लालूप्रसादांच्या भ्रष्टाचाराचे नवे नगारे
By admin | Published: July 8, 2017 12:18 AM2017-07-08T00:18:41+5:302017-07-08T00:18:41+5:30
बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांनी जनावरांच्या चाऱ्याच्या पैशांवर कसा डल्ला मारला हे सर्वांनाच
बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांनी जनावरांच्या चाऱ्याच्या पैशांवर कसा डल्ला मारला हे सर्वांनाच माहीत होते. त्या प्रकरणात ते एकदा तुरुंगवारीही करून आले आहेत आणि चारा घोटाळ्याचा तपास अद्याप सुरू असून, त्यांना शुक्रवारीही चौकशीसाठी जावे लागले होते. चारा घोटाळा हे प्रकरण जुने झाले असे वाटत असतानाच लालूप्रसादांचे आता नवे प्रताप समोर आले आहेत. सीबीआयने गेल्या दोन आठवड्यांपासून त्यांचा आणि कुटुंबीयांचा भष्टाचार समोर आणायला सुरुवात केली होतीच. बिहारची राजधानी असलेल्या पाटणा शहरातील मॉलमध्ये त्यांची मुलगी मिसा आणि त्यांचा मंत्री असलेला मुलगा यांची बेकायदा गुंतवणूक आणि एकूणच त्यांतील गैरकारभार आधी समोर आला. खरे तर तेव्हाच त्यांच्या भ्रष्टाचाराविरोधात फास आवळायला सुरुवात झाली होती. पण लालूप्रसाद व त्यांच्या कुटुंबीयांना मुद्दाम त्रास देण्यासाठी केंद्र सरकारने चौकशीचा ससेमिरा लावल्याचा संशय व्यक्त केला गेला. मात्र लालूप्रसादांनी केंद्रात रेल्वेमंत्री असताना ज्याप्रकारे करोडोंची माया गोळा केली, ती करण्यासाठी रेल्वेच्या हॉटेलांसारख्या मालमत्ता भाडेतत्त्वावर देताना नियम पायदळी तुडवले, शिवाय त्या बदल्यात करोडो रुपयांची जमीन मिळवली, या साऱ्यावर शुक्रवारच्या छाप्यांमुळे प्रकाश पडला आहे. सीबीआयने तब्बल १२ ठिकाणी छापे घातले असून, त्यांच्या पत्नी राबडीदेवी यांचीही चौकशी सुरू आहे. लालूप्रसाद यादव रेल्वेमंत्री असतानाच्या काळात रेल्वेचे भाडे एकदाही वाढवण्यात न आल्याने त्यांचे तेव्हा भरपूर कौतुक झाले होते. रेल्वेचा खर्च कमी करून त्यांनी प्रवासी भाडे वाढू दिले नाही, अशा कौतुककथा रंगवून सांगितल्या जात होत्या. पण नेमक्या त्याच काळात रेल्वेच्या मालकीचे रांची आणि पुरी येथील दोन हॉटेल्स त्यांनी इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशनला चालवायला (आयआरसीटीसी) दिले आणि मग निविदाप्रक्रियेत गडबड करून आपल्याच मर्जीतील खासगी व्यक्तींना ते भाडेतत्त्वावर देऊन टाकले. असे केल्यामुळे रेल्वेचा तोटा झाला, पण फायदा मात्र लालूप्रसादांनी उठवला. ज्यांना हे हॉटेल्स भाडेतत्त्वावर देण्यात आले, त्यांच्याकडून त्यांनी ३४ कोटी रुपये किमतीची पाटण्यातील महत्त्वाच्या जागी असलेली जमीन अवघ्या ५४ लाखांमध्ये मिळवली. अर्थात ती जमीन त्यांनी आधी आपल्या एका परिचिताच्या हॉटेल कंपनीच्या नावावर केली. पुढे तीच जमीन लालूप्रसादांच्या कुटुंबीयांच्या लारा (लालू व राबडी?) प्रोजेक्ट्स नावाच्या कंपनीने विकत घेतल्याचे दाखवण्यात आले. जमीन लारा प्रोजेक्ट्सच्या नावे करतानाही तिची किंमत कमी दाखवली. या साऱ्या प्रकरणात रेल्वेमंत्री म्हणून असलेल्या अधिकारांचा गैरवापर आहे, भ्रष्ट मार्गांचा अवलंब आहे, कायदेकानून पायदळी तुडवणे आहे आणि त्या साऱ्यांतून माया जमविणेही आहे. एवढेच नव्हे, तर त्यापलीकडे त्यांनी मनीलाँडरिंगही केले आणि जमिनीची किंमत कमी दाखवून, ती खरेदी करताना कमी कर भरून सरकारची फसवणूकही केली. डॉ. मनमोहनसिंग यांच्या सरकारात २0०९ ते २0१४ या काळात लालूप्रसाद रेल्वेमंत्री होते.
तेव्हा काँग्रेसला बहुमत नसल्याने डॉ. मनमोहनसिंग सरकारला अनेक प्रादेशिक पक्षांची मदत घ्यावी लागली. त्यात अर्थातच लालूप्रसादांचा पक्ष होता. द्रमुकचे दयानिधी मारन आणि ए. राजा यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे याआधी उघडकीस आली इतकेच. सरकारला पाठिंबा देण्याची पुरेपूर किंमत वसूल केली, असेच म्हणावे लागेल. अर्थात सुरेश कलमाडी यांचा वेशीवर आलेला गैरकारभारही याच काळातील. आता मोदी सरकारने लालूप्रसादांना धडा शिकवण्यासाठी ससेमिरा लावला, असे म्हणण्यास पुरेसा वाव असला तरीही लालूप्रसादांच्या गुन्ह्यांचे समर्थन मात्र होऊ शकत नाही. लालूप्रसाद व त्यांच्या कुटुंबीयांचे चारित्र्य निश्चितच स्वच्छ नाही आणि त्यांना स्वत:च्या कुटुंबापलीकडे काही दिसत नाही. मुलगी खासदार, दोन मुले बिहारचे मंत्री, त्यापैकी एक उपमुख्यमंत्री असे त्यांचे कुटुंबप्रेमी राजकारण आहे. या छाप्यांमुळे भाजप नेत्यांना आनंद झाला असून, त्यांनी लालूप्रसादांच्या दोन्ही मुलांना मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मंत्रिमंडळातून बाहेर काढावे, अशी मागणी केली आहे. विरोधी पक्ष ती करणारच. नितीशकुमारांचे सरकार अस्थिर व्हावे, असाच भाजपचा प्रयत्न आहे. नितीशकुमारांनी दोन यादवपुत्रांना मंत्रिमंडळातून काढल्यास त्यांचे सरकार कोसळेल आणि तेच भाजपला हवे आहे. नितीशकुमार अलीकडे विरोधी पक्षांपासून काहीसे दूर जाताना दिसत असले तरी ते भाजपच्या वळचणीला जातीलच असे नाही आणि यादवपुत्रांना घरचा रस्ता दाखवून स्वत:च्या पायावर आताच दगड पाडून घेतील, असेही नव्हे. शिवाय अद्याप लालूप्रसाद यांच्या मुलांवरील आरोप सिद्ध झालेले नाहीत. या भ्रष्टाचार प्रकरणात मुलांचा थेट सहभाग होता, असे सीबीआयनेही म्हटलेले नाही. मात्र विरोधकांची मोट बांधून ती टिकवण्याचे जे प्रयत्न काँग्रेसकडून सुरू आहेत, त्यात लालूप्रसादांच्या नव्या प्रकरणाने अधिक अडथळे निर्माण झाले आहेत, हे नक्की. भाजपला तूर्त तेवढे पुरेसे आहे. भाजप व जातीय शक्तींविरोधाचा सतत बिगुल वाजवणाऱ्या लालूप्रसादांच्या नव्या भ्रष्टाचाराचे नगारे मात्र सीबीआयच्या छाप्यांमुळे पुन्हा वाजू लागले लागले आहेत.