लोणारचे लावण्य टिपले, आता ते जपा!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2021 08:22 AM2021-02-08T08:22:46+5:302021-02-08T08:25:21+5:30
नासामुळे ‘लोणार’च्या नशिबात ‘मंगळ’ आला हा शुभ शकुनच! आतातरी या ठेव्याची दुर्दशा संपेल, अशी आशा करायला हरकत नाही!
- राजेश शेगोकार, उपवृत्तसंपादक, लोकमत, अकोला
भारतात ताजमहाल, लाल किल्ला, वेरूळ - अजिंठा अशी अनेक जगप्रसिद्ध ठिकाणे आहेत. अशा स्थळांचे महत्त्व आवर्जून जपले गेले; मात्र हे भाग्य लोणार सरोवराच्या नशिबात काही आले नाही. कॅनडाच्या लॅब्राडोरचे ‘न्यू क्युबेक’ विवर, आफ्रिकेच्या घानातील ‘बोसमत्वी विवर’ व अमेरिकेच्या अॅरिझोनातील ‘बॅरिंजर विवर’ या सर्व विवरांमध्ये लोणारचे विवर हे सर्वांत प्राचीन असून, जगात तृतीय क्रमांकाचे म्हणून ओळखले जाते. बेसाल्ट खडकातील खाऱ्या पाण्याचे उल्काघाती असलेले असे हे एकमेव विवर आहे.
एवढी मोठी ओळख असतानाही लोणार सरोवराच्या जतन आणि संवर्धनासाठी होणाऱ्या प्रयत्नात सातत्य नसल्याने हे जागतिक स्थळ अजूनही दुर्लक्षित आहे. आता खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच लाेणारचे ‘लावण्य’ जपण्याचा संकल्प केला असल्याने हा ठेवा पुढच्या पिढीसाठी संरक्षित राहील, अशा अपेक्षा उंचावल्या आहेत. यापूर्वी सरोवर विकासासाठी २००९ साली तत्कालीन सरकारने आराखडा जाहीर केला हाेता; मात्र १२ वर्षांनंतर आजही विकास केवळ कागदावरच आहे. आता मुख्यमंत्र्यांनी १०७ काेटींचा निधी मंजूर केला आहे. या निधीमधून लाेणारचे वैभव जपण्यासाठी अनेक याेजना आखण्यात आल्या आहेत; मात्र वन, महसूल व पर्यटन विभागातील समन्वयाच्या अभावामुळे लाेणारच्या विकासाचे शिवधनुष्य पेलणे अवघड हाेते. हा पूर्वानुभव पाहता पुन्हा नव्या आराखड्याची घाेषणा केवळ ‘इव्हेंट’ ठरू नये म्हणजे झाले! लोणार सरोवराचे आम्लधर्मी क्षाराचे पाणी हेच या सरोवराचे वैशिष्ट्य आहे; मात्र गावातील संपूर्ण सांडपाणी या सरोवरात जात असल्याने पाण्यातील क्षार कमी होत असून, हे सरोवर आपला मूळ गुणधर्म सोडते की काय, अशी शंका निर्माण झाली आहे. मध्यंतरी पाण्याचा रंग गुलाबी झाल्यानंतर या शंकेला जाेर आला हाेता. सरोवरात १०५ शेतकऱ्यांची २१ हेक्टर जमीन आहे. ही जमीन संपादित करणे आवश्यक आहे. सरोवराच्या काठावर कमळजादेवीचे पुरातन मंदिर आहे. या मंदिरात जाण्यासाठी सरोवरात उतरावे लागते व आणि तेच या सरोवराच्या प्रदूषणाचे मोठे कारण आहे. सरोवराच्या काठी तब्बल २७ मंदिरे आहेत. १० व्या शतकापासून ते १७ व्या शतकापर्यंतचा हा प्राचीन ठेवा सध्या बेवारस आहे. दैत्यसूदन मंदिर हे हेमाडपंती परंपरेतील अतिशय प्राचीन मंदिर, परंतु या मंदिराला कुठल्याही प्रकारचे संरक्षण नाही. सीतान्हाणी, कुमारेश्वर मंदिर, अहिल्यादेवी होळकर अन्नछत्र असो की लिंबी बारव असो या वास्तुंच्या जतनाचा लहानसाही प्रयत्न येथे दिसत नाही. सरोवराचा अभ्यास करण्यासाठी जगभरातील तज्ज्ञ येथे येतात. त्यामध्ये काही हौशी मंडळीही असतात. संशोधनाच्या नावाखाली ही मंडळी सरोवर परिसरात मुक्तपणे वावरतात. यामधील काही महाभागांनी सरोवराच्या बेसाल्ट खडकाला ड्रीलने छिद्रे पाडून हा ठेवा धोक्यात आणला आहे. सराेवराच्या परिसरात असा अभ्यास करायचा असेल, तर परवानगी घेण्याची तसदी कुणी घेत नाही अन् कुणी घेतली आहे का?- हे पाहण्याची गरजही कुणाला भासत नाही. मध्यंतरी नासाने विकसित केलेले ‘क्यूरिओसिटी रोव्हर’ हे यान मंगळावर उतरले. या मोहिमेत लोणार सरोवराचा डाटा आणि दगडमातीचे नमुने वापरल्याचे वृत्त हाेते. यापूर्वी लोणारचा संबंध चंद्रावरील विवराशी लावला गेला होता. नासामुळे लोणारच्या नशिबात ‘मंगळ’ आला आहे. मंगळ म्हटले की अनेकांना लग्न आठवतात. लोणारच्या नशिबात खराखुरा मंगळ असला तरी तो विकासाच्या घरात असल्याने थोडीफार आशा ठेवायला जागा आहे!
ख्यातनाम छायाचित्रकार असलेल्या मुख्यमंत्र्यांकडे परवाच्या भेटीत कॅमेरा नव्हता, तरीही मोबाइलचा कॅमेरा वापरून लोणार सरोवराची छायाचित्रे काढण्याचा मोह त्यांना झालाच ! लोणारचे हे ‘लावण्य’ मुख्यमंत्र्यांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपले आहेच, आता त्या लावण्याच्या जतनासाठी त्यांनी पावले उचलावीत!