"दुसऱ्याच्या वरातीत नाचणे बंद करा"; ना राष्ट्रवादी, ना भाजप, खडसे समर्थकांचा नवा गट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2021 02:31 PM2021-02-01T14:31:31+5:302021-02-01T15:15:20+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या दाव्यात मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रात ७६ ग्रामपंचायतीत विजय झाल्याचे म्हटले आहे. त्यात मुक्ताईनगर, बोदवड व रावेर तालुक्यातील ग्रमपंचायतीची नावे टाकण्यात आली आहेत.

Neither NCP, nor BJP, new group of Khadse supporters | "दुसऱ्याच्या वरातीत नाचणे बंद करा"; ना राष्ट्रवादी, ना भाजप, खडसे समर्थकांचा नवा गट

"दुसऱ्याच्या वरातीत नाचणे बंद करा"; ना राष्ट्रवादी, ना भाजप, खडसे समर्थकांचा नवा गट

Next

मिलिंद कुलकर्णी

एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील प्रवेशानंतर जळगाव जिल्ह्यात राजकीय पातळीवर फार मोठा बदल होईल, असे वातावरण निर्माण केले गेले. पण तसे फार काही घडले नाही. शरद पवार यांच्या उपस्थितीत जळगावात मोठा प्रवेश सोहळा होईल, असे मुंबईतील प्रवेश कार्यक्रमात जाहीर झाले होते. पण अद्याप तशा हालचाली नाहीत. १७ फेब्रुवारी रोजी शरद पवार, अजित पवार हे दोंडाईचा येथे येणार असल्याचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी जाहीर केले आहे. त्यावेळी जळगावचा दौरा होतो काय, हे बघायला हवे. दरम्यान, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची यात्रा खानदेशात येणार असल्याचे जाहीर झाले आहे, त्यामुळे पुन्हा पवार लगेच येतात काय, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये पवारांची तिसरी पिढी आणि उदयोन्मुख नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते, त्या आमदार रोहित पवार यांचा दौरा गेल्या आठवड्यात झाला. या तरुण नेत्याने दिवसभरात अनेक गावांना भेटी दिल्या आणि अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली. पवार नावाचे वलय त्यांच्याभोवती असल्याने चांगली गर्दी होती. मात्र खडसे यांच्या प्रभावक्षेत्रात वरणगाव येथील जाहीर झालेला कार्यक्रम अचानक रद्द झाला. पक्ष कार्यालयात रोहिणी खडसे हजर होत्या. ईडीसंदर्भात केंद्र सरकार सुडबुध्दीने वागत असल्याचे खडसेंचा नामोल्लेख करीत त्यांनी वक्तव्य केले. राष्ट्रवादीत खडसेंचा पूर्णत: मानसन्मान राखला जात असल्याचा संदेश त्यातून दिला गेला. पण वरणगावचे कारण कळले नाही? लवकरच तेथे नगरपरिषदेची निवडणूक होऊ घातली आहे, त्यादृष्टीने या कार्यक्रमाचे महत्त्व होते. राज्य मंत्रिमंडळाने वरणगाव  तळवेल उपसा सिंचन योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता दिली. भाजपने त्याचे श्रेय घेतले. गिरीश महाजन, रक्षा खडसे यांनी वरणगावात जाऊन आनंदोत्सव साजरा केला. ही पार्श्वभूमी महत्त्वाची आहे. राष्ट्रवादीने ती संधी गमावली. ग्रामपंचायत निवडणुकीत मुक्ताईनगर तालुक्यात कोणाचे वर्चस्व राहिले, यावरुन अद्यापही कवित्व सुरु आहे. शिवसेनेचे सहयोगी आमदार चंद्रकांत पाटील यांनी वर्चस्वाचा दावा केला. खडसे यांच्या कोथळी या गावात सेनेचे ५ तर खडसे समर्थक ६ सदस्य निवडून आले. खडसे समर्थक सदस्यांनी खासदार रक्षा खडसे व जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे या दोघींची भेट घेतली. खडसेंवर प्रेम करणारे हे सदस्य असल्याचे वक्तव्य त्यावेळी करण्यात आले. नंतर समाजमाध्यमांवर दावे प्रतिदावे झाले.

स्वतंत्र गटाची परंपरा
राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या दाव्यात मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रात ७६ ग्रामपंचायतीत विजय झाल्याचे म्हटले आहे. त्यात मुक्ताईनगर, बोदवड व रावेर तालुक्यातील ग्रमपंचायतीची नावे टाकण्यात आली आहेत. खडसे समर्थक पॅनल हे ९ गावांमध्ये विजयी झाल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यात सालबर्डी, कोथळी, नरवेल, सुलवाडी, पुरी गोलवाडे, मस्कावद बुद्रुक, मस्कावद खुर्द, मस्कावाद सीम, कोळोदा या गावांचा समावेश आहे. ‘हा सूर्य, हा जयद्रथ’ असे म्हणत सगळ्या ग्रामपंचायतींची नावे राष्ट्रवादीने जारी करीत असताना, दुसऱ्याच्या वरातीत नाचणे बंद करा, असा टोला आमदार चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे. मात्र, खडसे समर्थक हा कोणता नवा गट आहे, याचा खुलासा त्यात नाही. राष्ट्रवादीचे सदस्य ते नाहीत काय, मग ते भाजपचे सदस्य आहेत काय, या प्रश्नांची उत्तरे मिळत नाही. भाजपही हे सदस्य आपले असल्याचा दावा करीत नाही. त्यामुळे ना राष्ट्रवादी, ना भाजप, आम्ही खडसे समर्थक असा नवा गट तर तयार झालेला नाही ना, असा प्रश्न उपस्थित होतो. अर्थात, राजकारणात अशा स्वतंत्र गटाची परंपरा आहे. दबाव गट म्हणून त्याचा वापरही होतो. स्वपक्ष व विरोधकांवर दोघांवर दबाव वाढवायला तो कामी येतो. नारायण राणे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांचे पुत्र नीलेश व नितेश राणे यांनी स्वतंत्र संघटना स्थापन केली होती. गणेश नाईक यांचीही सेनेतून बाहेर पडल्यावर संघटना होती. त्याप्रमाणे, तर हा गट तयार झालेला नाही ना, भुसावळ पालिकेत नुकतीच उपनगराध्यक्ष व विषय समिती सभापतींची निवड झाली. ही निवड करताना एकनाथ खडसे यांच्याशी सल्लामसलत करण्यात आल्याचे नगरसेवक डॉ.सुनील नेवे यांनी जाहीर केले. लोकनियुक्त नगराध्यक्ष भाजपचे आहेत, पालिकेत बहुमत भाजपचे आहे, मग सल्लामसलत खडसे यांच्याशी कशी, हा प्रश्न उपस्थित होतो, पण भाजपनेही याविषयी कानाडोळा करण्याचे ठरविलेले दिसतेय. खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे यांनी भाजपमध्ये असल्याचा पुनरुच्चार केला असला, तरी खडसे समर्थक गट ही नव्याने सोय करून घेण्यात आली आहे, असे एकंदरीत चित्र आहे.

राष्ट्रवादीचा दावा...
राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या दाव्यात मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रात ७६ ग्रामपंचायतीत विजय झाल्याचे म्हटले आहे.  खडसे समर्थक पॅनल हे ९ गावांमध्ये विजयी झाल्याचा दावा करण्यात आला आहे.  ‘हा सूर्य, हा जयद्रथ’ असे म्हणत सगळ्या ग्रामपंचायतींची नावे राष्ट्रवादीने जारी करीत असताना,  दुसऱ्याच्या वरातीत नाचणे बंद करा, असा टोला आमदार चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे.

Web Title: Neither NCP, nor BJP, new group of Khadse supporters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.