जागतिकीकरण कवेत घेणाऱ्या शिक्षण पद्धतीची गरज

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 05:28 AM2019-10-15T05:28:51+5:302019-10-15T05:29:08+5:30

कलाम यांनी आयुष्यभर विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक, शैक्षणिक, आध्यात्मिक विकासासाठी जीवाचे रान केले.

The need for a globalized education system | जागतिकीकरण कवेत घेणाऱ्या शिक्षण पद्धतीची गरज

जागतिकीकरण कवेत घेणाऱ्या शिक्षण पद्धतीची गरज

Next

१५ आॅक्टोबर हा जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा संयुक्त राष्ट्र संघाने २0१0 साली केली. भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न एपीजे अब्दुल कलाम यांचा हा जन्मदिवस. कलाम यांनी सर्व संस्कृती आणि समाजातील विद्यार्थ्यांशी जातीय आणि आर्थिक विभाजनांच्या पलीकडे एक घनिष्ट आणि सामंजस्यपूर्ण संबंध साधले. एक विद्यार्थी म्हणून त्यांचे स्वत:चे जीवन खूपच आव्हानात्मक आणि संघर्षांनी भरलेले होते. एक काळ असा होता की जेव्हा त्यांना आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घरोघरी वृत्तपत्रांची विक्री करावी लागली होती.


कलाम यांनी आयुष्यभर विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक, शैक्षणिक, आध्यात्मिक विकासासाठी जीवाचे रान केले. आजघडीला आपला भारत देश एका संक्रमणावस्थेतून जातो आहे. सध्या विविध आघाड्यांवरच्या प्रगतीचा किंवा विकासाचा वेग किंचित मंदावल्यासारखा दिसतो आहे खरा. मंदीचे ढग अजूनही क्षितिजावर रेंगाळत आहेत, ते पूर्णपणे दिसेनासे झालेले नाहीत. पण सगळेच चित्र निराशाजनक नक्कीच नाही. विकासाचा, वाढीचा, उत्पादनाचा वेग मंदावला आहे, परंतु थांबलेला नाही. ही अवस्था लवकरच जाईल. जगात अशा रीतीने चिरंतन किंवा शाश्वत काहीही नसते आणि म्हणूनच या मंदीचा जास्त बाऊ करू नये. कारण या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी आणि देदीप्यमान यश मिळवण्यासाठी जी बाब खºया अर्थाने आवश्यक आहे ती आपल्याकडे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे - पैसा नव्हे तर युवा मनुष्यबळ.
आज मात्र वेगळ्या दिशेने विचार करून आपल्याकडे भरपूर प्रमाणात असलेल्या या मनुष्यबळाचा योग्य रीतीने वापर करण्याची वेळ आली आहे. तरुणवर्गाची इतकी मोठी संख्या असलेले फारच थोडे देश जगात आहेत. जगातील बहुसंख्य देशांमधल्या नागरिकांचे सरासरी वयोमान वाढत चालले आहे आणि झपाट्याने मध्यमवयीन बनणाºया या जगातला फार मोठा तरुणाईचा साठा आपल्याकडे आहे. ही फार महत्त्वाची जमेची बाजू आहे. या तरुणवर्गाला योग्य प्रशिक्षण दिले गेले की त्यांच्याकडून देशाच्या अर्थकारणात मोठे सकारात्मक बदल घडवून आणता येतीलच शिवाय हे तरुणतरुणी जागतिक पातळीवर काम करतील तेव्हा भरपूर पैसा कमावतील आणि त्यापैकी मोठा हिस्सा, बचतीच्या रूपाने, ते भारतातच परत पाठवतील. याने भारताचे सकल उत्पन्न म्हणजेच जीडीपी तसेच उत्पादकताही वाढेल आणि इथल्या तरुणवर्गाच्या निर्मितिक्षम मनाला संधीही उपलब्ध होतील. अर्थात या फार मोठ्या संधीचा फायदा मिळवण्यासाठी आपणा सर्वांनाच मनोवृत्ती आणि कामाची पद्धत बदलावी लागेल. तसे झाले नाही तर मात्र धोरणांच्या अंमलबजावणीतल्या संथपणामुळे, लोकसंख्या हे देशापुढचे मोठे संकट ठरेल.


जागतिकीकरणाचे फायदे हवे असतील तर आपल्या मुलामुलींना जागतिक पातळीवर वापरल्या जाणाºया भाषा शिकवण्याचे काम युद्धपातळीवर हाती घ्यावे लागेल. यासाठी प्रचंड प्रमाणावर शिक्षक लागतील हे खरे आहे, परंतु नेमक्या याच ठिकाणी आपण ई-शिक्षण, आभासी शाळा (व्हर्च्युअल क्लासरूम) अशा बाबींचा वापर करू शकतो! माहिती तंत्रज्ञान-सक्षमित शिक्षण पद्धतीचा आपणास मोठा उपयोग होणार आहे. केरळचे उदाहरण इथे देता येईल - जवळजवळ प्रत्येक केरळी कुटुंबातली एक व्यक्ती परदेशी चलन कमवीत असल्याने त्या राज्याचा चेहरामोहराच बदलला आहे. महाराष्ट्रात हे घडवणे अजिबात अशक्य नाही. शिक्षण म्हणजे शाळा-कॉलेज, घोकंपट्टी आणि अखेर पदवी हे आपल्या मनावर आतापर्यंत कोरलेले चित्र पुसण्याची आणखी एक पायरी आपणास ओलांडावी लागेल.
शिक्षणाचे मोठ्या प्रमाणात संगणकीकरण झाल्यास शिक्षणाच्या किंवा शिक्षकाच्या दर्जाबाबतची फार मोठी चिंता तर मिटेलच शिवाय शिक्षण देण्या-घेण्याच्या वेगामध्येही बदल होतील. शालेय शिक्षणाची आज आपण बारा वर्षे मानतो. परंतु तेवढेच शिक्षण नवीन तंत्राने आठच वर्षांत देता येईल. या मार्गाने देशभरातल्या दूरदूरच्या हजारो विद्यार्थ्यांना, वाजवी किमतीत, उच्च शिक्षणाकडे वळणे शक्य येईल. शिकलेल्या लोकांचे व रोजगारांचे प्रमाण वाढले आणि त्यातून सर्वांना पैसा मिळू लागला की भारतातल्या एकंदर सामाजिक वातावरणात फरक पडेल, शांतता नांदेल व एकी वाढेल. थोडक्यात सांगायचे तर बदलत्या काळानुसार सर्व पातळ्यांवर नवी धोरणे ठरवून त्यांची युद्धपातळीवर अंमलबजावणी केली तरच आपल्या देशाची वाढती लोकसंख्या हे संकट न ठरता तिचे वरदानात रूपांतर करता येईल.

डॉ. दीपक शिकारपूर। संगणक साक्षरता प्रसारक

Web Title: The need for a globalized education system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.