नयनतारा ते वैशाली येडे ! -- रविवार विशेष -- जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 01:03 AM2019-01-13T01:03:02+5:302019-01-13T01:14:38+5:30

पंडित जवाहरलाल नेहरू ज्यांना नको आहेत त्यांना त्यांची भाचीही नको आहे. यामुळेच नयनतारा सहगल यांना विरोध झाला. मात्र, ज्या शेतकऱ्याच्या आत्महत्येचे राजकारण केले, त्याच्या विधवा पत्नीने आताच्या राज्यकर्त्यांनी निर्माण केलेल्या समाजाचे ‘विधवा समाज’ असे वर्णन करून मराठी सारस्वतांच्या नेतृत्वाचा खुजेपणाही दाखवून दिला.

Nayantara to Vaishali Yde! - Sunday Special - Jagar | नयनतारा ते वैशाली येडे ! -- रविवार विशेष -- जागर

नयनतारा ते वैशाली येडे ! -- रविवार विशेष -- जागर

Next
ठळक मुद्देमराठी माणसाची मान शरमेने खाली घालविणारी ही घटना आहे. त्यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात काय म्हटले आहे पहा.हा भारतीय समाज पुढे कसा जाईल यासाठीचे स्वप्न त्या पाहत आहेत? याचा थोडातरी विचार मराठी माणसांनी करून मन मोठं करुन दाखवायला हवे होते.

- वसंत भोसले

पंडित जवाहरलाल नेहरू ज्यांना नको आहेत त्यांना त्यांची भाचीही नको आहे. यामुळेच नयनतारा सहगल यांना विरोध झाला. मात्र, ज्या शेतकऱ्याच्या आत्महत्येचे राजकारण केले, त्याच्या विधवा पत्नीने आताच्या राज्यकर्त्यांनी निर्माण केलेल्या समाजाचे ‘विधवा समाज’ असे वर्णन करून मराठी सारस्वतांच्या नेतृत्वाचा खुजेपणाही दाखवून दिला. ही भारतीय तत्त्वप्रणालीची आणि महिलांची ताकद आहे.

भारतीय इतिहासाच्या वाटचालीतील कर्त्यासर्त्या घराण्याची प्रतिनिधी, साक्षीदार आणि त्याच आधारे राजकीय पार्श्वभूमीवर कादंबऱ्या लिहिणाºया नयनतारा सहगल या वयोवृद्ध लेखिकेविना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले. वास्तविक ज्यांनी कोणी नयनतारा सहगल यांची निवड उद्घाटक म्हणून केली असेल त्यांनी एक इतिहासाशी जोडणारी संधी साधली होती; मात्र मराठी सारस्वतांच्या जगताचे दुर्दैव की, एक ऐतिहासिक नोंद करणारी संधी साधता आली नाही. नयनतारा सहगल या इंग्रजी लेखिका आहेत,
म्हणून ‘मनसे’चा कोणी उपटसुंभ विरोध करीत होता. ती मोठी चूक होती. याबद्दल ‘मनसे’चे संस्थापक राज ठाकरे यांना दिलगिरी व्यक्त करावी लागली. त्यानंतर राज्यकर्ते जागे झाले. ते पडद्याआड होते. मराठी सारस्वत आणि त्याची पालखी वाहणारी लेचेपेचे होते म्हणून हे उपटसुंभ नयनतारा सहगल यांच्या विचारधारेवर घसरले आणि एक ऐतिहासिक नोंद करायची संधी मराठी भाषेच्या सारस्वतांनी गमावली.

नयनतारा सहगल यांची राजकीय विचारधारा जरूर पहा; मात्र त्यांनी साहित्य क्षेत्रात केलेली कामगिरी विचारात घेणार आहोत की नाही? त्या आता उद्घाटक म्हणून आल्या नाहीत. त्याऐवजी यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील राजूर गावच्या वैशाली येडे यांना संधी देण्यात आली. त्यांना निमंत्रित करण्यात आले. एका उद्ध्वस्त शेतकºयाची पत्नी. पतीच्या आत्महत्येमुळे जीवनाचे हेलकावे सहन करणारी महिला, आई, विधवा स्त्री, कन्या आणि अंगणवाडी सेविकाही. केवळ बारावी शिकलेल्या या वैशाली येडे यांनी उद्घाटक म्हणून जे भाषण केलं, त्याने आपल्या सुरक्षित जीवन जगणाºया मराठी सारस्वतांच्या जगाचे कपडेच उतरवून ठेवले. ज्या संघर्षाच्या पार्श्वभूमीतून नयनतारा सहगल घडल्या, त्याच संघर्षाच्या वाटेवर उभ्या असलेल्या वैशाली येडे आहेत. त्यांनी तर चक्क सांगून टाकलं की, मी विधवा झाली नाही. ती नैसर्गिक कृती नव्हती. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय कृती आहे. माझ्या पतीची आत्महत्या ही एक दुर्दैवी घटना नाही. ती सामाजिक आहे. परिणामी मी एक महिला विधवा झाली नाही. समाजच विधवा झाला आहे. त्याचेच चैतन्य संपले आहे. ज्यांनी नयनतारा सहगल यांना नाकारले त्यांनी वैशाली येडे यांना नाकारून पहावे. त्या सांगत होत्या की, स्वतंत्र भारताच्या सत्तर वर्षांनंतरचे वास्तव! नयनतारा सहगलसुद्धा तेच सांगत होत्या. त्यांच्यापेक्षा अधिक कडक आणि ग्रामभाषेत वैशाली येडे यांनी संपूर्ण समाजाला बजावून सांगितले.

नयनतारा सहगल यांना उद्घाटक म्हणून येण्यास विरोध का? कोण आहेत त्या? त्यांची पार्श्वभूमी काय आहे? त्यांनी काय केले? हा भारतीय समाज पुढे कसा जाईल यासाठीचे स्वप्न त्या पाहत आहेत? याचा थोडातरी विचार मराठी माणसांनी करून मन मोठं करुन दाखवायला हवे होते. अशा संकुचितपणामुळेच मराठी माणूस देशव्यापी नेतृत्व करायला कमी पडतो, याची तरी जाणीव ठेवायला हवी आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक यांच्यापेक्षा आणखी फारशी नावे राष्ट्रीय पातळीवर घेतली जात नाहीत. कारण आपण संकुचित विचार करतो आहोत.

देशातील विविध भाषा बोलण्यामध्ये मराठी ही आघाडीवरची भाषा आहे. केवळ याच प्रादेशिक भाषेतील साहित्य संमेलनाची परंपरा जपली आहे. त्याला आता जवळपास शंभर वर्षे होत आली आहेत. मराठी भाषेबरोबरच संपूर्ण मानव जातीचा भाषेशी असलेला संबंध, त्याचे नातेआणि व्यवहार याचा सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक बंध म्हणून विचार करायला हवा आहे. असा व्यापक विचार करून सर्वसमावेशकभूमिका कधी घेतली नाही म्हणून साहित्य प्रवाहात इतके गट-तट पडले आहेत. त्याला असंख्य पदर लाभले आहेत. त्यात मराठी साहित्य प्रवाहाचे नुकसानच झाले.

मराठी साहित्य संमेलनाने जगाशी जोडून घेतले पाहिजे. विविध भाषेतील उत्कृष्ट साहित्यिक या व्यासपीठावर आले पाहिजेत. त्यासाठी नयनतारा सहगल हे सर्वोच्च नाव होते. त्यांची निवड करणाºयांचे कौतुक करायला हवे; मात्र त्यांची भूमिका कच्ची होती असे वाटते, अन्यथा एकदा निमंत्रण दिल्यानंतर ते रद्द केले नसते. ‘मनसे’च्या कार्यकर्त्याचे समजू शकतो, त्याला माहितीचा बुडका आणि शेंडा काहीच माहीत नव्हते.

राज ठाकरे यांना कोणीतरी सांगितले असावे की, नयनतारा सहगल या मराठी भाषिकाचे कन्यारत्न आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळचे सुपुत्र रणजित सीताराम पंडित यांच्या त्या कन्या होत. रणजित पंडित हे संस्कृतचे विद्वान गृहस्थ होते. त्यांचा जन्म १८९३चा आहे. ते स्वातंत्र्य लढ्यातील काँग्रेसचे लढवय्ये सेनानी होते. त्यांनी काश्मीरच्या राजाची बाराव्या शतकातील पार्श्वभूमी सांगणाºया राजतरंगिणी या संस्कृत भाषेतील कादंबरीचे इंग्रजीत भाषांतर केले होते. त्यांच्या संस्कृत आणि काश्मीरच्या प्रेमाने देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील थोर नेहरू घराण्यांशी त्यांचा संबंध आला. पंडित मोतीलाल नेहरू यांची कन्या आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांची बहीण विजयालक्ष्मी यांच्याशी त्यांचा १९२१ मध्ये विवाह झाला.

उच्चशिक्षित असून स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी सर्वस्व वाहिलेल्या रणजित सीताराम पंडित आणि विजयालक्ष्मी पंडित यांनी अनेक लढ्यात भाग घेतला. त्यांना अनेकवेळा तुरुंगवास झाला. लखनौच्या तुरुंगात असताना ते आजारी पडले. विजयालक्ष्मी पंडित यांना भेटण्याची परवानगी दिली. प्रकृती खूपच खालावली होती; मात्र विजयालक्ष्मी पंडित यांनी दु:ख गिळत त्यांना सामोºया गेल्या. त्यांच्या सुटकेचा अर्ज करण्याचा विचार आहे का? हे विचारण्याचे धाडस झाले नाही, कारण रणजित पंडित यांनी ते नाकारले असते. तसेच घडले; मात्र त्यांची प्रकृती अधिकच खालावली आणि त्यात त्यांचा १४ जानेवारी १९४४ रोजी मृत्यू झाला.

देश स्वतंत्र झाल्यानंतर नयनतारा सहगल यांचे मामा पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान झाले. विजयालक्ष्मी पंडित यांची नेमणूक नव्यानेच स्थापन झालेल्या संयुक्त राष्ट्र संघावर भारताच्या पहिल्या राजदूत म्हणून झाली. (१९५३-५४). पुढे त्यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नेमणूक झाली. (२८ नोव्हेंबर १९६२ ते १८ आॅक्टोबर १९६४). त्यांच्या रूपाने पंडित घराण्याचा मराठी माणसांशी पुन्हा एकदा जिव्हाळ्याचा संबंध आला.

अशा या महान स्वातंत्र्यसेनानी रणजित सीताराम पंडित या मराठी माणसाची दुसरी कन्या नयनतारा. मोठी चंद्रलेखा आणि लहान रीटा. तिघीही आपापल्या क्षेत्रात नामवंत. नयनतारा यांनी उत्तराखंडमधील डेहराडून येथील विजयालक्ष्मी पंडित यांच्या निवासस्थानी राहण्याचा निर्णय घेतला. त्यांचा जन्म १० मे १९२७ रोजीचा आहे. आज त्या ९२ वर्षांच्या होत आहेत. त्यांच्या कर्तृत्वाचा, त्यांच्यातील सृजनशील लेखिकेचा आणि एका मराठी माणसाच्या कन्येचा, त्यांच्या वयाचा तरी विचार करून जो व्यवहार त्यांच्याशी झाला, तो नको होता. त्यांचे विचार भाषणाच्या रूपाने संपूर्ण मराठी समाजापर्यंत गेलेच; मात्र आपला संकुचितपणाही त्याहून अधिक ढळढळीतपणे समोर आला. मराठी माणसाची मान शरमेने खाली घालविणारी ही घटना आहे. त्यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात काय म्हटले आहे पहा.

त्या म्हणतात, ‘माझ्याकरिता हा क्षण भावनिक आहे. कारण माझे वडील रणजित सीताराम पंडित यांच्याकडून माझे स्वत:चे महाराष्ट्राशी असलेले नाते. संस्कृत विद्वानांच्या एका नामांकित कुटुंबातले माझे वडील स्वत:ही संस्कृतचे विद्वान होते. त्यांनी मुद्राराक्षस, कालिदासाचे ऋतुसंहार आणि राजतरंगिणी या तीन अभिजात संस्कृत ग्रंथांचे इंग्रजीमध्ये भाषांतर केले होते. संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांनी अतिशय कष्टपूर्वक हा प्रदीर्घ इतिहास माझ्या वडिलांच्या मातृभाषेमध्ये (मराठीत) आणला आहे. मी खात्रीने सांगू शकते की, इतर कशाहीपेक्षा माझ्या वडिलांना या गोष्टीचा मनस्वी आनंद झाला असता.’

नयनतारा सहगल या उत्कृष्ट इंग्रजी साहित्यिका आहेत. त्यांच्या सर्वच कादंबºया या त्या त्या वेळच्या राजकीय आणि सामाजिक पार्श्वभूमीवर आकार घेत गेल्या आहेत. त्यांना साहित्य अकादमीच्या विशेष पुरस्काराने १९८५ मध्ये सन्मानित करण्यात आले. त्यांनी आजवर अठरा कादंबºया लिहिल्या आहेत. नव्वदीनंतरही त्यांचे लिखाण चालू आहे. १९२७ मध्ये जन्मलेल्या या लेखिकेचा प्रवास इतिहासाची किती असंख्य पाने उलगडून दाखवित आहेत. हा सर्व इतिहास बदलता येत नाही. ९२व्या मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला त्यांना निमंत्रित करण्यात आले आणि जो संकुचितपणा दाखविण्यात आला, त्यांचे निमंत्रण रद्द करण्यात आले. ते सर्व इतिहास म्हणून कायमचे नोंदविले जाणार आहे. त्यांना निमंत्रण नाकारता येऊ शकते, पण त्यांच्या विद्वान वडिलांनी देशासाठी तुरुंगात मरणयातना सोसल्या, देशासाठी स्वत:चा त्याग केला, हा इतिहास बदलता येत नाही.

मोतीलाल नेहरू, मामा पंडित जवाहरलाल नेहरू, आई विजयालक्ष्मी पंडित आणि वडील रणजित सीताराम पंडित यांच्या संस्काराने घडलेल्या नयनतारा सहगल यांची विचारधारा त्याच स्वातंत्र्य लढ्यातून घडलेल्या भारत या राष्ट्राची प्रती आहे.त्यांची मते ठाम आहेत. त्यांनी आणीबाणीला विरोध केला. त्यांनी शिखांच्या कत्तलीचा तीव्र निषेध केला. त्यांनी गुजरातच्या भयावह दंगलीचाही निषेध केला आणि भारताचे स्वातंत्र्य ज्या मूल्यांच्या आधारे चालू आहे, त्याचा त्या आग्रह धरतात. सध्याची जी सामाजिक, राजकीय आणि आर्थिक विषन्नावस्था निर्माण झाली आहे त्याकडे लक्ष वेधू इच्छितात. त्याच वाटेवरून वैशाली येडे गेल्या.

पंडित जवाहरलाल नेहरू ज्यांना नको म्हणून त्यांची भाची नको, आता ज्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे राजकारण केले, त्यांच्या विधवा पत्नीने आताच्या राज्यकर्त्यांनी निर्माण केलेल्या समाजाचे ‘विधवा समाज’ असे वर्णन करतानाच मराठी सारस्वतांचे नेतृत्व करणाºयांचा खुजेपणाही दाखवून दिला. ही भारतीय तत्त्वप्रणालीची आणि महिलांची ताकद आहे.
ता. क. : नयनतारा सहगल यांचे न झालेले भाषण राजर्षी शाहू यांच्या नगरीत व्हावे आणि कोल्हापूरकरांनी त्यांच्या घराण्याच्या त्यागाप्रती त्यांचा नागरी सत्कार करावा. झालेली चूक दुरुस्त करण्याची हीच संधी आहे.


 

Web Title: Nayantara to Vaishali Yde! - Sunday Special - Jagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.