द्वेषमूलक स्थितीत बुद्ध विचारांची गरज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 05:39 AM2019-05-18T05:39:49+5:302019-05-18T05:41:40+5:30

बुद्ध गयेस पिंपळाच्या झाडाखाली जेव्हा तो ध्यानस्थ बसला, तेव्हा त्याला माणसाच्या मनातील मोह, तृष्णा, वासना, विकार हेच दु:खाचे, कलहाचे खरे कारण आहे, हे चिरंतन सत्य उमगले.

 The need for Buddha in a hostile situation | द्वेषमूलक स्थितीत बुद्ध विचारांची गरज

द्वेषमूलक स्थितीत बुद्ध विचारांची गरज

Next

 - बी. व्ही. जोंधळे
(आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक)

आज १८ मे! जगाला समता, स्वातंत्र्य, बंधुभाव, अहिंसा, शांतता, प्रेम नि विज्ञाननिष्ठेची बुद्धिवादी नि मानवतावादी शिकवण देणाऱ्या म. गौतम बुद्धाची २५६३ वी जयंती! बुद्ध हा कनवाळू होता. क्षत्रिय आपसात का लढतात, असा प्रश्न जेव्हा तो आपल्या आईस विचारीत असे तेव्हा त्याची आई लढणे हा क्षत्रियांचा धर्म आहे, असे उत्तर देत असे. माणसाने माणसांना मारणे हा धर्म कसा काय होऊ शकतो, असा प्रश्न तेव्हा त्याला पडत असे. शाक्य व कोलियात रोहिणी नदीच्या पाण्यावरून जेव्हा संघर्ष पेटला तेव्हा शाक्य कुळातील असूनही बुद्धाने लढाईत भाग घेण्यास नकार दिला. परिणामी, शाक्य संघाने त्याला देशत्यागाची शिक्षा फर्माविली. त्याने देशत्याग पत्करला. पुढे शाक्य व कोलियातील संघर्ष मिटला, बुद्धाला कपिलवास्तूत माघारी फिरण्याचा आग्रह झाला; पण त्याने तो नाकारला. कारण राष्ट्रा-राष्ट्रांत, माणसा-माणसांत जो संघर्ष चालतो त्याचा त्याला शोध घ्यायचा होता.

बुद्ध गयेस पिंपळाच्या झाडाखाली जेव्हा तो ध्यानस्थ बसला, तेव्हा त्याला माणसाच्या मनातील मोह, तृष्णा, वासना, विकार हेच दु:खाचे, कलहाचे खरे कारण आहे, हे चिरंतन सत्य उमगले. बुद्धाच्या मतानुसार मन हे सर्व गोष्टींचा मध्यबिंदू आहे, ते सर्व वस्तूंवर आपली सत्ता चालविते. सर्व चांगल्या-वाईट गोष्टींचा उगम मनातच होतो. अशुद्ध झालेल्या कृती-उक्तीमधून दु:ख येते. ते टाळण्यासाठी चित्तशुद्धी हवी. दुष्कृत्ये टाळावीत. सदाचाराच्या नियमांचे पालन करावे, अशी बुद्धाची शिकवण होती, आहे. प्रज्ञा-शील-करुणा, मैत्रीचा पुरस्कार करताना बुद्धाने कर्मकांडास विरोध केला. वेदांचे पावित्र्य निषिद्ध ठरविले. चातुर्वर्ण्यास-जातीय रचनेस विरोध केला. दैववाद नाकारला. पशूंचा बळी देणाºया यज्ञयागास विरोध केला. सत्ता, संपत्ती या गोष्टी माणसास गुलाम करीत नाहीत, तर त्याची अभिलाषा माणसास गुलाम करते, म्हणून तृष्णेचा त्याग करा, असा मौलिक संदेश बुद्धाने जगास दिला.

बुद्धाने त्याच्या धम्माद्वारे एक मोठी मानवतावादी सामाजिक क्रांती केली; पण बुद्धाची चातुर्वर्ण्यविरोधी भूमिका ब्राह्मणांच्या मनात डाचत राहिल्यामुळे वैदिक धर्माशी विरोध असणाºया बौद्ध धर्माचा पाडाव करण्यासाठी ब्राह्मणांनी सर्व भल्याबुºया मार्गांचा अवलंब केला, असा इतिहास आहे. वस्तुत: बुद्धाच्या श्रमण शिष्यांमध्ये ब्राह्मण मोठ्या संख्येने होते; पण बौद्ध धर्मात जातीभेद नसल्यामुळे जेव्हा खालच्या जातीतील लोक भिक्षू बनू लागले तेव्हा त्यांचीही पूजा होऊ लागली, ही बाब ब्राह्मणांना सहन झाली नाही. शिवाय भारतात प्राचीन काळापासून कुलदेवतांची पूजा करण्याची पद्धत होती. पूजेचा मान ब्राह्मणांना होता; पण सम्राट अशोकाने बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यानंतर देवतांची पूजा करण्याची गरज नाही, म्हणून राजा अशोकाने आपल्या राज्यातील कुलदेवतांच्या मूर्ती काढून टाकल्या. ब्राह्मणांच्या उपजीविकेवर गदा आल्यामुळे त्यांनी बौद्ध धर्म नाहीसा करण्याचा चंग बांधला. बौद्ध धर्माचा लोकमानसावरील प्रभाव नाहीसा करण्यासाठी ब्राह्मणांनी बौद्ध धर्माची नक्कलसुद्धा केली. उदा. वेरूळच्या बौद्ध लेण्यांजवळ त्यांनी आपली ब्राह्मणी लेणी कोरली.

वस्तुत: ब्राह्मण हा गृहस्थाश्रमी. त्याला गुहेत राहण्याचे कारण नव्हते. पावसाळ्यात भिक्खूंनी तीन महिने कुठे तरी निवास करावा, अशी पद्धत होती. त्यामुळे त्यांनी लेण्या कोरल्या; परंतु बौद्ध लेण्यांकडे उपासक जातात, म्हणून ब्राह्मणांनी त्यांच्या शेजारी आपल्या लेण्या कोरल्या. अशा प्रकारे सर्व भल्या-बुºया मार्गांचा अवलंब करून बौद्ध धर्म नाहीसा करण्यात आला. त्यात इस्लामी आक्रमकांची भर पडली. त्यांनी बुद्ध लेण्या, बुद्धमूर्ती फोडल्या. बौद्ध विद्यापीठांचा नाश केला. ग्रंथालये जाळली. बौद्ध भिक्षूंच्या कत्तली केल्या; पण बौद्ध धर्मास ब्राह्मणी धर्म सत्तेचा असलेला विरोध व इस्लामी आक्रमणातील फरक असा की इस्लामला मूर्तिपूजा मान्य नसल्यामुळे त्यांनी जशा मूर्ती फोडल्या, तसेच लूट हाही त्यांचा एक उद्देश होता. ब्राह्मणी सत्तेला मात्र बुद्धांचा जाती-वर्ण-निरपेक्ष विचारच समूळ नष्ट करावयाचा होता.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अडीच हजार वर्षांनंतर १४ आॅक्टोबर १९५६ रोजी धर्मांतर करून भारतात बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन केले. बाबासाहेबांना भारत बौद्धमय करावयाचा होता.

बौद्ध धर्म स्वीकारल्यामुळे एका नवसमाजनिर्मितीच्या प्रक्रियेस गती मिळाली; पण पुन्हा एकदा प्रतिक्रांतीने उचल खाल्ली. देशात गत पाच वर्षांत सनातनी धर्मांध प्रवृत्तींनी उच्छाद मांडला. दलित-अल्पसंख्याकांवरील अत्याचार वाढले. मनुस्मृतीच्या जयजयकाराच्या घोषणा देऊन राज्यघटना जाळण्यात आली. संविधान बदलण्याची भाषा होऊ लागली. देशात जात, धर्म आधारित द्वेषाचे वातावरण निर्माण करण्यात आले. म. गांधींच्या पुतळ्यावर गोळ्या झाडून परत परत त्यांची हत्या करण्यात येऊ लागली. नक्षलवादाने निष्पाप माणसांच्या निर्घृण हत्या केल्या. हिंसाचार वाढला. लोकसभा निवडणुकीत प्रचाराची हीन दर्जाची पातळी गाठली गेली. दहशतवादाच्या आरोपींना निवडणुकीची तिकिटे देण्यात आली. किळसवाणे, बीभत्स चारित्र्यहनन झाले. एकूणच देशाचे वातावरण द्वेषमूलक झाले. सहिष्णुता, सभ्यता, सुसंस्कृततेचा बळी देण्यात आला. देशाच्या आजच्या द्वेषमूलक वातावरणात म. गौतम बुद्धांच्या विचारांचे स्मरण करणे म्हणूनच अपरिहार्य आहे.

Web Title:  The need for Buddha in a hostile situation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.