इच्छाशक्तीची गरज!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2017 12:15 AM2017-06-28T00:15:47+5:302017-06-28T00:15:47+5:30
दहशतवादाला ना जात असते, ना धर्म! धर्माच्या नावाखाली निरपराध लोकांचे मुडदे पाडायचे, रक्ताचे पाट वाहवायचे आणि दहशतीच्या जोरावर सामान्य नागरिकांना वेठीस धरायचे
दहशतवादाला ना जात असते, ना धर्म! धर्माच्या नावाखाली निरपराध लोकांचे मुडदे पाडायचे, रक्ताचे पाट वाहवायचे आणि दहशतीच्या जोरावर सामान्य नागरिकांना वेठीस धरायचे, एवढाच दहशतवादी संघटनांचा एकमेव उद्देश असतो. दहशतवाद ही आज केवळ एका देशापुरती समस्या राहिलेली नाही. दहशतवादाचे चटके जगभरातील सर्वच देशांना कमीअधिक प्रमाणात बसत आहेत. भारताचं नंदनवन अशी बिरुदावली मिरवणारं आमचं काश्मीर आज देशविघातक शक्तींच्या कारवायांमुळे होरपळत आहे. सीमेपलीकडून मिळणाऱ्या मदतीवर फोफावू बघत असलेल्या दहशतवादाला आणि कपट कारस्थानाला निपटण्यासाठी आमचे शूर जवान सक्षम आहेत आणि त्यांनी वेळोवेळी ते सिद्धही करून दाखविले. देशातील काही फितूर संघटनांना हाताशी धरुन काश्मीरला कायम अस्थिर ठेवावयाचा विडा पाकिस्तानने उचलला आहे. पाकधार्जिण्या संघटना आमच्या तरुण पिढीला चुकीचा मार्ग दाखवून त्यांची डोकी भडकावत आहे. दुर्दैवाने तरुणाईही या संघटनांच्या जाळ्यात अडकतेय! परिणामी, एका हातात दप्तर, तर दुसऱ्या हातात दगड, असे चित्र आज काश्मीरमध्ये पाहायला मिळत आहे. पवित्र रमजान महिन्यातल्या ‘शब-ए-कद्र’च्या प्रार्थनेनंतर पोलीस अधिकारी अयुब पंडित यांना ज्या पद्धतीने जमावाने ठेचून ठार मारले, ते पाहून देशात संतापाची लाट न उसळती तरच नवल! अयुब पंडित यांच्या हत्या प्रकरणाची शाई वाळते न वाळते तोच, रमजान ईदच्या दिवशीही सैनिकांवर दगडफेक झाली. चार दिवसांपूर्वीच मुस्लीम बांधवांचे पवित्र ठिकाण असलेल्या मक्केतही दहशतवाद्यांचा घातपात घडविण्याचा कट वेळीच उधळण्यात आला होता. इसिससारख्या अन्य धर्मांध संघटनांचा यामागे हात असल्याचे लपून राहिलेले नाही. दहशतवादी संघटना मूठभर ‘जिहादी’ तयार करून संपूर्ण जगाला वेठीस धरत आहेत. अनेक देशांमध्ये पोटाची खळगी भरण्यासाठी नागरिकांना संघर्ष करावा लागतो. गरिबी वाईट आणि त्यातही टीचभर पोटाची भूक आणखी वाईट! दहशतवादी संघटना समाजातील गरिबीचा फायदा घेऊन त्यांचे इप्सित साध्य करीत आहेत. तरुणांना दहशतवादाच्या मगरमिठीतून बाहेर काढायचे असेल तर सर्वच देशांना कठोर व्हावे लागेल. त्यासाठी तथाकथित धर्मगुरूंनाही ठिकाणावर आणावे लागेल; कारण दहशतवादाची पहिली ‘शिकवणी’ हीच मंडळी देत असते. ‘ब्रेन वॉश’च्या नावाखाली एखाद्या धर्माबद्दल त्यांच्यात टोकाचे वाईट विचार भरवले जातात आणि तेथूनच तरुणांची मानवतेशी लढाई सुरू होते. समस्या कुणाला नसतात? पण त्यांना उत्तरही असतंच! समस्या सोडविण्यासाठी गरज असते ती इच्छाशक्तीची! महादेवाच्या पिंडीवर विंचू बसला आणि तो केव्हाही विषारी डंख मारेल असं वाटत असेल, तर त्यावेळी ‘शिव-शिव’ करून उपयोग नसतो. त्या विंचवाची नांगी ठेचणे हेच त्यावेळी पहिले कर्तव्य ठरते. ते करताना एखादा फटका पिंडीला लागला तरी पाप-पुण्याचा विचार न करता, त्या विंचवाची नांगी ठेचण्यातच हित असते!