नेहरू-पटेल प्रतिस्पर्धी नव्हेत, तर मित्र!

By Admin | Published: October 10, 2014 04:11 AM2014-10-10T04:11:46+5:302014-10-10T04:11:46+5:30

वल्लभभाई पटेल यांचे उत्कृष्ट जीवनचरित्र राजमोहन गांधी यांनी लिहिले आहे. वल्लभभार्इंच्या जीवनाचे आणि संघर्षाचे चित्रण यात वाचायला मिळते

Nehru-Patel is not competitive, but friends! | नेहरू-पटेल प्रतिस्पर्धी नव्हेत, तर मित्र!

नेहरू-पटेल प्रतिस्पर्धी नव्हेत, तर मित्र!

googlenewsNext

रामचंद्र गुहा
(विचारवंत व इतिहासकार) - 

वल्लभभाई पटेल यांचे उत्कृष्ट जीवनचरित्र राजमोहन गांधी यांनी लिहिले आहे. वल्लभभार्इंच्या जीवनाचे आणि संघर्षाचे चित्रण यात वाचायला मिळते. पटेल यांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन हे लिखाण झाल्याने चरित्राला विश्वासार्हता आली आहे. राजमोहन गांधींचे हे पुस्तक ‘पटेल : ए लाइफ’ मार्च १९९१ मध्ये पहिल्यांदा प्रसिद्ध झाले. याची प्रस्तावना मात्र एप्रिल १९९० मध्ये लिहिली गेली. प्रस्तावनेच्या सुरुवातीला म्हटले आहे की, ‘‘ गांधी , नेहरू आणि पटेल यांच्या परिश्रमातून स्वतंत्र भारताचे साम्राज्य उभे झाले. पण, ऋणनिर्देशामध्ये नेहरूंची कमालीच्या बाहेर खुशामत केलेली दिसते. गांधीजींचा उल्लेख कर्तव्यभावनेतून केलेला दिसतो. पण पटेलांबाबत मात्र कृपणता दाखवली आहे.’’
जनमानसावर पंडित जवाहरलाल नेहरू यांची किती जबरदस्त पकड होती ते ठासून सांगताना राजमोहन यांनी त्यांच्या जन्मशताब्दी समारंभाचा उल्लेख केला. १९८९ मध्ये साजऱ्या झालेल्या या वर्षात नेहरूंचे मोठेपण सांगणारे अनेक सोहळे साजरे केले गेले. टीव्ही मालिकाही आल्या. लेखक पुढे लिहितात, ‘‘देशात आणीबाणी लादल्यानंतर चारच महिन्यांनी म्हणजे ३१ आॅक्टोबर १९७५ रोजी पटेल यांची जन्मशताब्दी आली. पण, विरोधाभास पाहा. नेहरूंची जन्मशताब्दी धूमधडाक्यात साजरी करणाऱ्या सरकारने आणि नोकरशाहीने पटेल यांच्या जन्मशताब्दीकडे पार दुर्लक्ष केले. भारताच्या एका कर्तृत्ववान सुपुत्राच्या आयुष्यावर असा पडदा पडला की मग तो उठलाच नाही. अधूनमधून या महापुरुषाचे स्मरण होत गेले तेवढेच.’’
असे का व्हावे? एका महान नेत्याला देशाने डोक्यावर घेतले आणि दुसऱ्याकडे दुर्लक्ष केले. १९९१ पर्यंत आणि त्याच्या आधीही हे चित्र होते. आणि हे खरे आहे. स्वातंत्र्यानंतर अवघ्या अडीच वर्षांनी वल्लभभाई मृत्यू पावले, तर दुसरीकडे नेहरूंनी संपूर्ण तीन टर्म पंतप्रधान म्हणून देशावर राज्य केले. १९७० आणि ८० च्या दशकातल्या भारताला राजकीय, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या नेहरूंनी आकार दिला. नेहरूंचे उदात्तीकरण करण्याच्या नादात देशाला पटेलांचा विसर पडला असावा, असे दिसते.
नेहरू बराच काळ देशाच्या हृदयसिंहासनावर अनभिषिक्त राजासारखे राहिले. त्याचे दुसरे एक कारण असे असू शकते की, नेहरूंची सुकन्या आणि नातू हे दोघेही देशाचे पंतप्रधान होते. इंदिरा गांधी प्रदीर्घ काळ पंतप्रधान होत्या. आपल्या वडिलांची स्मृती चिरंतन राहावी अशी कुणाही कन्येची इच्छा असते. इंदिराजींनी आपल्या पित्याची स्मृती जागती ठेवली. राजीव गांधी पंतप्रधान होते, त्या कालावधीत नेहरूंची जन्मशताब्दी आली. देशाची सत्ता त्यांच्या हाती होती. संपूर्ण शासकीय यंत्रणेला त्यांनी नेहरूंच्या जन्मशताब्दी कामाला लावले.
राजमोहन यांनी केलेला हा संशोधनात्मक अभ्यास १९८० च्या दशकातला आहे. तेव्हा इंदिराजी आणि राजीव गांधी सत्तेत होते. १९८९च्या निवडणुकीत अमेठी लोकसभा मतदारसंघातून राजीव गांधी यांच्या विरोधात जनता दलाने राजमोहन यांना उभे केले. ‘असली गांधी’ आणि ‘नकली गांधी’ यांच्यातील लढाई असे या निवडणुकीचे वर्णन प्रसार माध्यमांनी केले. राजमोहन हे महात्माजींचे थेट वंशज होते. राजमोहन ही निवडणूक हरले. पण, त्यांच्या पक्षाने लगेच त्यांना राज्यसभेवर पाठवले. काँग्रेसच्या विरोधात असलेल्या जनता दलाचे खासदार असतानाच्या काळात राजमोहन यांनी या जीवनचरित्राची प्रस्तावना लिहिली आहे.
राजमोहन यांच्या पुस्तकामुळे पटेल आणि त्यांचे देशाला असलेले योगदान अधिक चांगल्या पद्धतीने देशाला कळले. पण, म्हणावी तशी या जीवनचरित्राची वाहवा झाली नाही. देशाने हे पुस्तक डोक्यावर घेतले नाही. २००४ ते २०१४ या काळात गांधी परिवाराच्या हातात सत्ता होती हेही याचे एक कारण असू शकेल. त्यांनी आपल्या मुलाला पुढे आणले आणि त्यात राजमोहन आणि त्यांचे हे पुस्तक मागे पडले.
नरेंद्र मोदी यांनी आपल्या निवडणूक प्रचार मोहिमेत सरदार पटेल यांना आपले एक नायक म्हणून पुढे केले. दिल्लीत बसलेल्या सत्ताधाऱ्यांनी पटेलांची स्मृती दाबून ठेवली, असा आरोप मोदी यांनी केला होता. पटेल यांचा अतिभव्य पुतळा उभारण्याची घोषणाही त्यांनी केली होती. नेहरूंपेक्षा पटेल चांगले पंतप्रधान ठरले असते, असे मोदी म्हणाले होते.
अशा पक्षपातामुळे नेहरू आणि पटेल हे प्रतिस्पर्धी होते, राजकारणातले वैरी होते, असा अनेक भारतीयांचा समज झाला आहे. काँग़्रेस पक्ष नेहरूंवर हक्क सांगतो, तर भारतीय जनता पक्ष पटेलांना अधिक जवळचा मानतो. पटेलांना समजून घेण्यात मोदी कमी पडलेले दिसतात. पहिली गोष्ट म्हणजे, पटेल हे आजीवन काँग्रेसवाले होते. महात्माजींच्या खुनानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर देशाचे गृहमंत्री म्हणून बंदी घालण्याचे काम त्यांच्याकडे आले. दुसरी आणि अधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, नेहरू आणि पटेल हे प्रतिस्पर्धी नव्हते, मित्र होते, सहकारी होते. १९२० पासून १९४७ पर्यंत काँग्रेसमध्ये दोघांनी मिळून काम केले. त्यानंतर पंतप्रधान आणि उपपंतप्रधान म्हणूनही हे दोघे स्वतंत्र भारताच्या पहिल्या सरकारमध्ये होते. एप्रिल १९४८ मध्ये रॉबर्ट ट्रम्बल यांनी ‘न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये पटेल-नेहरू जुगलबंदीवर भला मोठा मजकूर लिहिला. ट्रमबल लिहितात की, ‘‘दोघांचा स्वभाव वेगळा होता. पण, हा देश एक ठेवून चालवण्याचे भान दोघांनाही होते.’’
हरियाणातील ताज्या निवडणूक प्रचार सभेत मोदींनी प्रथमच नेहरूंची प्रशंसा केली. ती शेवटची नसेल अशी आशा करू या. नेहरूनंतरच्या काँग्रेसने पटेलांची थट्टाच चालवली. संघ परिवार आणि भाजपामधली वजनदार नेतेमंडळी आता त्याचे उट्टे काढू पाहतील. नेहरूंना विस्मृतीत ढकलू पाहतील. तसे झाले तर ती एक मोठी शोकांतिका ठरेल. नेहरू आधुनिक भारताचे शिल्पकार होते म्हणून मी हे सांगत नाही, तर या दोघांनी एकसंध भारत उभारण्यासाठी खांद्याला खांदा लावून काम केले म्हणून मी हे सांगतो आहे.
राजमोहन गांधी यांनी दुर्मिळ कागदपत्रे गोळा करून लिहिले आहे. महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर नेहरू आणि पटेल यांनी आपले मतभेद बाजूला ठेवले. नेहरूंनी धार्मिक बंधुभाव निर्माण करण्यासाठी स्वत:ला वाहून घेतले, परराष्ट्र धोरण आखले आणि देशाचा औद्योगिक पाया घातला तर पटेलांनी लहानलहान राज्ये भारतात सामील करून घेतली. प्रशासकीय सेवेचे आधुनिकीकरण केले, घटनेच्या मुख्य तपशिलाबाबत सर्व राजकीय पक्षांमध्ये एकमत निर्माण करण्यासाठी श्रम घेतले. नेहरू हे सोनिया गांधींच्या काँग्रेसशी संबंधित नाहीत आणि पटेलही मोदींच्या भाजपाचे नाहीत. ज्या देशाला आपण आपला म्हणतो, त्या देशाच्या उभारणीसाठी दिलेल्या अमूल्य योगदानासाठी या दोन्ही नेत्यांचे पुण्यस्मरण करण्याचे सामंजस्य साऱ्या राजकीय पक्षांच्या भारतीयांमध्ये असले पाहिजे.पक्ष नंतर येतो. हे दोघे आधी एका देशाचे होते.

Web Title: Nehru-Patel is not competitive, but friends!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.