आंबेडकर-गांधी विचारांच्या समन्वयाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 06:02 AM2019-04-13T06:02:27+5:302019-04-13T06:02:33+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर व म. गांधी हे लोकोत्तर नेते होते.

The need for coordination of Ambedkar-Gandhi ideas | आंबेडकर-गांधी विचारांच्या समन्वयाची गरज

आंबेडकर-गांधी विचारांच्या समन्वयाची गरज

googlenewsNext

डॉ. बाबासाहेब आंबेडकर व म. गांधी हे लोकोत्तर नेते होते. दोघांचाही लोकशाहीवर विश्वास होता. दोघांचाही रक्तपातास विरोध होता. म. गांधींनी सत्य आणि अहिंसा या तत्त्वांचा अंगीकार केला, तर बाबासाहेबांनी समता, स्वातंत्र्य, बंधुभाव या तत्त्वत्रयींचा पुरस्कार केला. दोघांनीही राजकीय स्वातंत्र्य आणि सामाजिक न्यायासाठी सत्याग्रही मार्गांचा अवलंब केला. महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या वेळी उभारण्यात आलेल्या मंडपात गांधीजींचा फोटो होता.


डॉ. बाबासाहेब व म. गांधी या दोघांनीही अस्पृश्यता निर्मूलनाच्या चळवळी केल्या. अर्थात, दोघांच्या मार्गात भिन्नता होती. बाबासाहेब हे कठोर बुद्धिवादी, तर म. गांधी हे श्रद्धावादी होते. बाबासाहेबांचा धर्म नीतिमत्तेचा आणि समतेचा पुरस्कार करणारा होता, तर म. गांधींचा धर्म आध्यात्मिक आणि परंपरावादी होता. बाबासाहेबांचा दलितांकडे पाहण्याचा दृष्टिकोन जळजळीत अनुभूतीचा होता, तर म. गांधींचा सहानुभूतीचा. सहानुभूती कितीही उत्कट असली तरी ती अनुभूतीची जागा घेऊ शकत नाही, असे बाबासाहेबांचे मत होते. म. गांधी म्हणत, ‘मला पुनर्जन्म नकोय; पण तो यायचाच असेल तर अस्पृश्य जातीत यावा, म्हणजे मला त्यांच्या व्यथा-वेदनांचा अनुभव घेता येईल.’

अस्पृश्यता निवारणासाठी हिंदू समाजाचे मतपरिवर्तन व्हायला हवे, असे म. गांधींना वाटे, तर बाबासाहेबांची वृत्ती मुळावर घाव घालणारी होती. अस्पृश्यांची मुक्ती पारंपरिक ग्रामव्यवस्थेत होऊ शकत नाही, म्हणून खेडी नष्ट करा, असे बाबासाहेब सांगत, तर गाव हाच भारतीय समाजव्यवस्थेचा कणा आहे, म्हणून गांधी ग्रामस्वराज्याची भाषा करीत. गांधींचा राष्ट्रवाद राजकीय स्वातंत्र्याला प्राधान्य देणारा होता, तर बाबासाहेबांचा राष्ट्रवाद राजकीय स्वातंत्र्याबरोबरच स्वातंत्र्य, समता, बंधुभाव या तत्त्वत्रयींवर आधारित होता. धर्मांतरामुळे काहीच साध्य होणार नाही, असे गांधी सांगत; पण धर्मांतराने दलितांना स्वतंत्र ओळख दिली.


हिंदू समाजात फूट पडेल या सबबीखाली म. गांधींचा अस्पृश्यांच्या स्वतंत्र मतदारासंघास विरोध होता. बाबासाहेबांचा मात्र काही काळ विभक्त आणि नंतर अस्पृश्यांच्या संमतीने संयुक्त मतदारसंघ ठेवण्यातच अस्पृश्यांचे हित आहे, असा दावा होता. अस्पृश्यांचे आपणच एकमेव पुढारी आहोत, असा दावा करणाऱ्या म. गांधींनी १९३१ साली म्हटले होते, ‘आंबेडकरांना माझ्या तोंडावर थुंकण्याचा अधिकार आहे, ते आपले डोके फोडत नाहीत, हा त्यांचा संयम आहे.’


मुस्लिमांसाठी पाकिस्तानची निर्मिती झाली याच न्यायाने हिंदूंची बहुसंख्या लक्षात घेऊन भारत हे हिंदुराष्ट्र घोषित करण्याचा मोह आपल्या घटनाकारांनी जाणीवपूर्वक नाकारला. घटनाकारांनी देशाचे बहुवांशिक, बहुधर्मीय, बहुसांस्कृतिक, बहुभाषिक वैशिष्ट्य जपले. म. गांधींचाही धर्माधिष्ठित राष्टÑास विरोध होता; पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर व म. गांधी यांचे धर्मनिरपेक्ष लोकशाही राष्टÑ उभारण्याचे स्वप्नच हिंदुराष्टÑवाद्यांमुळे धूसर झाले आहे. तात्पर्य, सर्व प्रकारचा मूलतत्त्ववाद नि सर्व प्रकारच्या धर्मांधतेविरुद्ध लढताना बाबासाहेबांचा धर्मनिरपेक्ष लढाऊ बाणा आणि म. गांधींच्या अहिंसा, सत्याग्रही मार्गाचाच आपणाला अवलंब करावा लागेल, हे उघड आहे.
बी.व्ही. जोंधळे । दलित चळवळीचे अभ्यासक

Web Title: The need for coordination of Ambedkar-Gandhi ideas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.