निव्वळ पोरकटपणा
By admin | Published: December 29, 2015 02:40 AM2015-12-29T02:40:36+5:302015-12-29T02:40:36+5:30
राजधानी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या आरोपानुसार त्यांच्या कार्यालयावर सीबीआयने जो छापा मारला, त्यामागे अर्थमंत्री अरुण जेटली यांची प्रेरणा होती व दिल्ली क्रिकेट
राजधानी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या आरोपानुसार त्यांच्या कार्यालयावर सीबीआयने जो छापा मारला, त्यामागे अर्थमंत्री अरुण जेटली यांची प्रेरणा होती व दिल्ली क्रिकेट संघटनेतील भ्रष्टाचाराशी असलेल्या वा नसलेल्या जेटलींच्या नात्याचा म्हणे या छाप्याशी संबंध होता. त्यातून पुढे सुरु झालेले नाट्य अजून सुरुच आहे. दरम्यान खुद्द केजरीवाल यांच्या सरकारने नियुक्त केलेल्या ज्या त्रिसदस्यीय मंडळाने भ्रष्टाचाराची चौकशी केली त्या समितीच्या अहवालात कुठेच जेटलींचे नाव नसल्याचेही आता प्रसिद्ध झाले आहे. तरीही जेटलींनी चौकशीला सामोरे जावे असे केजरीवालांचे आव्हान आहे. त्या आव्हानाचे काय करायचे हे जेटली पाहून घेतील. पण आपल्या कार्यालयावर छापा मारलेल्या सीबीआयने आपल्या घरावरही धाड टाकली तर तिला घरात केवळ अगणित मफलर्स तेवढे सापडतील, बाकी काहीही सापडणार नाही, असे अत्यंत पोरकट विधान केजरीवालांनी केले आहे. कर नाही त्याला डर कशाला, असा जो काही उपदेश केजरीवाल जेटलींना करीत आहेत तोेच मग त्यांनाही लागू पडायला हवा. मात्र तो तसा लागू पडत नाही असे दिसते. कार्यालयावरील छाप्याने केजरीवाल यांचा अहं कुठेतरी दुखावला गेल्यानेच त्यांनी हे मफलरांचे उद्गार काढले हे उघड आहे. आपण अत्यंत स्वच्छ आणि पारदर्शी कारभार करतो आणि भ्रष्टाचाराला जवळपासही फिरकू देत नाही असा केजरीवालांचा दावा आहे. मुळात राज्यकर्त्याकडून तीच तर लोकशाहीची किमान अपेक्षा असते. पण या अपेक्षेची बहुसंख्य पूर्तता करताना दिसत नाहीत व केजरीवाल तीे करतात, म्हणजे त्यांना नैतिक दहशतवाद माजविण्याचा परवाना मिळतो, असे मात्र नाही.