नवी बॅँकिंग क्रांती

By Admin | Published: August 23, 2015 10:04 PM2015-08-23T22:04:23+5:302015-08-23T22:04:23+5:30

बरोबर ४६ वर्षांपूर्वी १४ बड्या खासगी बॅँकांचे राष्ट्रीयीकरण करून तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बॅँकिंग क्षेत्रात एक क्रांती घडविली होती. आता

New Banking Revolution | नवी बॅँकिंग क्रांती

नवी बॅँकिंग क्रांती

googlenewsNext

बरोबर ४६ वर्षांपूर्वी १४ बड्या खासगी बॅँकांचे राष्ट्रीयीकरण करून तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बॅँकिंग क्षेत्रात एक क्रांती घडविली होती. आता रिझर्व्ह बॅँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी ११ बड्या खासगी कंपन्यांना प्रदान (पेमेंट) बॅँकांचे परवाने जारी करून याच क्षेत्रात आणखी एक क्रांती घडविण्याच्या दिशेने पुढचे पाऊल टाकले आहे. काही अर्थतज्ज्ञांच्या मते, या निर्णयामुळे होऊ घातलेली क्रांती बॅँकांच्या राष्ट्रीयीकरणामुळे झालेल्या क्रांतीपेक्षाही मोठी असेल. ्रप्रदान बॅँका ठेवीदारांकडून ठेवी तर गोळा करू शकतील; पण त्यांना सर्वसामान्यांना कर्जवाटप करण्याची मुभा मात्र नसेल. त्या केवळ सरकारलाच कर्ज देऊ शकतील. शिवाय बचत खात्यांमधील ठेवींवर सध्याच्या बॅँकांच्या तुलनेत त्या अधिक व्याज देतील, अशी अपेक्षा आहे. या बॅँका केवळ सरकारलाच कर्ज देऊ शकणार असल्यामुळे तो पैसा सामाजिक उपक्रमांसाठी वापरला जाऊन अंतत: सर्वसामान्यांनाच त्याचा लाभ मिळू शकतो. प्रदान बॅँकांमधील खात्यांमध्ये विशिष्ट किमान रक्कम ठेवण्याचे ग्राहकावर बंधन नसेल. त्याशिवाय त्यांच्या सेवा सध्याच्या तुलनेत स्वस्त असतील. परिणामी, ज्यांना बॅँकेकडून कर्ज नको आहे आणि केवळ बॅँकिंग सेवा व सुविधा हव्या आहेत, त्या ग्राहकांचा ओढा त्यांच्याकडे वाढण्याची शक्यता आहे. परिणामी स्पर्धा वाढून विद्यमान बॅँकांना आपल्या सेवा आणि सुविधांच्या दर्जात सुधारणा करणे भाग पडून त्यासाठी आकारले जाणारे दरही कमी करावे लागतील. विद्यमान बॅँकांना शहरी भागांमध्ये आवश्यक तेवढा व्यवसाय मिळत असल्याने त्या ग्रामीण भागात जाण्यास फारशा उत्सुक नसतात. याउलट प्रदान बॅँकांना सर्वसामान्यांना कर्जवाटपाची मुभाच नसल्याने, त्यांचा मुख्य भर ठेवी गोळा करण्यावर असेल आणि त्यासाठी ग्रामीण भागामध्ये जाण्याची तयारी त्यांना ठेवावीच लागेल. त्यासाठी या बॅँका मोबाइल बॅँकिंगचा आधार घेतील. मोदी सरकारची जन-धन योजना, प्रदान बॅँका आणि आधार कार्ड यांच्या त्रिवेणी संगमात ग्रामीण भागात अर्थक्रांती घडविण्याची ताकद आहे. देशातल्या प्रत्येक माणसाचे बॅँकेत खाते असावे, गरजूंना करावयाची सर्व तऱ्हेची आर्थिक मदत थेट बॅँक खात्यात जमा व्हावी आणि पुढे रोकडविरहित बॅँकिंग सुरू होऊन भ्रष्टाचाराला आळा बसावा, हे स्वप्न हा त्रिवेणी संगम साकारू शकतो. त्यासाठी रिझर्व्ह बॅँकेने तिची भूमिका अदा केली आहे. आता उर्वरित भूमिका सरकारला अदा करावयाची आहे.

Web Title: New Banking Revolution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.