या बेतालांपासून लोकशाही जपण्याची गरज
By admin | Published: August 26, 2016 06:54 AM2016-08-26T06:54:34+5:302016-08-26T06:54:34+5:30
मुळात देशाच्या एका प्रमुख मंत्र्याने दुसऱ्या देशाचा उल्लेख एवढ्या हीन पद्धतीने करावा काय, हा यातला खरा प्रश्न आहे.
संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी पाकिस्तानला नरक म्हटले यात त्यांची देशभक्ती व देशप्रेम कुठे आले आणि रम्या या एकेकाळी खासदार राहिलेल्या नटीने पाकिस्तान नरक नव्हे असे म्हटले तर त्यात देशविरोध कुठे आला व ती देशद्रोही कशी ठरते? मुळात देशाच्या एका प्रमुख मंत्र्याने दुसऱ्या देशाचा उल्लेख एवढ्या हीन पद्धतीने करावा काय, हा यातला खरा प्रश्न आहे. पर्रीकर ज्या मंत्रिमंडळाचे सदस्य आहेत त्या मंत्रिमंडळाचे पंतप्रधान मोदी वारंवार पाकिस्तानात जातात, त्या देशाशी चांगले संबंध राखण्याचा प्रयत्न करतात आणि परदेशातून परतताना वाकडी वाट करून पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या घरी होणाऱ्या लग्नात आपली हजेरी लावतात. त्यांच्या अगोदर पर्रीकरांच्या पक्षाचे नेते अटलबिहारी वाजपेयी हे देशाचे पंतप्रधान होते. आपल्या सहा वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी पाकिस्तानशी चांगले संबंध राखण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्यासाठी अटारी-वाघा ही दोन देशांतील सीमारेषा ते बसमधून पार करून गेले. त्याच काळात आग्रा येथे त्यांनी पाकिस्तानचे अध्यक्ष जनरल मुशर्रफ यांच्याशी तीन दिवस बोलणी केली. १९४७ पर्यंत जो प्रदेश हिंदुस्थानचा भाग होता तो पर्रीकरांना नरक का वाटतो आणि त्याही पुढे जाऊन विचारायचे तर अखंड भारताचे संघाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी संघाला तो नरक आपल्याशी जोडून घ्यायचा आहे काय? लाटेचे जे राजकारण २०१४ मध्ये सुरू झाले ते अद्याप शमले नाही. अनेकांची डोकी अजून त्याच काळात राहिली व थांबली आहेत. पाकिस्तान, मुसलमान व अन्य विरोधकांना कोणत्याही पातळीवरची शिवीगाळ केली की देशभक्ती ठरते आणि त्याविरुद्ध कोणी काही बोललेच तर त्याला देशद्रोही ठरविता येते, या बाष्कळ समजुतीत असलेल्यांचा हा वर्ग सोशल मीडियावर जोरात आहे. आपल्या विचारांच्याच नव्हे तर लहरींच्या विरुद्ध जे जातील त्यांना अतिशय हीन पातळीवरून शिवीगाळ करणे हा या वर्गाचा एकमेव कार्यक्रम आहे. त्याला आंतरराष्ट्रीय राजशिष्टाचाराच्या सभ्य संकेतांएवढेच त्यातल्या खाचाखोचांचेही भान नाही. उद्या पाकिस्तानचे मंत्री आणि पुढारी भारताविषयी अशीच असभ्य भाषा बोलू शकतात हेही त्यांना कळत नसते. रम्या या काँग्रेस पक्षाच्या माजी खासदार महिलेविरुद्ध त्यांनी चालविलेला आताचा गहजब त्यांच्या या आंधळ््या सरकारभक्तीतून आला आहे. रम्या यांनी नुकताच पाकिस्तानचा प्रवास केला आणि त्या देशाची भूमी, माणसे आणि त्यांची वर्तणूक यात त्यांना काही गैर दिसले नाही. तेथील जनतेला भारताशी चांगले संबंध हवे आहेत आणि तिथल्या अनेकांचे नातेवाईक व कुटुंबीय भारतात राहातही आहेत. मात्र नेता,पक्ष, सरकार आणि देश या साऱ्या बाबी एकच आहेत असे मानणारी फॅसीस्ट वृत्ती देशातील काही पक्षांत प्रबळ आहे आणि ती रम्या यांच्याविरुद्ध माध्यमांतून सक्रीय झाली आहे. शिवी द्यायला शौर्य लागत नाही, त्यासाठी फारशा बुद्धीचीही गरज नसते. त्यातून सोशल मीडियासारखी फुकट व एकट्याने वापरता येणारी साधने हाती असली की मग अशा शिवीगाळपर्वाला उतही मोठा येतो. त्यामुळे ‘देशविरोधी, धर्मविरोधी, देशद्रोही आणि धर्मद्रोही’ अशा शिव्यांचा देशभर जो मोठा पाऊस पडताना आता दिसतो त्याचे आपण फारसे आश्चर्य वाटू देण्याचे कारण नाही. ‘जे बोलायचे ते आमच्या बाजूने व शक्य तर आमच्याच शब्दात आणि उत्साहात बोला. वेगळा विचार नको आणि विरोध तर नकोच नको. कारण आम्ही राज्यकर्ते आहोत आणि तुम्ही निव्वळ प्रजाजन आहात’ ही मानसिकता लोकशाही कुजविणारी आणि एकाधिकाराला खतपाणी घालणारी आहे. मात्र ज्यांना एकाधिकारच हवा असतो त्यांच्याबद्दल काय लिहाबोलायचे असते? अशा वेळी पडणारा व भेडसावणारा प्रश्न एकच, ही माणसे या देशाला आणि समाजाला कोणत्या टोकावर नेऊन उभे करणार आहेत? त्याचवेळी स्वत:ला लोकशाहीवादी, धर्मनिरपेक्ष व मानवतावादी म्हणविणारी माणसे गप्प का असतात हा प्रश्नही अचंब्यात टाकणारा असतो. की त्यांनीही आपापल्या सुरक्षेची बिळे आता निवडून घेतली आहेत? देशात मोदींचे सरकार सत्तारुढ झाल्यापासून आपला मूळ विचार सोडून त्यांच्या बाजूने जाणाऱ्या रामदास आठवल्यांपासून नरेंद्र जाधवांपर्यंतची आणि मेघे-देशमुखांपासून आताच्या मौर्य व ब्रजेश पाठकपर्यंतची ख्यातकीर्त माणसे फार आहेत. सत्तेवाचून राहाता येत नाही आणि आहोत त्या दिशेने सत्ता फिरकत नाही या स्थितीत त्या बिचाऱ्यांनी तरी कोणाचे दरवाजे ठोठवायचे असतात? त्यांच्याकडून स्वतंत्र अभिव्यक्तीची अपेक्षा करायची नसते आणि निव्वळ एका पातळ सहानुभूतीवाचून त्यांच्याविषयीचे काही मनातही येऊ द्यायचे नसते. राजकारणात रोपट्यांहून बांडगुळे अधिक जगतात. त्यांची टिकून राहाण्याची ताकद मोठी असते. ही ताकद त्यांना मिळत राहावी एवढीच अपेक्षा त्यांच्याविषयी बाळगायची असते. आणि हो, सरकार, मंत्री, त्यांचा पक्ष आणि परिवार यांच्यावर टीका करताना इतरांनी जास्तीचे जपून राहण्याचीही गरज आताच्या या अनधिकृत आणीबाणीत आहे. ती करायला धजावाल तर लगेच देशविरोधाचा वा देशद्रोहाचा शिक्का माथी येण्याचे भय आहे हे विसरणे उपयोगाचे नाही. रम्या या महिलेला याचा विसर पडल्याने तिने पाकिस्तान हा नरक नव्हे असे म्हणण्याचे धाडस केले इतकेच.