैज्ञानिक दृष्टिकोन आचरणे आवश्यक आहे. रविवारी होणारे ‘कंकणाकृती सूर्यग्रहण’ ठरल्यावेळी सुटेल; परंतु ग्रहणविषयक अंधश्रद्धांचे ग्रहण कधी सुटणार?