निसर्गधर्माचा संबंध पापपुण्याशी नाही
By admin | Published: January 16, 2016 03:01 AM2016-01-16T03:01:20+5:302016-01-16T03:01:20+5:30
केरळातील अय्यप्पा मंदिरात दहा ते पन्नास वर्षे या वयोगटातील स्त्रियांना प्रवेश नाकारण्याच्या मंदिराच्या व्यवस्थापकांच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या
केरळातील अय्यप्पा मंदिरात दहा ते पन्नास वर्षे या वयोगटातील स्त्रियांना प्रवेश नाकारण्याच्या मंदिराच्या व्यवस्थापकांच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेने सगळ््या धर्मवीरांएवढेच सुधारकांचेही लक्ष वेधून घेतले आहे. या वयातील स्त्रियांना ऋतुधर्मामुळे ‘दूर’ बसावे लागते. त्यांच्या मंदिरात येण्याने भगवान अय्यप्पा अस्वस्थ होतात आणि मंदिराचे पावित्र्य भंग पावते असा या बंदीमागचा व्यवस्थापकांचा दावा आहे. त्यांच्या बाजूने सांगण्यासारखी एक गोष्ट ही की ही परंपरा तेथे वर्षानुवर्षे सुरू आहे. ती दूर सारावी आणि मंदिरात सर्व वयाच्या स्त्रियांना प्रवेश दिला जावा अशी मागणी एका महिला वकिलाने केली आहे. या न्यायालयासमोर ती येऊनही आता वीस वर्षे झाली आहेत. ती सुनावणीला आल्यानंतर न्या. दीपक मिश्र, न्या. पी.सी. घोष आणि न्या. एम.व्ही. रामन यांनी मंदिराच्या व्यवस्थापनाला ‘अशी बंदी घटनेत बसणारी आहे काय’ असा प्रश्न विचारला तेव्हा व्यवस्थापनाचे वकील अॅड. ए.के. वेणुगोपाल म्हणाले, ही प्रथा आहे आणि गेली अनेक वर्षे ती तशीच पाळली जात आहे. केरळात डाव्या पक्षांच्या नेतृत्वातील सरकार मध्यंतरी सत्तेवर असताना त्याने ही बंदी उठविण्याची तयारी दर्शविली होती व त्यासाठी आपले निवेदन न्यायालयाला सादरही केले होते. नंतरच्या काळात आलेल्या सरकारांनी त्याची फारशी दखल घेतली नाही. परिणामी हा वाद आता थेट न्यायालयाच्या निर्णयासमोरच आला आहे. एखादी प्रथा वा परंपरा समाजाच्या एका मोठ्या वर्गावर दीर्घकाळ अन्याय करणारी, त्याला कमी लेखणारी व त्याच्या नैसर्गिक व्यवहारांच्या कसोटीवर त्याला न्याय नाकारणारी असेल तर ती अन्यायकारकच मानली पाहिजे. देशातली बहुसंख्य मंदिरे एकेकाळी समाजाच्या एका मोठ्या वर्गासाठी बंद होती. गांधीजींनी केलेल्या उपोषणामुळे त्यातील अनेकांचे दरवाजे साऱ्यांसाठी खुले झाले. अय्यप्पाचा प्रकार स्त्रियांवर कनिष्ठ दर्जा लादणारा व त्यांचा निसर्गधर्म हा जणू त्यांचा अपराधच आहे असे सांगणारा आहे. वयात आलेल्या मुलांना जशा मिशा फुटतात तशा वयात येणाऱ्या मुलींना ऋतुधर्म प्राप्त होतो हा निसर्गाचा नियम आहे. ईश्वर आणि प्रत्यक्ष अय्यप्पा त्यांना व्यक्तीचा कृतीधर्म समजत असतील तर तो दूषित व्यवहार या भगवंतानेच निर्माण केला आहे असे म्हणणे भाग आहे. पण रुढी, प्रथा आणि परंपरा कितीही जुनाट झाल्या आणि त्या समाजाचे हातपाय बांधू लागल्या तरी त्यांच्या बाजूने उभे राहणारी माणसे आणि त्यांचे समुदाय आपले जुने हट्ट सोडायला तयार होत नाहीत. एकेकाळी आपल्यात वपनाची अतिशय क्रूर व निंद्य परंपरा होती आणि तिला श्रेष्ठत्व चिकटविण्यात समाजातील कर्त्या माणसांचा मोठा वर्ग होता. या प्रथेविरुद्ध अनेकांनी लिहिले पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. एक दिवस न्हावी समाजातील बहाद्दर तरुणांनीच ‘या पुढे वपनाला जाणार नाही’ अशी भूमिका घेतली तेव्हा तो दुष्ट प्रकार संपला. अस्पृश्यतेविरुद्ध साऱ्या समाजधुरिणांनी चळवळी उभ्या केल्या. तेव्हाही तिचे समर्थन जाहीर सभांमधून करणारे बिलंदर लोक आपल्यात निघालेच. परवापर्यंत शनीशिंगणापूरच्या मंदिरात स्त्रियांना प्रवेश सोडा पण त्याच्या आसपासही फिरकण्याची मुभा नव्हती. एका शूर तरुणीने या प्रकाराविरुद्ध एकहाती बंड उभारले आणि मंदिरप्रवेशाचा आपला हक्कही बजावला. काही दिवसातच त्या मंदिराच्या संचालक मंडळावरच दोन महिलांची निवड झाली. ही समाजाच्या प्रगतीची पावले आहेत आणि त्यांना सरकारसह साऱ्यांचे समर्थन लाभले पाहिजे. स्त्रिया, दलित, आदिवासी, अल्पसंख्य आणि गरीब यांना दडपण्याच्या प्रत्येकच प्रयत्नाविरुद्ध समाजाने असेच एकत्र येण्याची आता गरज आहे. पंढरपूरच्या मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा म्हणून साने गुरुजींनी आंदोलन केले व ते करताना प्रत्यक्ष म. गांधींची आज्ञाही त्यांनी अव्हेरली. अय्यप्पाच्या मंदिरातील स्त्रियांच्या प्रवेशाला अडसर उभा करण्याचा प्रयत्नही असाच मोडून काढला पाहिजे. मंदिर, मशिद किंवा कोणतेही पूजास्थान हे प्रत्यक्षात सार्वजनिक ठिकाण आहे आणि त्यात प्रवेश करण्याचा अधिकार घटनेनेच नागरिकांना दिला आहे. घटनेचा कायदा कोणत्याही श्रद्धेहून वरचढ व श्रेष्ठ आहे. आताच्या सर्व स्त्रीविरोधी प्रथा फार जुन्या अंधश्रद्धेवर आधारित व ज्या काळात स्त्री घराबाहेर न पडता त्याच्या चौकटीत राहून जगत होती तेव्हाच्या आहेत. आता तिने राष्ट्रपती भवनापासून सैन्यदलापर्यंत सर्वत्र प्रवेश केला आहे. जगातील सर्वोत्तम गुणी प्रशासक म्हणूनही तिने नाव मिळविले आहे. तरीही आपल्या परंपरागत समजुती व मानसिकता त्यांना कमी लेखण्याचे जुने सोपस्कार तसेच चालवीत आहेत. काही वर्षांपूर्वी इंदिरा गांधी जगन्नाथ पुरीतील भगवंताच्या दर्शनाला गेल्या होत्या. तेथील पुजाऱ्यांनी त्यांना त्या पंतप्रधान असतानाही मंदिरात प्रवेश नाकारला होता. त्यावेळी रस्त्यावरूनच भगवंतांला नमस्कार करून त्या नम्रपणे परत गेल्या. मात्र या घटनेने त्या पुजाऱ्यांच्या माथ्यावर चिकटविलेला दोष काही दूर झाला नाही. ऋतुमती होणे हा स्त्रीचा प्रकृतीधर्म आहे. त्याचा पाप-पुण्याशी संबंध नाही. त्याच्याशी अय्यप्पाला काही घेणेदेणे नाही. स्त्रीच्या सबलीकरणाच्या काळात तर असे करणे हाच गुन्हा ठरला पाहिजे.