हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 11:51 AM2018-02-23T11:51:25+5:302018-02-23T11:52:05+5:30

राष्टÑवादी काँग्रेस पक्षाच्या हल्लाबोल आंदोलनाने खान्देशात निवडणूकपूर्व वातावरण तापवले

NCP Attack Rally | हल्लाबोल

हल्लाबोल

Next

राष्टÑवादी काँग्रेस पक्षाच्या हल्लाबोल आंदोलनाने खान्देशात निवडणूकपूर्व वातावरण तापवले आणि कार्यकर्त्यांसोबत सामान्य जनतेला आम्ही समर्थ पर्याय देऊ शकतो, असा विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. अस्वस्थ सभोवतालाचा लाभ या आंदोलनाला मिळाला आणि राज्यस्तरीय नेत्यांच्या सभांना चांगली गर्दी झाली. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने पंचवार्षिक कारकिर्दीचा शेवटचा टप्पा सुरु केला आहे; पण जनसामान्यांच्या अपेक्षांची पूर्तता करण्यात दोन्ही सरकारे अपयशी ठरत असल्याने समाजातील सर्वच घटकांमध्ये तीव्र स्वरुपाचा असंतोष आहे. या असंतोषाला वाट करुन देण्याचे काम राष्टÑवादी काँग्रेसने या आंदोलनाच्या माध्यमातून केले. यापूर्वी दोन्ही काँग्रेसने संघर्ष यात्रा काढली होती. परंतु त्यापेक्षा अधिक प्रतिसाद या आंदोलनाला मिळाला. समस्यांनी ग्रस्त असलेली मंडळी विरोधी पक्षाकडे मोठ्या संख्येने निवेदने घेऊन आल्याचे चित्र भाजपाच्या सत्ताकाळात प्रथमच यावेळी दिसून आले. राष्टÑीय महामार्ग चौपदरीकरण कामात जमीन घेऊनही योग्य मोबदला मिळाला नसल्याची विसरवाडी (जि.नंदुरबार) येथील ग्रामस्थांची तक्रार, माझे बाबा चिंताग्रस्त असतात, अशी बलवाडी (जि.जळगाव) येथील केळी उत्पादक शेतकºयाच्या चिमुरडीने मांडलेली कैफीयत, दोंडाईचा येथील विद्यार्थिनीवर शिक्षकाने केलेल्या अत्याचारासंबंधी दाद मागणारे भडगावातील महिलांचे निवेदन...हे सरकारकडून न्याय मिळत नसल्याची व राष्टÑवादीने हा प्रश्न धसास लावण्याची अपेक्षा व्यक्त करणाºया या घटना आहेत. ग्रामपंचायतीपासून तर संसदेपर्यंत शतप्रतिशत भाजपाचा नारा देणाºया सत्ताधारी मंडळींना या आंदोलनाने धोक्याची सूचना दिलेली आहे. जनता नाखूश आहे, असे नाडीपरीक्षण विरोधी पक्षाने जनतेत जाऊन जाणून घेतले. त्याचा परिणाम संसद व विधिमंडळ अधिवेशनात निश्चित दिसून येईल. या आंदोलनात खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, भास्कर जाधव ही नेते मंडळी सहभागी झाली होती. पण सर्वाधिक प्रतिसाद हा सुळे आणि मुंडे यांच्या भाषणांना मिळाला. शिवजयंतीला फागणे (जि.धुळे) ते अमळनेर (जि.जळगाव) दरम्यान काढलेली दुचाकी रॅली, मुक्तार्इंनगरच्या संत मुक्ताई मंदिरात जाऊन घेतलेले दर्शन, विखरण (जि.धुळे) येथे धर्मा पाटील यांच्या शोकग्रस्त कुटुंबियांची घेतलेली भेट यातून राष्टÑवादीच्या नेत्यांनी जाणीवपूर्वक जनसामान्यांशी असलेली नाळ घट्ट करण्याचा प्रयत्न केला. संघर्ष यात्रेदरम्यान भाजपाचे असंतुष्ट नेते एकनाथराव खडसे यांच्या घरी भेट देणाºया नेत्यांनी यावेळी मात्र खडसे यांच्यावर त्यांच्या मतदारसंघात टीका केली. ४० वर्षे निवडून येऊन पाण्याची समस्या सोडविता आली नाही, असा जाब भास्कर जाधव यांनी विचारला. तर जामनेरात जाऊन गिरीश महाजन यांची हुकूमशाही चालू देणार नाही, असा इशारा मुंडे यांनी दिला. भाजपाच्या असंतुष्ट वा निष्ठावंत अशा कोणत्याही नेत्याशी सलगी ठेवायची नाही, असा स्पष्ट संदेश यातून देण्यात आला. राष्टÑवादी कार्यकर्त्यांचा उत्साह या आंदोलनातून दुणावला आहे, हे मात्र खरे.

Web Title: NCP Attack Rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.