नकारात्मक प्रवृत्ती हद्दपार करण्याची गरज

By admin | Published: July 25, 2016 03:37 AM2016-07-25T03:37:56+5:302016-07-25T03:37:56+5:30

माझा स्वभावच मुळात आशावादी आहे. परिस्थिती कितीही कठीण असली तरी त्यातही मला काही ना काही सकारात्मक बाजू दिसते.

Negative tendency has to be eliminated | नकारात्मक प्रवृत्ती हद्दपार करण्याची गरज

नकारात्मक प्रवृत्ती हद्दपार करण्याची गरज

Next

विजय दर्डा,  (लोकमत पत्र समूहाचे चेअरमन)
माझा स्वभावच मुळात आशावादी आहे. परिस्थिती कितीही कठीण असली तरी त्यातही मला काही ना काही सकारात्मक बाजू दिसते. खरे तर आपण सर्व आशावादी राहूनच आयुष्यातील अडचणींवर मात करू शकत असतो. पण हल्ली मला असे जाणवते की, आपल्या सभोवती नकारात्मकता वाढत आहे आणि तिला प्रसंगी संस्थागत स्वरूप मिळत आहे. याच नकारात्मक मनोवृत्तीतून सार्वजनिक चर्चेत ‘धोरणात्मक लकवा’ आणि ‘निष्क्रिय नोकरशाही’ असे शब्दप्रयोग वापरले जाऊ लागले आहेत.
एका क्षेत्रात नकारात्मक भावना शिरली की तिचा इतरत्रही गुणाकार पद्धतीने परिणाम दिसून येतो. टेलिकॉम व कोळसा खाण क्षेत्रांत झालेल्या कथित घोटाळ्यांचेच उदाहरण घ्या. या घोटाळ्यांना आवर घालण्यासाठी स्पेक्ट्रमचा लिलाव करण्यासारखे जे सुधारणावादी उपाय योजले गेले त्याचाच थेट परिणाम म्हणून आता सर्व टेलिकॉम कंपन्यांना ‘कॉल ड्रॉप’च्या समस्येस सामोरे जावे लागत आहे. जो सर्वाधिक बोली लावेल त्याला स्पेक्ट्रम विकले जात असल्याने ते विकत घेण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांना भलीमोठी रक्कम खर्च करावी लागते. एकीकडे ग्राहकांची संख्या सतत वाढत असली तरी स्पेक्ट्रमच्या रूपाने खर्चही हाताबाहेर जाऊ लागल्याने, दर आहेत त्याच पातळीवर ठेवून स्पर्धेत टिकून राहण्यासाठी, या कंपन्यांनी त्यांची पायाभूत यंत्रणा उभारण्यावरील गुंतवणुकीस कात्री लावण्यास सुरुवात केली. हे साखळी स्वरूपातील नकारात्मकतेचे उदाहरण आहे. पारदर्शकता व भ्रष्टाचार निपटून काढण्यास कोणाचाच विरोध नाही. पण अडचण अशी आहे की एकदा वृत्तीमध्ये नकारात्मकता शिरली की तुम्ही कोणत्याही गोष्टीवर लक्ष केंद्रित करून विचार करू शकत नाही. नकारात्मकतेच्या मळभामध्ये मुख्य मुद्दाच हरवून जातो. मुख्य मुद्दा असा आहे की, राष्ट्रीय साधनसंपत्तीचा लिलाव करून जास्त महसूल मिळविणे हे सरकारचे काम आहे, की जेणेकरून महसुलात आपोआपच उत्तरोत्तर वाढ होत राहील अशा सुदृढ विकासाची धोरणे राबविणे हे सरकारचे काम आहे?
आणखी एक घटना पाहा. ती आहे देश सोडून परागंदा झालेले ‘मद्यसम्राट’ विजय मल्ल्या यांच्याशी संबंधित. विजय मल्ल्यांच्या कंपन्यांकडे बँकांची ९००० कोटींची कर्जे थकली आहेत. यात मल्ल्यांसारखी ‘हाय प्रोफाईल’ व्यक्ती नसती तर कदाचित बँकिंग उद्योगातील प्रचलित उपाय योजून बव्हंशी रक्कम वसूलही केली असती. पण मल्ल्यांशी तडजोड करणे म्हणजे भयंकर दुष्कृत्य आहे अशा नकारात्कतेने पाहणे सुरू झाल्याने आता कदाचित पैसेही परत मिळणार नाहीत व स्वत: मल्ल्याही भारतात परत येणार नाहीत.
या नकारात्मकतेसोबत येणारा उन्माद आणि जरा काही वाद निर्माण झाला की त्यावर माध्यमांमधून सुरू होणाऱ्या उलट-सुलट चर्चा यामुळे जे काही वातावरण तयार होते त्याचे विध्वंसक परिणाम होतात. हे फक्त आपल्याच देशात नव्हे तर इतरत्रही घडताना दिसते. शेजारच्या पाकिस्तानात इंटरनेटवरून ‘सेलिब्रिटी’ झालेल्या एका महिला मॉडेलने परधर्मीय पुरुषाबरोबर काढलेला ‘सेल्फी’ समाजमाध्यमांतून सर्वदूर पसरल्यावर तिच्या भावाने तिचा खून केला व हा गुन्हा ‘आॅनर किलिंग’ म्हणून रंगविला गेला. नकारात्मकतेचे हे पराकोटीचे उदाहरण म्हणावे लागेल. मेलेल्या गायीचे कातडे काढणाऱ्या दलितांवर गुजरातमध्ये झालेल्या अमानुष हल्ल्यातूनही हीच नकारात्मकता दिसून येते. उत्तर प्रदेशातील एका भाजपा नेत्याने मायावती यांच्याविषयी काढलेले असभ्य उद्गार व त्याला मायावतींच्या कार्यकर्त्यांनी दिलेले प्रत्युत्तर हेही याच वर्गात मोडणारे आहे. जगात इतरत्र पाहिले तर ब्रेक्झिटवरून झालेले वादंग, अमेरिकेतील ट्रम्प यांचा निवडणूक प्रचारातील उथळपणा व भडकपणा, तुर्कस्तानात लष्कराचा उठाव फसल्यानंतर राष्ट्राध्यक्ष एर्डोगान यांनी योजलेले हुकूमशाही उपाय किंवा ‘इसिस’ आणि अन्य दहशतवादी संघटनांकडून वरचेवर केले जाणारे नृशंस हल्ले हाही याच नकारात्मक वृत्तीचा परिपाक आहे. बहुतांश ब्रिटिश नागरिकांच्या नकारात्मक मानसिकतेतूनच ‘ब्रेक्झिट’च्या बाजूने म्हणजेच ब्रिटनने युरोपीय संंघटनेतून बाहेर पडण्यासाठी मतदान झाले. अमेरिकेने आजवर वंश वा वर्णाचा विचार न करता जगभरातील लोकांचे स्वागत केले व यामुळेच अमेरिका विविध संस्कृतींचा ‘मेल्टिंग पॉट’ म्हणून ओळखली जाते. पण राष्ट्राध्यक्ष होऊ पाहणारे डोनाल्ड ट्र्म्प मेक्सिकोतून येणारे लोंढे थांबविण्यासाठी सीमेवर भिंत बांधण्याची भाषा करतात तेव्हा ते नेमक्या याच मूल्याची पायमल्ली करतात. यात ‘इसिस’ आणि अन्य दहशतवादी संघटनांकडून केला जाणारा हिंसाचार अत्यंत निंद्य व निरर्थक म्हणावा लागेल. विचारांची लढाई हिंसाचाराने जिंकता येईल असे मानणारे इतिहासावरून काहीच शिकले नाहीत, असे म्हणावे लागेल. अंतिमत: वाईटावर चांगल्याचा विजय होतो ही केवळ कल्पना नाही. मानवी जीवन हे याच दोन प्रवृत्तींचा निरंतर संघर्ष आहे. यात शेवट हा विधिलिखित असतो. हे चक्र अव्याहतपणे सुरू असते. एका परीने हा निसर्गाचा नियमच आहे. रात्र कितीही अंधारी असली तरी सू़र्य उगवल्याशिवाय राहत नाही. रात्र तेवढ्यापुरती आपली मिजास दाखविते पण ती येणाऱ्या दिवसाला थोपवू शकत नाही. सत्कृत्यावर श्रद्धा असणारे, निरपेक्ष बुद्धीने समाजसेवा करणारे आणि समाजातील सदाचारी यांना नेहमीच निंदानालस्ती सहन करावी लागते. त्यांच्या हेतूविषयी शंका घेतली जाते व त्यांनी काहीही केले की त्यास विरोध केला जातो. त्यांची अप्रतिष्ठा केली जाते व मोठ्या कष्टाने कमावलेली इभ्रत धुळीला मिळविली जाते. हे सर्व त्यांनी स्वीकारलेला मार्ग सोडावा यासाठी केले जाते. शिक्षणक्षेत्र असो वा सामाजिक सेवा असो हे पाहायला मिळते. ज्यांचा निहित स्वार्थ यामुळे धोक्यात येतो त्यांचे उद्दिष्ट सोपे व सरळ असते - काहीही करून अशा सदाचारी लोकांना आपल्या मार्गातून दूर करायचे.
हे लिखाण संपविण्यापूर्वी...
काश्मीरमध्ये सध्या निर्माण झालेली हिंसक अशांतता आणि त्याचा फायदा उठविण्याचा पाकिस्तानकडून केला जाणारा प्रयत्न हाही याच नकारात्मक दृष्टिकोनातून आहे. आपणच उभ्या केलेल्या दहशतवाद्यांच्या फलटणींना आवर घालण्याऐवजी पाकिस्तान या दहशतवाद्यांचा ‘हुतात्मे’ म्हणून गौरव करण्यात धन्यता मानते. एखाद्या स्त्रीला ‘आॅनर किलिंग’ म्हणून मारण्यात जसा कोणताही ‘आॅनर’ नाही तसाच दहशतवादाचा हौतात्म्याशी दुरान्वयानेही संबंध नाही. काश्मीरमध्ये सध्या जे काही सुरू आहे ते पाहिल्यावर वाटते की, ज्याला ठार मारण्यावरून हे सर्व सुरू झाले तो बुऱ्हाण वणी आजही आपले हे कर्तृत्व इंटरनेटवर टाकत असेल; पण इंटरनेट या माध्यमामुळे दहशतवादी कृत्यांचा मूळ रंग बदलत नाही.

Web Title: Negative tendency has to be eliminated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.