‘नक्षल गावबंदी’ योजनेला नक्षलप्रभावित भागातून जोरदार प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 12:28 AM2017-10-27T00:28:22+5:302017-10-27T00:28:35+5:30
कोणतीही शासकीय योजना लोकसहभागाशिवाय यशस्वी ठरत नाही, आणि लोकांचा सहभाग तेव्हाच मिळतो जेव्हा योजनेमागील शासनाचा प्रामाणिक हेतू दिसून येतो. सरकारने जाहीर केलेल्या ‘नक्षल गावबंदी’ योजनेला नक्षलप्रभावित भागातून जोरदार प्रतिसाद मिळत आहे. त्यानिमित्ताने दिलीप तिखिले यांचा हा लेख.
गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया या नक्षल प्रभावित जिल्ह्यांत हजारांवर गावांनी नक्षल गावबंदीचा ठराव घेतला याबद्दल या गावांचे व तेथील गावकºयांच्या धाडसाचे तोंडभरून कौतुकच केले पाहिजे, कारण नक्षल्यांना गावबंदी करून त्यांच्याशी सरळ दोन हात करण्याचा निर्धारच गावकºयांनी या ठरावातून व्यक्त केला आहे. तशी ही योजना शासनाने २००३ मध्येच लागू केली होती. पण कोणतीही शासकीय योजना म्हटली की, सुरुवातीला लोक त्याकडे संशयानेच पाहतात. बहुतांश शासकीय योजनांचा फायदा थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतच नाही, त्यातील मलिदा मध्यस्थच लाटतात आणि शेवटी अल्पसा वाटा खºया लाभार्थ्यांच्या वाट्याला येतो असा अनुभव जनतेला नेहमीच येतो. नक्षल गावबंदीच्या शासकीय योजनेलाही सुरुवातीला गावकºयांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. पण यामागे दोन कारणे होती. मुख्य कारण म्हणजे नक्षल्यांची प्रचंड दहशत, आणि दुसरे, सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार की नाही याबाबतची साशंकता. पण दरम्यानच्या काळात सरकारने नक्षलप्रभावित भागांसाठी ज्या विशेष उपाययोजना केल्या आणि प्रभावीपणे त्याची अंमलबजावणीही सुरु केली तेव्हा नक्षली दहशतवादाच्या सावटाखाली जगणाºया गावकºयांनी या योजनेला साथ देण्याचा मनापासून निर्णय घेतला.
विदर्भाच्या नक्षलप्रभावित या तीन जिल्ह्यांत विशेषकरून गडचिरोलीमध्ये अलीकडच्या काळात चित्र पालटलेले दिसून येते. पूर्वीचा काळ वेगळा होता. गोरगरिबांचा ‘मसिहा’ म्हणून शिरकाव केलेल्या नक्षलवाद्यांना गावकºयांकडूनच रसद मिळत होती. पोलिसांच्या कारवाईच्यावेळी हेच गावकरी नक्षल्यांना आपल्या गावांत संरक्षण देत असत. या भागातील ठेकेदार, उद्योगपती, शासकीय अधिकारी यांच्याकडून होणाºया पिळवणुकीपासून हेच ‘मसिहा’ आपली सुटका करतील अशी समजूत या भागातील अडाणी आदिवासींनी करून घेतली होती. शासन पातळीवरून दाखविली जाणारी उदासीनताही या समजुतीला बळकटीच देत होती. त्यामुळे नक्षल्यांचे फावले. त्यांच्या एका हाकेवर गावकरी निवडणुकांवर बहिष्कार टाकत होते.
आज चित्र पालटले आहे. नक्षल्यांचा खरा चेहरा गावकºयांंनी ओळखला. ठेकेदार, उद्योगपतींच्या जाचातून सुटका करु म्हणणारे नक्षलवादी जेव्हा त्यांच्याकडूनच खंडणी घेऊन गरीब आदिवासींना वाºयावर सोडू लागले, रात्री, बेरात्री गावांवर हल्ले करून निरपराध नागरिकांची हत्या करू लागले तेव्हा त्यांचे ‘खायचे दात’ वेगळे आहेत याची साक्ष गावकºयांना पटली आणि नक्षल्यांविरुद्ध त्यांनी जिहाद पुकारला. गावोगावी असलेली नक्षली स्मारके गावकºयांनी स्वत:हून उद्ध्वस्त केलीत. नक्षल्यांच्या दबावामुळे वर्षांनुवर्षे जेथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच होत नव्हत्या तेथे गावकरीच हा दबाव झुगारून स्वयंस्फूर्तीने मतदानात भाग घेऊ लागले. आताचे ‘नक्षली गावबंदी’ ठराव हे त्यांचे आणखी पुढचे पाऊल आहे.