जनतेच्या पुढाकाराची गरज

By admin | Published: August 19, 2015 10:30 PM2015-08-19T22:30:08+5:302015-08-19T22:30:08+5:30

छत्रपती शिवराय, जोतिबा, टिळक, आगरकर, शाहू, आंबेडकर आणि सावरकर ही मराठी माणसांची दैवते असली तरी समाजातील प्रत्येक ज्ञाती वर्गाने त्याच्या जातीविषयक

The Need for Public Initiatives | जनतेच्या पुढाकाराची गरज

जनतेच्या पुढाकाराची गरज

Next

छत्रपती शिवराय, जोतिबा, टिळक, आगरकर, शाहू, आंबेडकर आणि सावरकर ही मराठी माणसांची दैवते असली तरी समाजातील प्रत्येक ज्ञाती वर्गाने त्याच्या जातीविषयक अभिमानानुसार व परजातीविद्वेषानुसार त्यांचे आपसात वाटप करून घेतले आहे. ते करताना आपला मानलेल्या महापुरुषावर आपला एकाधिकार असल्याचे सांगण्याचा त्यांचा आग्रह असतोे. त्याचवेळी त्याच्यावर इतरांनी काही बोलू वा लिहू नये आणि तसे करायचे झाल्यास आम्हाला आवडेल तसेच बोलावे वा लिहावे असेही त्यांचे म्हणणे असते. त्याचमुळे सारे आयुष्य शिवाजी महाराजांचे चरित्रगायन करणाऱ्या बाबासाहेब पुरंदऱ्यांना महाराष्ट्र सरकारने दिलेल्या महाराष्ट्रभूषण पुरस्कारावरून राज्यात एक रान उठविले गेले. कोणी रस्त्यावर उतरून आंदोलन छेडले, कोणी बसगाड्यांची जाळपोळ केली तर कोणी मंत्र्यांची कार्यालये उद्ध्वस्त केली. पुरंदऱ्यांनी लिहिलेले शिवचरित्र आम्हाला मान्य नाही असे म्हणणारा व स्वत:ला पुरोगामी म्हणविणारा पण त्याचवेळी ब्राह्मणद्वेषाने पछाडलेला एक वर्ग जसा यात पुढे आहे तसा पुरंदऱ्यांच्या शिवचरित्राविषयीचा आदर असणाऱ्यांचा आणि राज्यातील खऱ्या व खोट्या पुरोगाम्यांना त्यांच्या खऱ्या स्वरुपात ओळखणाऱ्यांचा व त्यातही आपले राजकीय हित समोर सरकवू पाहणाऱ्यांचा दुसरा वर्गही त्यात आघाडीवर आहे. या दोन वर्गातल्या धुमश्चक्रीमुळे धास्तावलेल्या सरकारने पुरंदऱ्यांच्या पुरस्कार वितरणाचा पूर्वी षण्मुखानंद सभागृहात आयोजिलेला सोहळा राजभवनातील फक्त अडीचशे लोक बसू शकतील अशा बंदिस्त सभागृहात हलविला. जातीद्वेष आणि जातीविषयीचे भय यांनी गाठलेली आपल्यातील पराकाष्ठाच यातून उघड झाली. गेले आठ दिवस वृत्तपत्रे आणि वाहिन्या यांनी हा वाद तापविला. त्यावर आलेली माणसे त्यांच्या ज्ञात पठडीनुसारच भूमिका घेताना साऱ्यांना दिसली. एक महत्त्वाची गोष्ट मात्र ही की त्यातल्या कोणीही पुरंदऱ्यांच्या शिवनिष्ठेविषयी आक्षेप घेताना दिसले नाही. आक्षेप घेणारे त्यांच्या ‘ब्राह्मणी’ हेतूविषयी बोलले, वर त्यातल्या अनेकांनी पुरंदऱ्यांनी त्यांच्या शिवचरित्रातील सगळ््या जातीतील लढवय्यांविषयी एवढ्या आदराने लिहिले हेही सांगून टाकले. जात हे राजकारणातले वास्तव असल्याने आणि त्यातही ब्राह्मणद्वेष हा त्यात पूर्वापार राहत आल्याने या वादाला राजकीय स्वरुप येणे क्रमप्राप्त होते. महाराष्ट्रातल्या आताच्या ब्राह्मणविरोधी संघटनांचे परात्पर नेतृत्व शरद पवारांकडे जात असल्याने मनसेच्या राज ठाकऱ्यांनी त्यांना यात ओढले व या वादाला तेच कारणीभूत असल्याचा आरोप केला. शिवसेना, भाजपा व त्यांच्या मित्रपक्षांच्या मनातही तेच असले तरी त्यांच्या मनातली राजकीय समीकरणे त्यांना तसे करू देताना दिसली नाहीत. कॉग्रेस पक्षाच्या पुढाऱ्यांची यात झालेली दयनीय स्थितीही साऱ्यांनाच दिसत होती. एक बाब मात्र निश्चित, या निमित्ताने राजकारणी, समाजकारणी, साहित्यिक आणि स्वत:ला इतिहासाचे जाणकार मानणाऱ्या साऱ्यांचे खरे चेहरेच महाराष्ट्राला पाहता आले. काही कायदेबाज लोकांनी हा वाद न्यायालयात नेऊन पुरंदऱ्यांचा पुरस्कार थांबविण्याचा केलेला प्रयत्न त्यांच्याच अंगलट आलेलाही या निमित्ताने दिसला. या साऱ्या प्रकाराने भांबावलेले सरकार भ्याले असले तरी नमले मात्र नाही. त्याने बाबासाहेबांना द्यावयाचा पुरस्कार पुरेशा बंदोबस्तात का होईना दिला आणि या झेंगटातून मोकळे झाल्याचा सुस्कारा सोडला. मात्र सरकारने आपली सुटका अशी करून घेतली असली तरी मराठी अभ्यासकांची, इतिहासकार म्हणविणाऱ्यांची आणि समाजात सन्मानाने जगू इच्छिणाऱ्या सर्व ज्ञाती वर्गातील लोकांची खरी समस्या आता सुरू झाली आहे. कोणत्याही विषयावरचे आपले मत सार्वजनिक जागी मांडताना आता त्यांना जपून व भिऊनच बोलावे लागणार आहे. दाभोळकर आणि पानसऱ्यांचे खुनी पडद्याआड होते आणि अद्याप ते तसेच राहिले आहेत. मात्र आताचा संघर्ष उघड्यावरचा आहे. तुम्ही कोणाला वाईट म्हणता हाच केवळ संघर्षाचा मुद्दा आता राहिला नाही. तुम्ही कोणाला चांगले म्हणता हाही आता वादाचा व हमरीतुमरीचा विषय झाला आहे. त्यावरचे तट तयार आहेत आणि त्यांच्या हातची आयुधेही सज्ज आहेत. दुर्दैव याचे की एकाच मराठी समाजात साऱ्यांना जवळ आणण्याचे कसब व क्षमता असणारे नेतृत्व आज उभ्या महाराष्ट्रात नाही. ज्याच्या निष्ठांविषयी नि:शंक असावे, ज्याच्या विवेकावर निश्चिंत होऊन विश्वास ठेवावा आणि ज्याच्या आधाराविषयी साऱ्यांना आदर वाटावा असा एकही नेता वा विचारवंत आताच्या वादंगामुळे राज्यात शिल्लक राहिला नाही. जेव्हा नेते हरतात तेव्हा जनतेलाच पुढाकार घ्यावा लागतो. तो पुढाकार आताच्या सांदीकोपऱ्यात संघटित झालेल्या अतिरेकी आक्रस्ताळ््यांचा नसतो. तो शांत, संयमी, विवेकी व सर्व समाजाच्या हिताचा असावा लागतो. मराठी माणसात ती क्षमता आहे आणि या सामान्य माणसांनीच या वादावर पडदा टाकण्यासाठी पुढे येण्याची आता गरज आहे. तुमचे जातीद्वेषाने बरबटलेले राजकारण आम्हाला नको, आम्हाला जाती व धर्मनिरपेक्ष राजकारणाचीच खरी गरज आहे हे त्याने आता फडावर असलेल्या आपल्या पुढाऱ्यांना बजावले पाहिजे.

Web Title: The Need for Public Initiatives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.