राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची तळकोकणातली भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2018 05:26 AM2018-12-05T05:26:39+5:302018-12-05T05:27:00+5:30

भाजपा-शिवसेनेच्या युतीचे संकेत स्पष्ट दिसतात. राणे यांची ना घर का, ना घाट का, अशी अवस्था होण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत.

NCP chief Sharad Pawar's visit to the kokan | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची तळकोकणातली भेट

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची तळकोकणातली भेट

Next

भाजपा-शिवसेनेच्या युतीचे संकेत स्पष्ट दिसतात. राणे यांची ना घर का, ना घाट का, अशी अवस्था होण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. अशा परिस्थितीत शरद पवार यांच्याशी असलेल्या संबंधांचा लाभ घेत स्वपक्षाचा नारा देणेच त्यांच्या हाती उरले आहे. राजकीय नेत्यांच्या यशाचा तळ दिसू लागला की, सामान्य माणसालाही चिंता वाटू लागते. एकेकाळी झंझावात निर्माण करणारे नेते अखेरच्या लढाईत कोणती खेळी खेळणार याचा अंदाज येत असला तरी त्यात बळ दिसत नाही. अशीच काहीशी अवस्था झालेल्या दोन ज्येष्ठ नेत्यांची (शरद पवार आणि नारायण राणे) तळकोकणात कणकवलीत भेट झाली. ती राजकीय स्वरूपाची नव्हती, असे सांगण्यात आले. सदिच्छा
भेट असेल, असे मानायला काहीच हरकत नाही. राजकीय नेत्यांची गणिते सदिच्छा भेटीवर आखली जात नाहीत, हे सर्वांनाच माहीत आहे. येत्या चार महिन्यांत देशभरात लोकसभेसाठी सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. त्याची तयारी प्रशासकीय पाातळीवर जशी वेगाने चालू आहे तशी राजकीय नेत्यांनीही आता वेळापत्रक निश्चित करायला सुरुवात केली आहे. शरद पवार यांनी सातारा ते कोल्हापूर आणि कोकण असा पंधरवड्यात दोनदा दौरा केला. सातारा आणि कोल्हापूरच्या विद्यमान खासदारांच्या उमेदवारीस पक्षातूनच विरोध होत आहे. तो शमविण्यात त्यांची शक्ती खर्ची पडत आहे. या खासदारांना आवर्जून भेटून ते संकेत देत आहेत. तसाच संकेत नारायण राणे यांना देऊन तळकोकणातील राष्ट्रवादी कॉँग्रेसची संपत गेलेली ताकद पुन्हा उभी करण्यासाठी ही भेट नसेल कशावरून? सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्हे हे शिवसेनेचे बालेकिल्ले आहेत. नारायण राणे यांनी शिवसेना सोडताच सिंधुदुर्गमध्ये शिवसेना संपली होती. या दोन्ही जिल्ह्यांत शिवसेनेचा प्रमुख विरोधी पक्ष राष्ट्रवादी कॉँग्रेसच होता; मात्र पक्षाच्या नेत्यांच्या भांडणात राष्ट्रवादी मागे पडली. नारायण राणे यांची तर जाम गोची झाली आहे. भाजपाने त्यांचा विरोध मोडून काढण्यासाठी कारवाईचा बडगा दाखविला. वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी देण्याचे गाजरही दाखविले. त्यामुळे नारायण राणे यांनी भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्याला शिवसेनेने कडाडून विरोध करताच त्यांचा प्रवेशही लांबला तसेच मंत्रिमंडळातही सहभागी होता आले नाही. स्वत:चा पक्ष काढून सोय करून घ्यावी लागली. निवडणुका तोंडावर आल्या तरी शिवसेनेचा विरोध काही संपेना आणि आता तर भाजपा-शिवसेनेच्या युतीचे संकेत स्पष्ट दिसतात. राणे यांची ना घर का, ना घाट का, अशी अवस्था होण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. अशा परिस्थितीत शरद पवार यांच्याशी नेहमीच चांगले संबंध राहिल्याचा लाभ घेत स्वपक्षाचा नारा देणेच त्यांच्या हाती उरले आहे. राष्ट्रवादीलादेखील तळकोकणात कोणी ताकद देईल, असा नेता उरला नाही. गुहागर आणि दापोलीचे राष्ट्रवादीचे आमदार शिवसेनेच्या वाटेवर अशा बातम्या वारंवार येत राहतात. ते खरेच गेले तर तळकोकणात राष्ट्रवादी तळ पाहणार आहे. अशा कठीण प्रसंगी मदतीला येऊ शकते ती नारायण राणे यांची फौज. शरद पवार आणि राणे या दोघांची गरज आहे याच समउद्देशाने ही ‘सदिच्छा’ भेट नसेल कशावरून? शरद पवार जेव्हा एखादी गोष्ट नाकारतात तेव्हा तीच ते करणार असतात, असे अनेकवेळा घडले आहे. त्यामुळे त्यांनी उभयतांच्या भेटीचा राजकीय अर्थ काढू नका, असे सांगितले असले तरी त्यातून अनेक अर्थ ध्वनिप्रतित होतात. शरद पवार यांच्यापेक्षा नारायण राणे यांना कोणीतरी हात देण्याची गरज आहे. त्यांचे चिरंजीव आजही कागदोपत्री कॉँग्रेसचे आमदार आहेत. त्यांना पक्ष सोडून द्यावा लागणार आहे. शिवसेनेचा विरोध मोडून काढता येणार नाही. कारण भाजपाची अगतिकता आहे. कोकणात तर फारच महत्त्वाची साथ शिवसेनेची राहणार आहे. अशावेळी भाजपाने हात वर केले तर मदत कोण करणार? याच उद्देशाने ते (राणे) सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वाभिमान पक्षातर्फे जनसंपर्कात गुंतले आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांचा पक्ष बळकट करण्यासाठी हा जिल्हा दौरा सुरू आहे. शिवसेना सोडली, कॉँग्रेस सोडावी लागली आणि भाजपामध्ये जाता येईना अशी अडथळ्यांची शर्यत राणे यांना पार करावी लागत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा छोटा असला तरी येथेच त्यांच्या राजकीय ऊर्जेचा स्रोत आहे. तोच आटला तर दिवा विझायला वेळ लागणार नाही, यासाठीच ही तळकोकणातली गळाभेट असणार आहे.

Web Title: NCP chief Sharad Pawar's visit to the kokan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.