निसर्गप्रेमींपुढील नवी आव्हाने

By admin | Published: June 5, 2016 02:05 AM2016-06-05T02:05:40+5:302016-06-05T02:05:40+5:30

आज आहे पंचेचाळीसावा जागतिक पर्यावरण दिन. महाकवी गोएथे शिकवतो की, आसमंतात काय चालले आहे, याचा विचार करताना जगभर आणि इतिहासाच्या ओघात काय चालले आहे, याचा विचार

New challenges ahead of nature | निसर्गप्रेमींपुढील नवी आव्हाने

निसर्गप्रेमींपुढील नवी आव्हाने

Next

- माधव गाडगीळ

आज आहे पंचेचाळीसावा जागतिक पर्यावरण दिन. महाकवी गोएथे शिकवतो की, आसमंतात काय चालले आहे, याचा विचार करताना जगभर आणि इतिहासाच्या ओघात काय चालले आहे, याचा विचार मनात ठेवा. वर लक्षात ठेवा की, क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे! आज जगात काय चालले आहे? सगळीकडे आर्थिक विषमता भडकते आहे आणि त्याबरोबरच धनदांडग्यांची पकड. यातून एक खाणमाफिया, रेतीमाफियासारखी अपराधी अर्थव्यवस्था उभी राहते आहे. तिच्या प्रभावाने समाजाची घडी तर विस्कटते आहेच, पण पर्यावरणाची अभूतपूर्व नासाडी सुरू आहे. त्याला आळा घालणे हे निसर्गप्रेमींपुढचे आजचे नवे महत्त्वपूर्ण आव्हान आहे. ठोस उदाहरण घ्यायचे, तर गोव्यातला उफराटा व्यवहार बघा. शाह आयोगानुसार, गोव्यातील खाणींवर कधीही काहीही देखरेख ठेवली गेलेली नाही. त्यामुळे कशाचीही भीती नाही, असे वातावरण निर्माण होऊन खाण चालकांद्वारे बेदरकारपणे पर्यावरण, जीवसृष्टी, शेती, भूजल, ओढे, नद्या, तळी यांचा विध्वंस चालला आहे. अशा अवैध व्यवहारातून किती पैसा निर्माण केला आहे? पस्तीस हजार कोटी रुपये! या अहवालामुळे काही वर्षे गोव्यातला खनिज व्यवसाय ठप्प झाला होता, पण आता तो खुला करायला आरंभ झाला आहे. खुला करताना ज्यांनी मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार केला आहे, असे स्पष्ट झाले आहे, त्यांच्याविरुद्ध काहीही कारवाई होण्याची चिन्हे नाहीत. उलट ज्या कावरे गावच्या ग्रामसभेने एकमताने ठराव करून जर खाणकाम पुन्हा सुरू करायचे असेल, तर ते आमच्या सहकारी संस्थेमार्फतच करावे, आम्ही परिसराला सांभाळत, रोजगार निर्माण करत सचोटीने व्यवहार चालवू असा आग्रह धरला आहे, त्यांच्यावरच अत्याचार सुरू आहेत. का? कारण धनदांडग्यांना भीती आहे की, ग्रामसभा खरेच अशा उभ्या राहिल्या, सहकारी संस्था लोकहितासाठी चालवल्या गेल्या, तर आपली सत्ता संपेल. नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात सामूहिक वनसंपत्तीच्या व्यवस्थापनात असेच चांगले अनुभव येताहेत, काळजीपूर्वक वापरातून जंगल वाचते आहे, लोकांची आर्थिक स्थिती सुधारते आहे, त्या बरोबरच लोक स्वयंस्फूर्तीने नव्या देवराया प्रस्थापित करताहेत. अशी लोकसहभागी शासनव्यवस्था, अर्थव्यवस्था उभारत, आपण आज देशात जे अद्वा-तद्वा खाणकाम, रेतीउपसा, जंगलतोड, टँकर्स भरण्यासाठी भूजलाचा उपसा असे गैरव्यवहार चालले आहेत, त्यांना आवर घालू शकू, निसर्ग सांभाळण्यासाठी, समाजाची विस्कटलेली घडी पुन्हा बसवण्यासाठी मोठे योगदान देऊ शकू.

लोकसहभागी शासनव्यवस्था, अर्थव्यवस्था उभारण्यात आपल्याला जर यश आले, तर आज देशात जे अद्वा-तद्वा खाणकाम, रेतीउपसा, जंगलतोड, टँकर्स भरण्यासाठी भूजलाचा उपसा असे गैरव्यवहार चालले आहेत, त्यांना आवर घालू शकू. पंचेचाळीसावा पर्यावरण दिन साजरा होताना या दिशेने प्रयत्न व्हावेत.

Web Title: New challenges ahead of nature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.