कास्टिंग काऊचविरोधात वातावरणनिर्मिती हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 12:02 AM2018-04-28T00:02:02+5:302018-04-28T00:02:02+5:30

कास्टिंग काऊच हा शब्दप्रयोग सिने इंडस्ट्रीत जन्माला आला असला तरी तो आज त्यापुरताच मर्यादित नाही.

Need to create an environment against casting cow | कास्टिंग काऊचविरोधात वातावरणनिर्मिती हवी

कास्टिंग काऊचविरोधात वातावरणनिर्मिती हवी

Next

डॉ. उदय निरगुडकर|
बॉलिवूडची झगमगती दुनिया दुरून कितीही आकर्षक वाटत असली तरी ती तितकीच बदनामसुद्धा आहे. या चंदेरी दुनियेला एक काळी किनार आहे. कास्टिंग काऊच हेसुद्धा बॉलिवूडमधलं एक कटू सत्य. रुपेरी पडद्यावर झळकण्याचं स्वप्न घेऊन आलेल्या, स्ट्रगल करणाऱ्या अनेक तरुण-तरुणी या जाळ्यात सापडतात. हे सगळं खुलेआम सांगण्याचं धाडस कुणी करतं, तर अनेक जण गप्प राहणं पसंत करतात. सरोज खान आज जे बोलल्या ते चीड आणणारंच आहे. पण त्याहूनही धक्कादायक आहे काँग्रेसच्या नेत्या रेणुका चौधरी यांचं वक्तव्य. कास्टिंग काऊच हा शब्दप्रयोग सिने इंडस्ट्रीत जन्माला आला असला तरी तो आज त्यापुरताच मर्यादित नाही. संसदही याला अपवाद नसावी, ही बाब चिंताजनक. अन्याय, अत्याचाराविरोधात जिथं कायदे बनतात, तिथल्या महिलाही आज सुरक्षित नसाव्यात, यासारखी धक्कादायक गोष्ट दुसरी कोणती असेल? अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक यांना खूश केल्याशिवाय स्टारडमपर्यंत पोहोचणं शक्य नाही, अशी कबुली अनेक अभिनेत्रींनी आतापर्यंत दिलीय. पण लोकप्रतिनिधींच्या बाबतीतही असं होतं असेल तर न्याय मागायचा कुठे? बॉलिवूड भाकरी देतं, म्हणून कोणताही अत्याचार सहन करायचा? करण जोहर, रणवीर सिंह, राधिका आपटे, कंगना राणावत, यासारख्या आजच्या आघाडीच्या असणाºया कलाकारांनी कधी ना कधी कास्टिंग काऊचला बळी पडल्याचं मान्य केलंय. दक्षिणेतल्या श्री रेड्डीनं तिथल्या फिल्म इंडस्ट्रीमधल्या अत्याचाराविरोधात टॉपलेस आंदोलन केलं. आपली विचारसरणी बुरसटलेली आहे असं क्षणभर समजलं तरी प्रगत समजली जाणारी अमेरिकाही याला अपवाद नाही. अशा अत्याचारांविरोधात हॉलिवूडच्या अभिनेत्रींनी मध्यंतरी Me Too अशी मोहीमच छेडली होती. या पुरु षी मानसिकतेला आज कोणताच देश आणि कोणतच क्षेत्र अपवाद नाही. उघड कुणी बोलत नाही, याचा अर्थ गुन्हा घडतच नाही, असं नाही. नंतर काम मिळणार नाही म्हणून काहीजण अत्याचार सहन करतात का? रेणुका चौधरी यांचं वक्तव्य राजकारणी गांभीर्यानं घेणार का? पवित्र समजल्या जाणाºया संसदेत असे प्रकार होत असतील तर आजपर्यंत त्यावर कुणी का बोललं नाही? बॉलिवूड, टॉलिवूड, मॉलिवूड डर्टी पिक्चर्स बनलेत का? जे स्टार किंवा राजकीय घराण्यात जन्माला आले नाहीत, त्यांच्यासाठी या क्षेत्रात करिअर अवघड आहे का? महिला समोर येऊन बोलाव्यात यासाठी आणि त्यांच्या सुरक्षेसाठी समाजानं, मीडियानं काय करायला हवं? असे अनेक प्रश्न यानिमित्तानं पुढे येत आहेत.
आजच्या पिढीला सगळं काही झटपट हवं असतं. पण हे असं शॉर्टकट यश तात्कालिक असतं. संघर्ष करून मिळालेलं यश टिकाऊ असतं. झटपट मिळणाºया यशासाठी काहीतरी किंमत मोजावी लागते. काही वेळा ती कास्टिंग काऊचच्या रूपात असते. शॉर्टकटचा मार्ग पत्करल्यानंतर यश मिळेल की नाही याची खात्री नसते. पण अपयश मिळणार हे मात्र नक्की असतं. आमिषाला बळी न पडता वाटचाल सुरू ठेवली तर कदाचित तुमचा प्रवास लांबू शकेल. निश्चित केलेल्या ध्येयासाठी जास्त मेहनत घ्यावी लागेल. पण मिळणारं यश हे केवळ तुमचं असेल हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सध्या रेड लाईट एरिया आणि चंदेरी दुनियेमधली सीमारेषा धुसर होत चाललीय. ही सीमारेषा अधिक ठळक करण्याची गरज आहे. जर एखाद्या क्षेत्रात कास्टिंग काऊचंच मायाजाल असेल तर काम करण्यासाठी सुरिक्षत ठिकाणं देखील आहेत. जर एखादी महिला पुढे येऊन कास्टिंग काऊचबद्दल बोलत असेल, तर शंभर महिलांनी पुढे येऊन सुरक्षित वातावरणाबद्दल देखील बोलायला हवं आणि सुरिक्षत वातावरणाबद्दल बोलणाºया महिलांच्या कहाण्या जेवढ्या जास्त समोर येतील तेवढाच सुरक्षित समाज आपल्याला लाभेल.

आसाराम हिंदू धर्माचा प्रतीक कसा?
१९७२ साली आसारामने अहमदाबादच्या साबरमतीच्या किनाºयावर एक झोपडी बांधली आणि बापूगिरी सुरू केली. गेल्या ४० वर्षांत त्यानं जवळपास १० हजार कोटींची माया जमा केलीय. जगभरात त्याचे ४५० आश्रम आहेत. राजकारण्यांपासून सेलिब्रेटी ते सामान्यांपर्यंत जगभरात त्याचे शिष्य आहेत. कधीकाळी टांगेवाला असणाºया आसारामकडे आज लग्झरी गाड्या आहेत. खरंतर साधू हा संन्यस्त वृत्तीचा असायला हवा. जे का रंजले गांजले, त्यांसी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, असं त्याच्याबद्दल म्हणायला हवं. पण इथे तर जी येते नवी, ती आवडे बाई...यावरून साधूची ओळख होतेय. आज कोणत्याही साधूची वृत्ती, जीवनशैली संन्यस्त आहे का तपासायला हवं. आता आसारामला शिक्षा झाल्यानंतर तरी त्याचे भक्त त्याच्याकडे आध्यात्मिक शक्ती नव्हती हे मान्य करतील का? त्याच्या भक्तांना हे त्यांच्याविरुद्धचं षड्यंत्र आहे, असं अजूनही वाटतंय का? कालपर्यंत त्याला कबीर, रहीम, तुकाराम यांच्या पंक्तीत बसवलं गेलं. आज आज मात्र तो गुन्हेगारांच्या पंक्तीत बरॅकमध्ये जाऊन बसलाय. इथे आसारामसारख्या बाबांनी वयाच्या सत्तरीनंतरही लैंगिक पीडा देण्यात धन्यता मानली. १७ वर्षाचा मुलगाही इथे कठुआप्रकरणी बलात्कारी असतो आणि ७५ वर्षांचा बाबाही बलात्कारी असतो. आसारामसारख्या बाबांना हिंदू धर्माचे प्रतीक कसं म्हणायचं? आसारामला झालेली शिक्षा ही त्याच्यासारख्या इतर बुवा-बाबांसाठी धडा आहे का?

हकनाक बळी जाण्यात चूक नेमकी कुणाची?
शाळकरी मुलांच्या मृत्यूमुळे शालेय सहली आणि समर कॅम्पच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आलाय. खरंतर १३-१८ वयोगटाला वादळी अशांततेचा काळ म्हणतात. अशा काळात मुलं कोणतंही साहस करायला धजावतात. त्यांच्या या ऊर्जेला वाव मिळावा, त्यांच्या शारीरिक क्षमता वाढाव्यात, त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, हा समर कॅम्पस्चा हेतू. आजच्या काळात हा हेतू खूपच महत्त्वाचा. याचं कारण मोबाईल, व्हिडीओ गेम्समुळे मुलांचे मैदानी खेळ कमी झालेत. अभ्यास आणि स्पर्धेच्या ओझ्याखाली ते इतके दबलेत की मुलांनी बाहेर पडावं, घाम गाळावं, असं खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगण्याची वेळ आली. एकीकडे त्यांना बाहेर पडण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं. तर दुसरीकडे ऐन उमेदीच्या वयातच त्यांच्यावर जीवाला मुकण्याची वेळ येते. कातरखडक, बुशी यासारखी अनेक धरणं असोत किंवा गणपतीपुळे, अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, असो...लाखो पर्यटक तिथं जातात. त्यात शालेय विद्यार्थीही असतात. पण, पाण्याचा अंदाज न आल्यानं ते जीव गमावतात.

पालकांकडून हमीपत्र लिहून घेतलं म्हणजे शाळेची जबाबदारी संपते असं निश्चितच नाही. आजची मुलंच जास्त उनाडपणा करतात म्हणून तीच याला जबाबदार आहेत, असं समजायचं? समर कॅम्पचे आयोजक तरी खुद्द प्रशिक्षित असतात का? समर कॅम्पसाठी काही नियमावली आहे का? आणि महत्त्वाचं म्हणजे ती पाळली जाते का? वाढत्या वयातली ही मुलं अशी हकनाक बळी जाण्यात चूक नेमकी कुणाची? हा प्रश्न मनाची घालमेल करतो.
समुद्रसपाटीपासून ५७५३ मीटर उंचीवर सियाचीन ही जगातली सर्वात उंच युद्धभूमी आहे. इथलं तापमान इतकं कमी असतं की आॅक्सिजनअभावी कोणताच प्राणी तिथं जगू शकत नाही. तिथं भारताचे शूर जवान प्राण तळहातावर घेऊन लढत असतात. त्यांच्यासाठी पुण्यातल्या सुमेधा चिथडे या महिलेनं स्वत:चे दागिने मोडले आणि तिथल्या आॅक्सिजन प्लँटसाठी पैसे दिले. त्यांची ही तळमळ, त्याग ही शांतीचा उपदेश करून स्वत: हजारो कोटींची माया जमवणाºया आसारामला चपराक आहे.

Web Title: Need to create an environment against casting cow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.